“मंदिर वही बनायेंगे’ हे किती दिवस ऐकायचे?

उद्धव ठाकरे यांचा किल्ले शिवनेरीवरून केंद्र सरकारवर घणाघात

जुन्नर-“मंदिर वही बनायेंगे’ ही घोषणा अनेक वर्षे ऐकत असून भाजप सरकारला साडेचार वर्षे पूर्ण होऊनही जनतेला या मुद्‌द्‌यावर अजून किती दिवस मूर्ख बनविणार आहात? अशी विचारणा शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे केंद्र सरकारला केली.
राम मंदिराच्या निर्माणासाठी वापरण्यात येणाऱ्या किल्ले शिवनेरीवरील पवित्र मातीच्या कलशाचे पूजन शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज (दि. 22) सकाळी किल्ले शिवनेरी गडावर करण्यात आले. यावेळी ते बालत होते. ते म्हणाले “”ताकाला जाऊन भांडे लपविण्याची आम्हाला सवय नसून, निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच राम मंदिराचा मुद्दा आम्ही हाती घेतला आहे. यामागचा उद्देश भांडे लपविण्याचा नसून काही जणांचा भांडेफोड करायचा आहे.”
राम मंदिराच्या मुद्‌द्‌यावरून हिंदू समाजात गट-तट न करता एकी जोपासण्याचे आवाहन ठाकरे यांनी यावेळी केले. यावेळी उपस्थित शिवसैनिकांनी “हर हिंदू की यही पुकार, पहिले मंदिर फिर सरकार’, “जय श्रीराम’ आदी घोषणा दिल्या. पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर शिवसेना आक्रमक झाली असून राममंदिर उभारणीचा प्रश्न भावनिक व राजकीयदृष्ट्या तापवून केंद्र सरकारला जागे करण्याचे काम शिवसेना करत असल्याचे ठाकरे म्हणाले.
शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे शनिवारी (दि. 24) अयोध्येत दाखल होणार असून महाराष्ट्रातून लाखो रामभक्त अयोध्येत दाखल होत असल्याची माहिती तालुकाप्रमुख माऊली खंडागळे यांनी दिली. याप्रसंगी ठाकरे यांच्या हस्ते पाच रुद्राक्षांची रोपे किल्ले शिवनेरीवर लावण्यात आल्याची माहिती सहायक वनसंरक्षक युवराज मोहिते यांनी दिली.
याप्रसंगी शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, आमदार शरद सोनवणे, जिल्हाप्रमुख राम गावडे, युवासेना जिल्हाप्रमुख गणेश कवडे, समन्वयक संभाजी तांबे, उपजिल्हाप्रमुख शरद चौधरी, नगराध्यक्ष शाम पांडे, सभापती ललिता चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य देवराम लांडे, सरपंच बाबू पाटे, उपसभापती दिलीप डुंबरे, पंचायत समिती सदस्य दिलीप गांजळे, जीवन शिंदे, नगरसेवक समीर भगत, दीपेश परदेशी, अंकिता गोसावी, सुवर्णा बनकर, वैभव मलठणकर, प्रसन्ना डोके, संतोष खैरे, शहरप्रमुख शिवा खत्री, संदीप ताजणे, सचिन वाळुंज, विनायक गोसावी आदी मान्यवर उपस्थित होते.

  • तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी अखंड महाराष्ट्र होताना किल्ले शिवनेरीवर कलश पूजन केल्याचा इतिहास असून, आता राम मंदिराच्या उभारणीकरिता शिवजन्मभूमितील माती नक्कीच चमत्कार दाखवेल.
    -शिवाजीराव आढळराव पाटील, खासदार

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)