मढी, सहजापूर येथे रानडुकरांचा चौघांवर हल्ला 

दोघे गंभीर जखमी; शिर्डी, नगरला जखमींवर उपचार
कोपरगाव – कोपरगाव तालुक्‍यातील मढी, सहजापूर परिसरात गुरुवारी रानडुकरांनी चांगलाच धुमाकूळ घातला. ठिकठिकाणी रानडुकरांनी चौघांवर हल्ला केला. रानडुकरांनी घेतलेल्या चाव्यामुळे दोघे गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर नगर, शिर्डी येथे उपचार सुरू आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, तालुक्‍यातील मढी ब्रु. येथील नितीन प्रकाश मोकळ वय 28, याला गुरूवारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास घराजवळील रस्त्याने जात असताना त्याच्यावर रानडुकाराने अचानक हल्ला केला. रानडुकराने पाय, पोट, पाठ, दोन्ही पायांना चावा घेतल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना तब्बल 9 ठिकाणी रानडुकराने चावा घेतला. याशिवाय सहजापूर येथील अरुणाबाई सुदाम माळी (वय 45) या घरासमोर सरपण तोडत असतांना सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास रानडुकराने अचानक हल्ला केला. त्यांच्या उजव्या पायाला चावा घेऊन त्यांना जबर जखमी केले. पायातून अतिरिक्‍त रक्‍तस्त्राव झाल्याने त्या जागेवरच बेशुद्ध पडल्या. या दोन्ही जखमींना कोपरगाव ग्रामीण रूग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. डॉ. कुंदन गायकवाड यांनी त्यांच्यावर तातडीने प्रथमोपचार केल्याने पुढील धोका टळला. त्यांना “ऍन्टी रॅबिज सिरम’ उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले.
रानडुकराच्या हल्ल्यातून स्वत:चा जीव वाचविण्यासाठी पळणारे विष्णू भागवत गवळी, वय 60 व सार्थक कचरू गवळी वय 14 हे दोघे जखमी झाले आहेत. दोघे मढी येथील रहिवाशी आहेत. जखमी विष्णू गवळी यांच्यावर शिर्डी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मढीचे पोलीस पाटील इंद्रभान माणिकराव ढोमसे यांनी वन विभाग व पोलीस अधिकाऱ्यांना दिली. त्यांनतर वनविभागाचे परिक्षेत्र अधिकारी संतोष जाधव यांनी तातडीने रूग्णालयात जावून जखमींची विचारपूस केली. त्यांनी घटनेची अधिक माहिती घेऊन घटनास्थळी रानडुरांची शोध मोहिम सुरू केली.
संतोष जाधव याबाबत म्हणाले की, तालुक्‍यामध्ये रानडुकरांचा वावर नाही. मात्र इतर ठिकानाहून रानडुकरं आली असतील. त्यांचा शोध घेवून बंदोबस्त करण्यात येईल. रानडुकरांसारखेच दिसणारे काही जंगली प्राणी तालुक्‍यामध्ये सडे, वारी, धारणगाव, कुंभारी, अपेगाव, मढी, रवंदे या भागात आढळतात. त्यामुळे या हिंस्त्र प्राण्यांपासून सतर्क राहून स्वतःची काळजी घ्यावी. काही आढळल्यास त्वरित वनविभागाला त्याची माहिती कळवावी, असे आवाहन केले आहे.
काही दिवसांपासून रानडुकरांचा वावर…
रानडुकराच्या हल्ल्यातील जखमी अरुणाबाई माळी यांचे पती सुदाम विठ्ठल माळी म्हणाले की, गेल्या 2-3 महिन्यापासून पुढे दात असलेल्या रानडुकरांचा वावर आमच्या परिसरात आढळतो. ते प्राणी टोळक्‍याने फिरताना दिसतात. यापूर्वी कधीही असे डुक्कर आम्हाला दिसलेले नाहीत. उसासह इतर पिकांमध्ये ते लपून बसत आहेत. त्यांचा त्वरित बंदोबस्त करायला हवा, अशी मागणी त्यांनी केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)