मजूर अड्ड्यासाठी महापालिकेवर धडक

पिंपरी – “”कोण म्हणतंय देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही”, “”कामगार नाका झालाच पाहिजे, आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे”, “”कामगार एकजुटीचा विजय असो” अशा जोरदार घोषण देत, शहरातील हजारो असंघटीत कामगारांनी टिकाव, फावडे, घमेल्यासह बुधवारी (दि. 12) महापालिकेवर धडक दिली.

शहरातील कामगारांना हक्काचा मजूर अड्डा मिळावा या मागणीसाठी शिवसेना प्रणित महाराष्ट्र मजदूर संघटना आणि शहर शिवसेनेच्या वतीने इरफान सय्यद यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी-चिंचवड महापालिकेवर मोर्चा काढला. यामध्ये आमदार ऍड. गौतम चाबुकस्वार, शिवसेनेचे शहर प्रमुख योगेश बाबर, शहर संघटिका सुलभा उबाळे, उपशहर प्रमुख युवराज कोकाटे, आबा लांडगे, समन्वयक रोमी संधू, दस्तगीर मनियार, महाराष्ट्र मजदूर संघटनेचे कार्याध्यक्ष परेश मोरे, उपाध्यक्ष भिवाजी वाटेकर, सचिव प्रवीण जाधव, सहसचिव पांडुरंग कदम, उज्ज्वला गर्जे आदी सहभागी झाले होते.

कामगार टिकाव, फावडे, घमेले घेऊन मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले होते. “ना कायम काम ना धंदा? हिसकावून घेतला आमचा मजूर अड्डा’, “रिक्षा स्टॅन्ड, बस स्टॅन्ड मग मजूर अड्डा का नाही’, “अण्णा भाऊंनी केला मजुरांचा उद्धार, शासन करते त्यांची उपासमार’, “शहरात हातभट्टी अड्डा, जुगार अड्डा, मटका अड्डा मग मजूर अड्डा का नाही’ अशा मजकूराचे फलक आंदोलकांनी हातामध्ये घेतले होते. दरम्यान, शिष्टमंडळाने प्रभारी अतिरिक्त आयुक्त प्रवीण अष्टिकर यांची भेट घेतली. आयुक्तांनी मजूर अड्ड्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले.

इरफान सय्यद म्हणाले की, पिंपरी-चिंचवड शहराची कामगारनगरी अशी ओळख आहे. शहराचा नावलौकिक वाढविण्यात असंघटीत, बांधकाम कामगारांचे मोठे योगदान आहे. आशिया खंडात श्रीमंत महापालिका असे बिरुद असलेल्या महापालिका हद्दीत कामगारांसाठी मजूर अड्डा, मजूर नाका नाही, ही मोठी शोकांतिका आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी मजूर उन, वारा, पावसाची तमा न बाळगता रस्त्यावर उभे राहतात. त्यांच्यासाठी पालिकेने त्वरित पत्राशेड टाकून शहराच्या विविध भागात मजूर अड्‌डा करावा. तसेच पोलिसांनी मजूर अड्ड्यावर कारवाई करण्यापेक्षा शहरात राजरोसपणे चालणाऱ्या जुगार, मटक्‍याच्या अड्ड्यावर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)