मंथन : सरकारी अपयशाचा परिपाक (भाग १)

ऍड. असिम सरोदे (कायदेतज्ज्ञ)

राजस्थान मधील भाटेरी गावात राहणाऱ्या भवरीदेवी नामक दलित महिलेवर झालेल्या बलात्कार, अत्याचाराच्या घटनेचा निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने 1997 मध्ये “विशाखा मार्गदर्शक आदेश’ जारी केले. तेव्हापासून कार्यालयीन स्थळी होणाऱ्या लैंगिक छळांची चर्चा मोठ्या प्रमाणावर सुरू झाली. 2013 मध्ये “कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध, बंदी आणि निवारण)’ हा कायदा आला. या कायद्याची आणि त्यातील तरतुदींची अमलबजावणी न झाल्यामुळे, त्याविषयीचे जनप्रबोधन न झाल्यामुळेच “मी टू’ या चळवळीच्या माध्यमातून अनेक स्रिया व्यक्‍त होताना दिसत आहेत.

गेल्या काही दिवसांपासून जगभराबरोबरच देशातही “मी टू’ या चळवळीने जोर धरला आहे. वास्तविक, हे एक समाजमाध्यम आहे. लैंगिक शोषण, अत्याचाराने पीडित असणाऱ्या ज्या स्त्रियांना स्वतःला व्यक्त करता येत नव्हते अशांना व्यक्त होण्याची संधी यानिमित्ताने मिळत आहे. परंतु कायद्याचे अस्तित्व असताना, कायदेशीर प्रक्रिया असताना या सामाजिक माध्यमाचा कितपत वापर करायचा याचे तारतम्य ठेवणे आवश्‍यक आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

वास्तविक, कार्यालयीन स्थळ सुरक्षित आणि चांगल्या वातावरणाचे असणे हा प्रत्येकाचा हक्‍क आहे. त्यामुळेच कार्यालयीन स्थळी होणाऱ्या लैंगिक छळास प्रतिबंध आणि उपाययोजना सुचवणारा कायदा 22 एप्रिल 2013 रोजी अस्तित्त्वात आला आणि लगेचच या कायद्याच्या अमलबजावणीची प्रक्रिया ठरवणारे नियमही अस्तित्त्वात आले. हा कायदा दिवाणी स्वरुपाचा आहे. यामध्ये “लैंगिक छळ’ असा शब्द वापरण्यात आला असला तरीही केवळ लैंगिक छळ एवढाच त्याचा मर्यादित अर्थ नसून स्री असल्यामुळे सहन करावा लागणारा लिंगधारित छळ असा व्यापक अर्थ कायद्याने गृहित धरला आहे.

एखाद्या स्रीला तिच्या नोकरीत विशेष वागणूक देण्याचे प्रत्यक्षपणे वचन देणे किंवा तसे करणार असल्याचे दाखवणे, त्याबदल्यात विशेष संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करणे, तिने मनाप्रमाणे ऐकले नाही तर तिला अपायकारक वागणूक देण्यात येईल व तिच्या नोकरीवर गदा आणण्यात येईल अशी थेट अथवा अप्रत्यक्ष धमकी देणे, तिच्याबद्दल अपमानकारक मजकूर बोलणे- पसरवणे व तिला कार्यालयीन स्थळ म्हणजे प्रतिकूल वातावरण आहे अशी तिची मनःस्थिती करणे हे सर्व प्रकार कार्यालयीन स्थळी होणाऱ्या लैंगिक छळाची उदाहरणे आहेत. याखेरीज आक्षेपार्ह लैंगिक वर्तन, टोमणे मारणे, एखादी चुकीची मागणी करणे, मागणी पूर्ण न केल्यास भेदभावाचे वातावरण तयार करणे, भयभीत करणारा असा मानसिक व मनोशास्री हिंसाचारही कार्यालयीन स्थळी लैंगिक अत्याचार ठरतो.

या कायद्यानुसार कार्यालयीन स्थळ म्हणजे काय याची व्यापक व्याख्या करण्यात आली आहे. त्यामुळे कोणतीही महिला जिचे कामाचे नाते आहे, कोणत्याही वयाची असली तरी या कायद्याचा वापर करू शकते. या कायद्यानुसार नोकरीस ठेवणाऱ्या व्यक्‍तीने किंवा कंपनीने एका अंतर्गत तक्रार समितीचे गठन करून कार्यालयीन स्थळी होणाऱ्या लैंगिक गैरवर्तनाची चौकशी करावी, अशी अपेक्षा आहे. 10 किंवा त्याहून अधिक कर्मचारी असतील अशा ठिकाणी ही अंतर्गत समिती असायला हवी. केवळ 10 पुरुष किंवा स्रिया असतील तरीही कार्यालयीन स्थळी लैंगिक छळ या कायद्यानुसार अंतर्गत समिती असणे आवश्‍यक आहे. पण आज कित्येक कार्यालयांमध्ये अशा समित्याच अस्तित्त्वात नाहीयेत.

महिलांविरुद्ध होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या घटना थांबवण्यासाठी 1997 मध्ये भरवरीदेवी खटल्याच्या निकालामध्ये सर्वोच्च न्यायालयाने “विशाखा मार्गदर्शक आदेश’ दिले होते आणि सर्व सार्वजनिक आणि खासगी कामाच्या ठिकाणी “तक्रार निवारण समिती’ बनवणे बंधनकारक करण्यात आले होते. याचाच अर्थ अंतर्गत समित्यांबाबतचे निर्देश येऊन 21 वर्षे उलटून गेली तरीही याकडे बहुतांश आस्थापनांनी पाठच फिरवली असल्याचे दिसते. खरे पाहता मालकाने अथवा जबाबदार अधिकाऱ्याने तक्रार समिती स्थापन केली नाही किंवा स्थापन झाल्यावर आलेल्या तक्रारींची नोंद, चौकशी आणि सूचना यांचे पालन योग्य प्रकारे केले नाही तर त्याला 50 हजार रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. पण अशा प्रकारच्या कारवायाही झाल्याचे ऐकिवात येत नाही.

2013 मध्ये अस्तित्त्वात आलेला कार्यालयीन स्थळी लैंगिक छळ प्रतिबंधक कायदा हा दिवाणी स्वरुपाचा असल्याने फौजदारी कायदा किंवा पोलीस यांचा या कायद्यानुसार झालेल्या तक्रारीबाबत काहीच संबंध नसतो. तथापि, एखाद्या प्रकरणामध्ये कार्यालयीन स्थळी हिंसाचारासोबतच अन्य गंभीर फौजदारी आरोप असतील तर केवळ तेवढ्याच स्वरुपात पोलिसांची भूमिका मर्यादित असते. घटनेतील गांभीर्यानुसार फौजदारी तक्रार पोलिसांकडे करण्याचे मार्ग स्री वापरु शकते. भारतीय दंड विधानातील कलम 354 (अ) नुसार 1 ते 3 वर्षे शिक्षा किंवा दंड किंवा दोन्हीही अशी शिक्षा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)