मतदारसंघातील सर्वच दारु दुकाने बंद करा

आ. शिवेंद्रसिंहराजे यांचा खा.उदयनराजे यांना टोला
सातारा, दि. 26 (प्रतिनिधी) – जुना मोटार स्टॅंड परिसरात जो काही प्रकार झाला तो कशामुळे झाला हे सातारकरांना माहिती आहे.माझ्यावर अन्याय होत असेल तर, मी गप्प बसत नाही याची अनुभूती खासदारांना मागेच आली आहे. त्यामुळे खासदारांनी माझ्यावर होणाऱ्या अन्यायाची काळजी करु नये. तुमचे जागा बळकावण्याचे पितळ उघडे पडले म्हणून तुम्ही दारु दुकान, दारु दुकान म्हणून ओरत आहात. एवढेच तत्वनिष्ट असाल तर, रवी ढोणेचेच का, तुमच्या मतदारसंघातील सर्वच दारु दुकाने बंद करुन दाखवावीत, असा उपहासात्मक टोला आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी खा. उदयनराजे यांना लगावला.
खा. उदयनराजे यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रीया देताना राजघराण्याचे तत्व, आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्यावरही अन्याय होवू देणार नाही आदी वक्‍तव्ये केली होती. त्याला आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी पत्रकाद्वारे प्रत्युत्तर दिले असून त्यात म्हटले आहे की, गतवर्षी टोलनाक्‍याच्या मुद्यावरुन उदयनराजे त्यांच्या साथीदारांना घेवून माझ्या घरात घुसले होते. मी जलमंदिरकडे गेलो नव्हतो, मी माझ्या कार्यालयातच बसलो होतो. तेव्हाही उदयनराजे पुर्वनियोजित कट करुन माझ्या घरात घुसले. घर छोटे असो वा मोठे, घर प्रत्येकालाच प्रिय असते. माझ्या घरावर कोणी चाल करुन येत असेल तर, मी शांत कसा बसेन.माझ्यावर अन्याय होत असेल तर, मी जशास तसेच उत्तर देतो, हे उदयनराजेंना चांगलेच माहिती आहे. त्यामुळे उदयनराजेंनी माझ्यावर होणाऱ्या अन्यायाची चिंता करु नये.
एका लोकसभा मतदारसंघाचे खासदार असणाऱ्या उदयनराजेंना दुकाने पाडणे आणि जागा खाली करुन देणे यासारख्या सुपाऱ्या घेण्याचेच काम आहे का? जर उदयनराजे तेथे गेले नसते तर मीही गेलो नसतो आणि तणावही झाला नसता. खुटाळे आणि ढोणे यांनी त्यांचा विषय त्यांनीच सोडवला असता मग, उदयनराजेंना त्याठिकाणी पालिकेची यंत्रणा घेवून जाण्याचे कारण काय होते? असा सवाल आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी उपस्थित केला आहे. किती वेळा कोर्टात जायचे? असा प्रश्‍न करणाऱ्या उदयनराजेंनी कोणामुळे कोर्टाच्या पायऱ्या चढायला लागत आहेत, हेही स्पष्ट केले पाहिजे.

ज्या पालिकेत सत्ता आहे त्या सातारा शहरात किती बोंबाबोंब सुरु आहे, हे पहायला उदयनराजेंना वेळ नाही. सातारा शहर सोडा संपुर्ण मतदारसंघात काय समस्या आहेत, दुष्काळामुळे लोक होरपळत आहेत, याचे त्यांना काहीही देणेघेणे नाही पण, खुटाळेची जागा मात्र त्यांना महत्वाची वाटते.दारु दुकान अतिक्रमणात येत नाही तर, ते खासगी जागेत आहे. तेथे तुमचा अथवा पालिकेचा काहीही संबंध नाही. तुमचे पितळ उघडे पडल्यानेच तुम्ही दारु दुकान, दारू दुकान असा बाऊ करत आहात. एक दारुचे दुकान बेकायदेशीरपणे पाडण्यासाठी तुम्ही राजघराण्याची तत्व सांगताय. तुम्हाला जर एवढी राजघराण्याची आणि घराण्याच्या तत्वांची काळजी आहे तर, एवढे एकच नको, गाडी काढा आणि तुमच्या लोकसभा मतदारसंघातील सर्वच दारु दुकाने बंद करा,असे आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी म्हटले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)