मतदान केल्यानंतर मिळणार चित्रपट तिकिटावर सुट

पुणे : महापालिका निवडणुकीसाठी मतदान करून शहरातील कोणत्याही मल्टीप्लेक्‍समध्ये चित्रपट पाहण्यासाठी येणाऱ्या मतदारांना तिकिट दरात 15 टक्के सवलत देण्याचा निर्णय मल्टीप्लेक्‍स असोसिएशन ऑफ इंडीयाने घेतला आहे. या बाबतचे पत्र संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी सौरभ राव यांना गुरुवारी देण्यात आले. मतदानाच्या दिवशी राज्यशासनाने सार्वजनिक सुट्टी जाहीर केल्याने अनेक जण या दिवशी मतदानाला दांडी मारून चित्रपटगृहे तसेच सहलींला जातात. त्याचा परिणामी मतदानाची टक्केवारी घटते. त्यामुळे मतदार जनजागृती तसेच मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी असोसिएशनकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. शहरात मोठ्या प्रमाणात मल्टीप्लेक्‍स चित्रपट गृहे असून या आगळ्या वेगळ्या सवलतीच्या निर्णयामुळे मतदानाच्या टक्केवारीत भर पडण्यास मदत होणार आहे.
पुणे महापालिकेसाठी येत्या 21 फेब्रुवारी (मंगळवारी) सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत मतदान होणार आहे. त्यासाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मतदानाच्या दिवशी जास्तीत जास्त नागरिकांनी घराबाहेर पडावे तसेच सृदुढ लोकशाहीसाठी मतदानात सहभाग घ्यावा. या उद्देशाने निवडणूक आयोगाकडूनही मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जात आहे. तसेच स्वयंसेवी संस्था, विविध संघटना आणि व्यावसायिक अस्थापनांनीही त्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन राज्य निवडणूक आयोगाकडून करण्यात आले होते. त्याला प्रतिसाद देत मल्टीप्लेक्‍स असोसिएशन ऑफ इंडीयाने 21 फेब्रुवारीला दिवसभर मतदान करून जे प्रेक्षक चित्रपट पाहण्यासाठी येतील त्यांना तिकिट दरात 15 टक्के सवलत दिली जाईल. यासाठी संबंधित प्रेक्षकास मतदान केले असल्याचा निवडणूक आयोगाचा हाताच्या बोटावरील शाईचा ठिपका दाखविणे बंधनकारक असणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)