मतमोजणीला 7 दिवसांचा अवधी; उमेदवार गॅसवर

ग्रामीण भागातील पारापारावर निकालाबाबत तर्कवितर्क सुरू : मतदानाचा कानोसा घेऊन आकडेमोड
 सर्वच मतदारसंघात चुरशीचे मतदान
नेवासा, दि.17 (प्रतिनिधी) – नेवासा तालुक्‍यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या मतदानानंतर आता निकालाबाबत राजकीय कार्यकर्त्यांप्रमाणेच मतदारांनाही उत्कंठा लागून राहिली आहे. मतमोजणीसाठी तब्बल सात दिवसांचा अवधी असल्याने उमेदवार गॅसवर राहणार आहेत. परंतु त्यांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी गावोगावी झालेल्या मतदानाचा कानोसा घेऊन आकडेमोड सुरू केली आहे. निकालाबाबत ठोकताळे बांधण्यासही सुरवात झाली आहे. ग्रामीण भागातील पारांवरही निकालाबाबतच्याच चर्चा रंगू लागल्या आहेत.
नेवासा तालुक्‍यात जिल्हा परिषदेच्या सात व पंचायत समितीच्या चौदा जागांसाठी मतदान झाले. दुपारपर्यंत कमी मतदान झाल्याने उमेदवार कासावीस झाले होते. परंतु, शेवटच्या तीन तासांत मोठ्या संख्येने मतदान झाले. काही मतदारसंघांचा अपवाद वगळता बहुतेक सर्वच मतदारसंघात चुरशीची लढत झाल्याने उमेदवारांबरोबरच कार्यकर्ते व मतदारांमध्ये निकालाबाबत उत्कंठा निर्माण झाली आहे. मतमोजणी 23 रोजी होणार असल्याने उमेदवार तब्बल सात दिवस गॅसवर राहणार आहेत. मात्र, त्यांनी व कार्यकर्त्यांनी मतदारसंघातील गावोगावी झालेल्या मतदानाचा कानोसा घेऊन आकडेमोड करण्यास सुरवात केली आहे.
भाजपला व राष्ट्रवादी कॉंग्रेसला आणि क्रांतिकारी शेतकरी पक्ष, कॉंग्रेस, शिवसेना जिल्हा परिषद गटांपेक्षा पंचायत समितीच्या गणांमध्ये अधिक रस आहे. कारण पंचायत समिती ताब्यात ठेवण्यासाठी सर्वच पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. त्यामुळे या सर्वच पक्षांच्या नेत्यांनी व पदाधिकाऱ्यांनी माहिती घेण्यास सुरवात केली आहे. भाजपला मानणाऱ्या गावांमध्ये किती टक्‍के मतदान झाले. राष्ट्रवादीला मानणाऱ्या गावात किती मतदान झाले. क्रांतिकारी शेतकरी पक्ष, कॉंग्रेस, शिवसेनेचे उमेदवार किती चालले हे जाणून घेऊन निकालाबाबतचे आडाखे बांधले जात आहेत. भेंडा जिल्हा परिषद गटात सर्वाधिक चुरस होती. भाजपचे दत्तात्रय काळे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गणेश गव्हाने, कॉंग्रेसचे निवृत्ती काळे, क्रांतिकारी शेतकरी पक्ष अर्जुन नवले व शिवसेनेचे प्रशांत गोल्हार या पाचजणात चुरशीची लढत होती. तर रासपचे महेंद्र नजन हेही रिंगणात होते. या पाचजणांनी मतांची विभागणी कशी झाली. कोणी कोणाचे काम केले, कोणी कोणत्या गावात कशी फिल्डिंग लावली होती. याची खुमासदार चर्चा सुरू झाली आहे.
