मढीतील सर्वच रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी

पाथर्डी – भटक्‍यांची पंढरी समजली जाणाऱ्या श्रीक्षेत्र मढी येथे श्रावण महिन्यातील तिसऱ्या शुक्रवारनिमित्त राज्यातील लाखो भाविकांनी कानिफनाथांच्या पालखी सोहळ्यासाठी गर्दी केली होती. प्रचंड गर्दीमुळे मढीतील सर्वच रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी झाली. तालबद्ध वाजणारे ढोल, ताशे, डफ व कर्णकर्कश शंखनादाने परिसर भारावून गेला. यंदा गतवर्षाच्या तुलनेच गर्दी अधिक होती.
चैतन्य कानिफनाथांची पालखी श्रावणातील प्रत्येक शुक्रवारी निघते. तिसऱ्या शुक्रवारी मात्र या ठिकाणी यात्रेचे स्वरूप येते. प्रामुख्याने भागरवाडी, लोणावळा, गिलबिलेनगर, आळंदी, जळगाव, पुणे, नाशिक, मावळ, लोणावळा, ठाणे, मोशी या भागातील हजारो नाथभक्त पायी पालख्यांमध्ये सहभागी होऊन नाथांच्या पालखी सोहळ्यासाठी उपस्थित राहिले.

काही पालखी व दिंड्या मढी येथे दोन दिवस अगोदरच येतात. दोन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे व महाप्रसादाचे आयोजन मढी येथे केले जाते. गुरुवारी (दि. 10) रात्रीपासूनच मढी येथे दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. दत्त मंदिरासमोर यात्रा मैदान येथील वाहनतळ पूर्ण भरल्याने पालखी मार्गाच्या दोन कि.मी. अंतरावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
शुक्रवारी पहाटेपासूनच राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या पालख्या वाद्यवृंदासह गडावर दाखल झाल्या. रात्री उशिरापर्यंत गर्दी कायम होती. विविध फुलांनी सजविलेल्या पालख्या व रथ येणाऱ्या भाविकांचे लक्ष वेधत होत्या. रात्री महाआरतीनंतर कानिफनाथांच्या मुख्य पालखीचा वाजत गाजत मिरवणुकीस प्रारंभ झाला. या मिरवणुकीत मराठे सरदार कान्होजी आंग्रे यांनी अर्पण केलेला पंचधातूचा घोडा व भगवा भव्य ध्वज असतो. संपूर्ण गावाला ग्रामप्रदक्षिणा करून पुन्हा गडावर मिरवणुकीचे विसर्जन झाले. मध्यरात्रीपर्यंत मिरवणूक सुरू होती. यावेळी मुख्य समाधी मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली. नाथांच्या पालखी मिरवणुकीत सर्व जातीधर्माचे भक्‍त सहभागी होतात. गावातील तरुणांनी उत्साहाने सहभाग घेत स्थानिक वाद्यांची शोभा वाढवली. लोणावळा येथील बॅण्डपथकांनी ढोल, ड्रम व विविध इलेक्‍ट्रॉनिक वाद्ये वाजवत सर्वांचे लक्ष वेधले. देवस्थान समितीच्या वतीने “संत तुकाराम’ हा धार्मिक चित्रपट दाखविण्यात आला.

चोरांनी केला हात साफ

पालखी सोहळ्यासाठी गर्दी खूपच असल्याने चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेत हात साफ केला. अनेक महिलांचे दागिने व पाकीट मारले. भाविकांचा मोबाइल चोरताना मढी येथील पोलीस कर्मचारी व गावातील नागरीकांनी चोरट्याला पकडले व चांगलाच चोप दिला. चोरट्याला दगडाने मार देत असताना चुकून तो दगड माजी सरपंच देविदास मरकड यांच्या छातीस लागल्याने ते किरकोळ जखमी झाले. वेळोवेळी गडावर खिसेकापू राजरोस फिरतात. पोलिसांनी त्यांचा कायमचा बंदोबस्त करावा, अशी मागणी भाविकांनी केली.

देवस्थानकडून महाप्रसादाचे वाटप

देवस्थान समितीतर्फे येणाऱ्या भाविकांना दिवसभर महाप्रसाद देण्यात आला. देवस्थानचे अध्यक्ष अण्णासाहेब मरकड, सचिव सुधीर मरकड, कोषाध्यक्ष दत्तात्रेय मरकड, सहसचिव ज्योती मरकड, शिवाजी मरकड, सुनील सानप, सरपंच रखमाबाई मरकड, माजी सरपंच देविदास मरकड, भगवान मरकड, कार्यकारी अधिकारी अशोक पवार, आदींनी भाविकांचे स्वागत केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)