मतदारांना आकर्षित करण्यासाठी गणपतीची आक्षेपार्ह जाहिरात

रिपब्लिकन पक्षाचा माफीनामा
टेक्‍सास – अमेरिकेतील भारतीय वंशांच्या मतदारांना आकर्षित करण्यासाठी रिपब्लिकन पक्षाने दिलेली जाहिरात वादग्रस्त ठरली आहे. जाहिरातीवर हिंदू संघटनांकडून आक्षेप घेताच पक्षाने या जाहिरातीसाठी माफी मागितली आहे. कोणाच्याही भावना दुखावण्यासाठी आम्ही ही जाहिरात दिली नव्हती, असे पक्षाने म्हटले आहे.

टेक्‍सासमधील फोर्ट बेंड काऊंटी येथील रिपब्लिकन पक्षातर्फे “इंडियन हेराल्ड’ या स्थानिक वृत्तपत्रात एक जाहिरात देण्यात आली होती. गणेश चतुर्थीनिमित्त ही जाहिरात देण्यात आली होती. या जाहिरातीमधून रिपब्लिकन पक्षातर्फे डेमॉक्रॅटिक पक्षावर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, यात गणपतींचा आधार घेण्यात आल्याने नाराजी व्यक्त होत आहे. तुम्ही कोणाची पुजा करणार, माकडाची की हत्तीची?, निवड तुमचीच, असे यात म्हटले होते. या जाहिरातीमध्ये गणरायाचे चित्र होते.

-Ads-

रिपब्लिकन पक्षाने हिंदू मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करणे कौतुकास्पद आहे. मात्र, यासाठी हिंदू देवतांचा आधार घेऊन त्यांचा अपमान करणे निषेधार्ह आहे, असे हिंदू अमेरिकन फाऊंडेशनचे ऋषी भूतडा यांनी सांगितले. राजकीय पक्षांनी स्वत:ची जाहिरात करण्यासाठी देवीदेवतांचा आधार घेणे चुकीचे आहे, रिपब्लिकन पक्षाने ही जाहिरात मागे घ्यावी, अशी मागणी सोशल मीडियावरुन करण्यात आली.

टीकेची झोड उठताच रिपब्लिकन पक्षाने माफी मागून वादावर पडदा टाकला आहे. हिंदू सणाची दखल घेत तो साजरा करणे, हा या जाहिरातीचा उद्देश होता. हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावण्याचा किंवा हिंदू देवीदेवतांचा अपमान करण्याचा उद्देश नव्हता, असे पक्षाने स्पष्ट केले. अमेरिकेतील रिपब्लिकन पक्षाचे निवडणूक चिन्ह हे हत्ती असल्याने त्यांनी या जाहिरातीद्वारे स्वत:ची तुलना गणपतीशी केली होती.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)