मतांच्या राजकारणामुळे सामाजिक चळवळींचा ऱ्हास

 व्याख्यानमालेत बोलताना प्रा. रमेश डुबल, शेजारी (डावीकडून) ग्रंथालयाचे उपाध्यक्ष डॉ. चंद्रकांत नलावडे, अध्यक्ष संभाजीराव पाटणे.

प्रा.रमेश डुबल यांना खंत : सुमित्राराजे स्मृति व्याख्यानमाला

सातारा,दि.12 प्रतिनिधी- आमच्या देशातील-राज्यातील सामाजिक चळवळींचा ऱ्हास हा मतांच्या राजकारणामुळे चालला आहे. समाज धुरिणांना अभिप्रेत असणाऱ्या उन्नत समाजाप्रति आणि त्यांनी मांडलेल्या विकासाच्या प्रारूपाशी ते प्रतारणा करणारे आहे, अशी खंत राज्यशास्त्राचे अभ्यासक प्रा. रमेश डुबल यांनी केले.
येथील समर्थ सदनात सुरु असलेल्या राजमाता सुमित्राराजे भोसले स्मृति व्याख्यानमालेत ‘राजर्षि शाहू : कार्य आणि कर्तृत्व’ या विषयावर ते बोलत होते. अवघ्या मानवी जीवनाला व्यापून राहणा-या बहुतेक सामाजिक चळवळीचे जनकत्व महात्मा फुले, राजर्षि शाहू आणि डॉ. आंबेडकर यांच्याकडे जाते, असे सुरवातीलाच नमूद करुन ते म्हणाले, या त्रिमूर्ती बहुजन समाजाचे भाग्य उजळवणा-या आहेत. त्यांच्यात अव्दैत आहे. आपल्या संकुचित विचारांनी आणि सत्तेच्या राजकारणासाठी त्यांच्यात भेदाभेद करुन त्यांनी पुढे नेलेला सामाजिक लोकशाहीचा – सामाजिक न्यायाचा गाडा आणि लढा आपण पुन्हा मागे नेता कामा नये.
राजर्षि शाहू महाराजांनी इंग्रजी सत्तेचा अंमल असतानाही आणि संस्थानिक म्हणून असणारे अधिकार आकुंचित केलेले असतानाही त्यांनी बहुजनांसाठी केलेले काम, राबवलेल्या योजना ही एक प्रकारे सांस्कृतिक – सामाजिक क्रांतीच होय. नव्हे त्यांनी एक प्रकारे उन्नत – विकसीत समाजाचे एक प्रारुपच देशाला दिले. त्यांच्या या निर्णयांचे प्रतिबिंब आपल्या राज्यघटनेच्या मुलभूत अधिकारात, मार्गदर्शक तत्वांमध्ये आपणाला दिसते. राजर्षि शाहूंनी हे सारे केले त्याला कारण ते राजा होते आणि अधिकार होते असे नव्हे; राजे तर अनेक होते. पण गरीबांप्रति – वंचिताप्रति असणारी अंगभूत कणव हेच त्याचे कारण आहे, असे सांगून प्रा. डुबल म्हणाले, आपण सर्वांनी सामाजिक न्यायाप्रति सतत जागरुक रहात या चळवळींना मदतगार रहायला हवे. तीच फुले-शाहू-आंबेडकरांना श्रध्दांजली ठरेल, असे त्यांनी सांगितले. सुमित्राराजे भोसले ग्रंथालयाचे उपाध्यक्ष चंद्रकांत नलावडे यांनी प्रास्ताविक केले. कार्यवाह नंदा जाधव यांनी आभार मानले.

-Ads-

 

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)