मतदानाचा अधिकार वापरून संविधान जतन करावे

चाकण येथे भीमशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत हंडोरे यांचे आवाहन

राजगुरुनगर- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात प्रत्येकाला मतदानाचा हक्क दिला आहे. मतदानाचा अधिकार वापरून संविधानाचे जतन करावे, असे आवाहन माजी मंत्री तथा भीमशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत हंडोरे यांनी केले.
खेड तालुका भीमशक्ती संघटनेच्यावतीने चाकण येथे संविधान सन्मान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करताना चंद्रकांत हंडोरे बोलत होते. यावेळी भीमशक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष विजय डोळस, संघटक अमित मेश्राम, जिल्हा कॉंग्रेसचे महेश ढमढेरे, जिल्हा संघटक विक्रांत भोर, आंबेगाव कॉंग्रेसचे अध्यक्ष राजूभाई इनामदार, भीमाशंकर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सुरेश कौदरे, राजगुरुनगर सहकारी बॅंकेचे माजी अध्यक्ष किरण आहेर, चाकणचे नगराध्यक्ष शेखर घोगरे, नितीन जगताप, जमीर काझी, भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण दुधवडे, नगरसेविका स्नेहल जगताप, भीमशक्ती संघटनेच्या उषा उनवणे, सुनंदा शिदे, जाकीर अन्सारी, नितीन भद्रिके, संतोष जाधव, अक्षय घोगरे, राहुल गोतारणे, मयूर दुधवडे, अनिल जाधव, विलास रोकडे, राहुल डोळस यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चाकण शहरातून भव्य संविधान यात्रा काढण्यात आल्यानंतर सन्मान मेळाव्यात हंडोरे म्हणाले की, या देशातील चातृवर्ण नष्ट झाली पाहिजे. या देशात कायदा सुरु झाला पाहिजे, अशी भावना डॉ. बाबासाहेबांची होती. संविधानामुळे देशात विविध क्षेत्रात न्याय व्यवस्था निर्माण झाली आहे. आपण निर्भयपणे वावरतो ही डॉ. बाबासाहेबांची देन आहे. संविधानाचे वाचन जोपर्यंत आपण करीत नाही तो पर्यंत आपण अज्ञानी आहोत. देशाचे संविधान, राज्यघटना काय आहे, हे जनतेला कळलेच पाहिजे म्हणून संविधान सन्मान मेळाव्याचे संघटनेच्या माध्यमातून राज्यभर मेळावे घेतले जात आहेत.
जो पर्यंत कायदा, अधिकार आणि हक्क आपणाला कळत नाही. तो पर्यंत आपला विकास होणार नाही. हक्क, कर्तव्य, अधिकार आणि कायदे समजून घेत नाही, तोपर्यंत समाजातील काही गुंगी धर्मांध माणसे, उदारमतवादी माणसे अधिष्टान निर्माण करणारी माणसे धर्म सत्ता येण्याच्या वल्गना करीत आहेत. धर्म सांगेल त्याच पद्धतीने वागले पाहिजे, असे काही भंपक माणसे सांगत आहेत. त्यामुळे संविधानाला धोका निर्माण होतो की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे. घटना मोडीत काढण्याचे काम काही समाजकंटक करीत आहेत. संविधान जाळण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. त्यांना लोकशाही पटत नाही त्यांना ठोकशाही निर्माण करायची आहे. धर्मसत्ता, धर्माची राजसत्ता निर्माण करू पाहत आहे. धर्म सांगेल तेच करायचे आहे. मात्र, आपण लोकशाहीवादी लोक आहोत. सर्व धर्म समभाव अशी लोकशाही निर्माण करायची आहे, त्यासाठी संविधान वाचवले पाहिजे. लोकसभा , राज्यसभेत फुट पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे. लोकशाहीत मतदानाचा हक्क बजावून संविधानाची जोपासना करा, असेही हंडोरे यांनी सांगितले.
विजय डोळस म्हणाले की, डॉ. बाबासाहेबांना अभिप्रेत अशा विचारधारेवर चालणारी भीमशक्ती संघटनेची चंद्रकांत हंडोरे यांनी 2002 मध्ये स्थापना केली. त्या माध्यमातून सर्व सामान्य माणसाला न्याय देण्याचे काम केले जात आहे. घटनेतील मुलभूत हक्क, अधिकार यामुळे सर्वांना समान वागणूक मिळत आहे. मात्र काही नेते राजकारण करून जनतेची दिशाभूल करीत आहेत. समाजाचे अनेक प्रश्‍न असताना आपले नेते मात्र चारोळ्या, विनोद करण्यात मग्न आहेत. समाजातील प्रश्‍नांकडे नेत्यांचे लक्ष नाही. आता, वेळ आली आहे त्यांना जाब विचारला पाहिजे. हा देश संविधानावर चालतो याची आठवण त्यांना करून देण्याची वेळ आली आहे.
यावेळी अमित मेश्राम, महेश ढमढेरे, राजूभाई इनामदार, जमीर काझी यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन कैलास मुसळे यांनी तर रामचंद्र कवडे यांनी आभार मानले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)