मगरीने ओढून नेलेला सागरचा मृतदेह सापडला

सांगली  – ब्रह्मनाळ (ता. पलूस) येथे आनंदमूर्ती घाटावरून मगरीने ओढून नेलेल्या चौदा वर्षाच्या सागर सिदू डंक या बालकाचा मृतदेह आज सकाळी सापडला. डिग्रज हद्दीत तब्बल चाळीस तासांनी त्याचा मृतदेह आज पाण्यावर तरंगताना दिसून आला. मगरीने मृतदेहाचा कमरेखालचा काही भाग खाल्ला आहे. गेले दोन दिवस वनविभाग, जीवरक्षक टीम आणि ग्रामस्थ सागरचा मृतदेह शोधण्याचा प्रयत्न करत होते. सांगली ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी दाखल होवून पंचनामा केला.

ब्रह्मनाळमध्ये कृष्णा नदीवर असलेल्या आनंदमूर्ती घाटावर दोन दिवसांपुर्वी सायंकाळी मामासोबत गेलेल्या सागर सिदू डंक (रा. हारुगळी क्रॉस, ता. रायबाग कर्नाटक) या शाळकरी मुलास मगरीने ओढून नेले. वनविभाग, ग्रामस्थ, जीवरक्षक टीम यांच्या सहाय्याने नाव, बोटीतून सागरच्या मृतदेहाचा शोध घेण्याचे काम सुरू होते. काल दिवसभर प्रयत्न करुनही सागरचा मृतदेह सापडला नव्हता. आज सकाळी पुन्हा शोधमोहीम सुरु केली.

त्यावेळी डिग्रज हद्दीत सागरचा मृतदेह नदी पात्रात तरंगताना आढळला. तो बाहेर काढण्यात आला. मगरीने मृतदेहाच्या कमरेखालचा भाग खाल्ल्याचे दिसून आले. सांगली ग्रामीण पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी पोचले. त्यांनी पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला. सागरच्या नातेवाईकांना वनविभागातर्फे योग्य ती नुकसान भरपाई देण्यात येईल अशी माहिती वन विभागाच्यावतीने देण्यात आली. तर या कुटुंबाला लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी, तसेच मगरींचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी संदीप राजोबा यांनी केली. वनपरिक्षेत्राचे अधिकारी नितीन काळे आणि त्यांचा स्टाफ, सांगलीचे वनपरिक्षेत्राचे कर्मचारी, वनविभागाचे दक्षता पथक, शेतकरी संघटनेचे संदीप राजोबा यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)