मजुरांना मध्यान्ह भोजनाच्या निविदेत “गोलमाल’?

पिंपरी – बांधकाम मजुरांसाठी सरकारने स्थापन केलेल्या इमारत व इतर बांधकाम मजूर कल्याणकारी मंडळाकडे सात हजार कोटींच्या ठेवी पडून आहे. या ठेवींमधून बांधकाम कामगारांना शालेय विद्यार्थ्यांच्या धर्तीवर मजुरांना मध्यान्ह भोजन पुरविण्यासाठी हजारो कोटींच्या निविदा काढण्यात आल्या आहेत. यामध्ये मोठा “गोलमाल’ असून ही निविदा प्रक्रिया रद्द करण्याच्या प्रमुख मागणीसाठी कामगार कल्याण कायालयावर मोर्चा काढला जाणार आहे.

कष्टकरी कामगार पंचायत वतीने रविवारी (दि.25) पिंपरी येथील महात्मा फुले पुतळा येथे बांधकाम मजुरांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात हा निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी कष्टकरी कामगार पंचायत अध्यक्ष बाबा कांबळे, सरचिटणीस धर्मराज जगताप, कोषाध्यक्ष प्रल्हाद कांबळे, शहर अध्यक्ष भीमाशंकर शिंदे, शंकर आव्हाड, अनिल चौधरी, शशिकांत तिडके, संदीपान मुळे आदी उपस्थित होते.

बांधकाम मजूर व त्यांच्या पाल्यांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यासाठी इमारत व इतर बांधकाम मजूर कल्याणकारी मंडळाची स्थापन करण्यात आली आहे. राज्यातील महापालिकांकडून बांधकाम परवाना देताना आकारला जाणारा एक टक्का सेस या महामंडळाकडे जमा केला जातो. गेली अनेक वर्षांपासून ही रक्कम जमा केली जात असल्याने, या मंडळाकडे आता सात हजार कोटींच्या ठेवी जमा झाल्या आहेत. मात्र, कामगार विभागाकडे असलेल्या अपुऱ्या मनुष्यबळामुळे या कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबविल्या जात नाहीत.
या रकमेचा उपयोग बांधकाम मजुरांच्या कल्याणकारी योजनांसाठी करण्याऐवजी महाराष्ट्र शासनाने कामगार खात्या अंतर्गत एक हजार कोटींच्या निविदा काढल्या आहे. यात कामगारांना सेफ्टी साधन पुरविणे, मध्यान्ह भोजन देणे आदी योजनांचा समावेश करण्यात आला आहे. सेफ्टी साधन पुरविणे ही बिल्डरची जबाबदारी आहे आणि ते आता पुरवत आहेत. मजुरांना साईटवर जाऊन मध्यान्ह भोजन देणे शक्‍य नाही यामुळे एक हजार कोटी रुपये ठेकेदाराच्या घशात जाणार आहे. त्यामुळे या निविदा रद्द करून बांधकाम मजुराच्या खात्यावर हे पैसे जमा करावेत, अशी मागणी कष्टकरी कामगार पंचायतने केली आहे.

एक हजार कोटींच्या निविदा रद्द करून हे पैसे बांधकाम मजुराच्या खात्यात जमा न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या मेळाव्या देण्यात आला. 13 डिसेंबर रोजी पिंपरी -चिंचवड शहरातील बांधकाम मजुरांनी पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर एकत्र यावे, असे आवाहन शहराध्यक्ष भीमाशंकर शिंदे यांनी केले.

अवजार खरेदीचे अर्थसहाय्य कधी मिळणार?
नोंदणी झालेल्या बांधकाम मजुरांना अवजारे खरेदीसाठी प्रत्येकी पाच हजार रुपयांचे वाटप मंडळाच्या वतीने सुरु आहे. त्यासाठी मंडळाच्या वतीने अर्ज मागविण्यात आले. दिवाळीपूर्वी सर्व मजुरांच्या बॅंक खात्यात पाच हजार रुपये जमा करण्याचे जाहीर करण्यात आले. प्रत्यक्ष मात्र दिवाळी संपली तरी मजुरांना पाच हजार रुपये मिळाले नाही. सध्या अंमलात असलेल्या योजना बांधकाम मजुरांपर्यंत पोहचत नाही मग एक हजार कोटींची निविदा कशासाठी आणि कोणासाठी काढली जात आहे, असा सवाल बाबा कांबळे यांनी केला आहे. एक हजार कोटींचा भ्रष्टाचार करण्याचा शासनाचा डाव आहे. त्यामुळे ही निविदा रद्द करण्याची मागणी असल्याचे त्यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)