भेंडा गट हा आमदार बाळासाहेब मुरकुटे, माजी आमदार चंद्रशेखर घुले व माजी आमदार शंकरराव गडाख या तिन्ही आजी-माजी आमदारांच्या प्रतिष्ठेचा आहे. गटासह गणातील दोन्ही जागांवर तालुक्‍याचे लक्ष आहे. त्यात गट हा ओबीसी तर दोन्ही गण सर्वसाधारण असल्याने येथे चुरशीची लढत झाल्याचे मतदानाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले. भेंडा गणात भाजपचे अजित मुरकुटे व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गयाबाई महापूर, क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे शिवाजी पाठक तर कॉंग्रेसचे भारत साबळे, शिवसेनेचे संजय मिसाळ, अपक्ष ज्ञानदेव पाडळे व मुकिंदपूर गणात भाजपचे शिवाजी निपुंगे, राष्ट्रवादीचे सतीश निपुंगे व कॉंग्रेसकडून येडूभाऊ सोनवने, शिवसेनेचे प्रताप हांडे आणि क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे रावसाहेब कांगुने हे प्रमुख उमेदवार होते. त्यामुळे येथील निकालाबाबतही मोठी उत्सुकता आहे. कोण कोणत्या गावात जास्त चालले, येथील अन्य उमेदवारांनी किती मते घेतली. यावरून निकालाचे ठोकताळे बांधले जात आहेत.
भेंडा गटात व भेंडा, मुकिंदपूर गणात भाजप, राष्ट्रवादी, क्रांतिकारी पक्ष, कॉंग्रेस उमेदवांमुळे चुरस निर्माण झाली होती. येथे प्रामुख्याने झालेल्या पंचरंगी लढतीत कोणाला कोठे आघाडी मिळेल? खरी लढत कोणत्या दोघात होईल व तिसऱ्या क्रमांकावर कोण जाईल, इतर उमेदवार किती मते घेतील, या बाबत चर्चा सुरू झाली आहे. मोठ्या लोकसंख्येच्या गटामध्ये 28 हजार 344 पैकी 21 हजार 558 मतदारांनी आपला मतदानाचा हक्‍कबजावला. भेंडा गटात बहुतांशी उमेदवार असल्याने कोणाला कोठे आघाडी मिळेल? याबाबतही ठोकताळे बांधले जात आहेत. भेंडा व मुकिंदपूर गणात भाजप व राष्ट्रवादी, क्रांतिकारी शेतकरी पक्षा मध्ये खरी लढत झाली. भेंडा गणात कोण आघाडी घेईल व इतर गावांतील मते कोणी खेचली, या बाबत चर्चा रंगू लागली आहे. कोणी कोणाचे काम केले. भेंडा, गणातून कोण पुढे राहील व मुकिंदपूर गणातून कोणाला आघाडी मिळेल या बाबत चर्चा सुरू झाली आहे. भाजप व क्रांतिकारी पक्ष, कॉंग्रेस, राष्ट्रवादीला, शिवसेनेला किती जागा मिळतील, या बाबतही आडाखे बांधले जात आहेत.

मतदान वाढले, फायदा अन्‌ तोटा कोणाला?
नेवासा तालुक्‍यातील सात गट व चौदा गणासाठी शांततेत 73.57 टक्‍के मतदारांनी मतदानाचा हक्‍क बजावला. गतवेळच्या तुलनेत यंदा मतदानाची सरासरी वाढली आहे. वाढलेले मतदान नेमके कोणाला फायदेशीर ठरणार? विरोधक की सत्ताधाऱ्यांच्या विरोधात कौल जाणार? याबाबतही चर्चा सुरू आहे. 2 लाख 24 हजार 905 मतदारांपैकी 1 लाख 65 हजार 477 मतदारांनी मतदान केले. गट-गणनिहाय मतदान टक्‍केवारीत – बेलपिंपळगाव-71.18, कुकाणा-72.18, भेंडा गट-75.61, भानसहिवरा-69.46, खरवंडी-75.58, सोनई-69.88, चांदा-72.46. गण-बेलपिंपळगाव-73.93, सलाबतपूर-74.4, शिरसगाव-72.57, कुकाणा-72.21, भेंडा बुद्रुक-77.47, मुंकिंदपूर-73.70, भानसहिवरा-70.11, पाचेगाव-71.94, करजगाव-78.17, खरवंडी-72.73, सोनई-74.57, घोडेगाव-73.18, चांदा-73.49, देडगाव-71.43.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)