#मंथन: झिंगाडाची ‘घरवापसी’ का महत्वाची? (भाग २)

श्रीकांत देवळे 
कुप्रसिद्ध डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक मुन्ना झिंगाडा याला भारताच्या ताब्यात देण्यात येणार आहे. थायलंडच्या न्यायालयात पाकिस्तानने तो आपला नागरिक असल्याचे स्पष्ट करण्यासाठी आटापिटा केला. परंतु भारताने सज्जड पुरावे सादर केल्यामुळे मुन्नाचा ताबा मिळविण्याचे पाकिस्तानचे प्रयत्न फसले. मुंबई गुन्हे शाखा आणि थायलंडमधील भारतीय दूतावासाचे अधिकारी याबाबत कौतुकास पात्र असून, झिंगाडा ताब्यात आल्यानंतर दाऊद आणि आयएसआयचे अनेक कारनामे उघड होणार असल्याने पाकिस्तान चिंतेत आहे. 
यासंदर्भात मुंबई पोलिसांच्या पथकाने अनेकदा बॅंकॉक वाऱ्याही केल्या होत्या. सर्व पुरावे झिंगाडा हा भारतीय नागरिक असल्याचे स्पष्ट करणारे होते; त्यामुळे भारताच्या बाजूनेच थायलंडच्या न्यायालयाचा निकाल लागेल, अशी खात्री भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाला होती. दुसरीकडे, पाकिस्तान पहिल्यापासूनच चिंतेत होता. झिंगाडा जर भारताच्या हाती लागला, तर दाऊद इब्राहिम आणि आयएसआय यांच्या कारस्थानांची माहिती भारताला मिळेल, ही धास्ती पाकिस्तानला होती. त्यामुळे झिंगाडाला ताब्यात घेण्यासाठी पाकिस्तानने सर्व यंत्रणा पणाला लावली होती.
दरम्यान, भारताकडून दिले गेलेले डीएनए नमुने न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. झिंगाडाचा शाळा सोडल्याचा दाखला, मुंबईत जन्माला आलेल्या त्याच्या पहिल्या मुलाचे जन्म प्रमाणपत्र आणि झिंगाडाच्या मतदान ओळखपत्रासह एक अहवाल भारताकडून थायलंडच्या अधिकाऱ्यांना पाठविण्यात आला होता. थायलंडमधील भारतीय दूतावासातील अधिकारी सातत्याने या प्रकरणाचा पाठपुरावा करीत राहिले. अखेर थायलंडच्या न्यायालयाने झिंगाडाच्या डीएनए चाचणीचा आदेश दिला. त्याचा डीएनए मुंबई गुन्हे शाखेने पाठविलेल्या नमुन्यांशी जुळला. परंतु पाकिस्तान स्वस्थ बसणार नव्हता.
भारताच्या दाव्यांना आव्हान देऊन पाकिस्तानने झिंगाडाच्या पत्नीचा पत्ता आणि झिंगाडाची मुले ज्या शाळेत शिकतात, त्यासंबंधीची कागदपत्रे थायलंड न्यायालयात सादर केली. भारताने तर खुद्द झिंगाडा याचाच इस्माईल युसूफ स्कूलमधील शाळा सोडल्याचा दाखला सादर केला होता. त्यावरून तो भारतीय नागरिक असल्याचे स्पष्ट होतच होते. तथापि, डीएनए नमुन्यांचा अहवाल हा झिंगाडाविरुद्धचा सर्वांत ठोस पुरावा ठरला. या प्रकरणाचा निकाल भारताच्या बाजूने लागण्याचे सर्व श्रेय मुंबई पोलिस आणि थायलंडमधील भारतीय दूतावासाच्या अधिकाऱ्यांना द्यायला हवे.
झिंगाडाविरुद्ध मुंबईत जबरदस्तीने खंडणी वसुली, धमकी देणे याव्यतिरिक्त गंभीर गुन्ह्यांची एकंदर सात प्रकरणे दाखल आहेत. सन 2000 मध्ये त्याने कुटुंबीयांसह मुंबईतील बस्तान हलविले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याच वेळी तो पाकिस्तानात गेला आणि त्याच्या दुसऱ्या मुलाचा जन्म तिथेच झाला. सन 2001 मध्ये थायलंडच्या पोलिसांनी झिंगाडाला अटक केली होती आणि छोटा राजनवर झालेल्या गोळीबार प्रकरणातील त्याच्या सहभागाबद्दल त्याला आठ वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली होती. त्याच वेळेपासून त्याच्या प्रत्यार्पणासाठी भारत आणि पाकिस्तानदरम्यान रस्सीखेच सुरू होती. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेला तर एका क्षणी असे वाटले होते की, प्रकरण आपल्या हातून निसटून जाईल.
कारण गेल्या वर्षी झिंगाडाचे कुटुंब जोगेश्‍वरी येथील घर सोडून गायब झाल्याचे उघड झाले होते. ही सर्व मंडळी पाकिस्तानात गेली असावीत, अशी शंका उत्पन्न होत होती. असे खरोखर झाले असते, तर मुंबई पोलिसांची सर्व मेहनत वाया गेली असती. परंतु झिंगाडाचे कुटुंबीय भारतातच असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर मुंबई पोलिसांचा जीव भांड्यात पडला. वस्तुतः भारतातील माध्यमांचे लक्ष वेधले गेल्यामुळे त्यांचा ससेमिरा टाळण्यासाठी या कुटुंबाने जोगेश्‍वरीतील मुक्काम हलवला होता. मुन्ना झिंगाडाच्या प्रत्यार्पणाची तयारी पूर्ण झाली असून, लवकरच त्याला भारतात आणण्यात येईल. त्याची ही “घरवापसी’ पाकिस्तानसाठी मोठी डोकेदुखी ठरणार असल्यामुळे तो भारतात येण्याची सर्वांनाच प्रतीक्षा आहे.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)