#मंथन : घाटरस्त्यांचे मृत्यूवळण (भाग 1)

अशोक शहाणे (सातारा)

पोलादपूर ते महाबळेश्‍वरदरम्यान असलेल्या आंबेनळी घाटरस्त्यावरून बस दरीत कोसळून तीसपेक्षा अधिक जणांना प्राण गमवावे लागले. मृतांचा आकडा मोठा असल्यामुळे अपघाताच्या वृत्ताने सर्वांत आधी धक्का बसला. नंतरच अपघाताच्या संभाव्य कारणांची चर्चा सुरू झाली. सह्याद्रीच्या अवघड घाटांमधून पावसाळ्यात वाहन चालविणे अत्यंत जिकिरीचे असते. त्यामुळे मानवी चुका टाळण्यासाठी सावधगिरी हवीच. त्याचप्रमाणे घाटरस्ते सुरक्षित करण्याची जबाबदारी प्रशासनानेही वेळीच ओळखावी. 

कोकण आणि घाटमाथा यादरम्यानचा प्रवास जितका रंजक तितकाच धोकादायक. पोलादपूर ते महाबळेश्‍वर यादरम्यान आंबेनळी घाटात नुकत्याच झालेल्या भीषण अपघाताने ते सिद्ध केले आहे. निसर्गसौंदर्याने बहरलेल्या या घाटाची अवघड चढण, धोकादायक वळणे, पाऊस आणि धुके यामुळे चालकाच्या संयमाचा कस पाहणारा हा प्रवास आहे. कोकण कृषी विद्यापीठामधील कर्मचाऱ्यांची बस या घाटातून सातशे फुटांहून अधिक खोल दरीत कोसळली आणि एक प्रवासी वगळता सर्वच्या सर्व म्हणजे तीसपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना मृत्यूने गाठले. ज्या ठिकाणी हा अपघात झाला, तिथून खाली सरळ उभा कडा आहे. पश्‍चिम घाटातील असे बरेच कडे पाहताक्षणी धडकी भरवतात. घाटातून जाताना कड्यांचे अक्राळविक्राळ रूप सावधपणे प्रवास करण्यास भाग पाडते. त्यातच घाटात बऱ्याच ठिकाणी कठडे नसल्याची तक्रार अपघातानंतर करण्यात आली आहे. डोंगरकड्यावरून लाल माती वाहून रस्त्यावर येते. या ओल्या मातीवरून चाके घसरण्याचा धोका असतो. मुसळधार पाऊस सुरू झाला की, वाहनचालकाला पुढील काही दिसेनासे होते. धुके असल्यास अडचणी आणखी वाढतात. अशा ठिकाणी तीसहून अधिक लोकांचा खोल दरीत करुण अंत होणे अत्यंत वेदनादायी आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अपघात झाल्यानंतर मदतकार्यात किती अडथळे आले, हे जरी आपण पाहिले तरी अपघातस्थळाची दुर्गमता लक्षात येते. खोल दरीत दोराच्या साह्याने उतरावे लागत होते. तेथून छिन्नविच्छिन्न अवस्थेतील मृतदेह कापडाच्या पोत्यासारख्या पिशवीत बांधून दोराच्या साह्याने हळूहळू वर चढवावे लागत होते. राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाची (एनडीआरएफ) तुकडी घटनास्थळी पोहोचली, तेव्हा अपघाताला बरेच तास उलटून गेले होते. परंतु तोपर्यंत हिकमतीनं मदतकार्य करणारे महाबळेश्‍वरचे ट्रेकर्स खऱ्या अर्थाने कौतुकास पात्र आहेत. महाबळेश्‍वर ट्रेकर्स आणि सह्याद्री ट्रेकर्स अशा दोन संस्थांचे प्रतिनिधी जीवाची पर्वा न करता कड्यावरून खाली उतरले. बसच्या फुटलेल्या काचा पायात जाऊन ते जखमी झाले. निसरड्या डोंगरावरून पाय घसरला तर खोल दरीत मृत्यू टपून बसलेला. अशा स्थितीत बसमधील कुणी जीवित असल्यास त्याला मदत करणे आणि मृतदेह बाहेर काढणे हे काम करणाऱ्यांचे आभार मानावे तितके थोडेच आहेत. ड्रोन कॅमेऱ्याच्या साह्याने अपघातस्थळाचे जे चित्रीकरण उपलब्ध झाले आहे, त्यात बसचे छत आधी उडून पडले आणि पुढे थोड्या अंतरावर दाट झाडी आणि ओबडधोबड खडकांमुळे बसचा उर्वरित भाग कसाबसा अडकून राहिला. त्या ठिकाणापासून पुढे अक्षरशः नव्वद अंशाच्या कोनात अशी खोल दरी आहे, जी पाहताच डोळे फिरतात. बस दरीत कोसळताच लोक इतस्ततः फेकले गेले असणार, हे अपघातस्थळ पाहून लगेच लक्षात येते. अशाच प्रकारे फेकला गेलेला कृषी विद्यापीठाचा एक कर्मचारी जेव्हा दरीतून वर आला, तेव्हाच अपघाताची माहिती समजली. रस्त्यातून जाणाऱ्या एका वाहनचालकाकडून मोबाइल घेऊन त्याने दापोलीला अपघाताची माहिती कळवली.

दापोलीच्या कोकण कृषी विद्यापीठातील हे सर्व कर्मचारी जेव्हा सहलीला निघाले, तेव्हा त्यांचा सकाळचा ग्रुप फोटो पाहून सारेचजण हळहळले. कारण हाच त्यांचा शेवटचा ग्रुप फोटो ठरला. या कर्मचाऱ्यांचा एक व्हॉट्‌स ऍप ग्रुप आहे. सहलीला येऊ न शकलेल्यांना सहलीचे फोटो ही मंडळी पाठवत होती. सकाळी साडेनऊनंतर अचानक फोटो ग्रुपवर येणे बंद झाले. कदाचित नाश्‍त्यासाठी हे लोक कुठेतरी थांबले असतील, असा अंदाज ग्रुपच्या अन्य सदस्यांनी बांधला. परंतु पावणेअकराच्या सुमारास सहलीला गेलेल्या सर्वांवर काळाने झडप घातलेली होती. बऱ्याच वेळानंतर म्हणजे बारानंतर ही माहिती जेव्हा दापोलीत समजली तेव्हा हाहाकार उडाला. सहलीला गेलेल्यांच्या नातेवाइकांनी घटनास्थळी आणि पोलादपूरच्या ग्रामीण रुग्णालयाकडे धाव घेतली. जसजसे मृतदेह दरीतून बाहेर काढले जात होते, तसतसे ते पोलादपूरच्या रुग्णालयात पाठविले जात होते. प्रत्येक वेळी मृतदेह दरीबाहेर काढल्यावर आणि रुग्णालयात नेल्यावर संबंधिताचे नातेवाईक आक्रोश करीत होते. घटनास्थळी काही राजकीय नेतेमंडळींनीही धाव घेतली. काही नेते स्वतः मदतकार्यात सहभागी झाल्याचीही दृश्‍ये टीव्हीवर पाहायला मिळाली.

पोलादपूरच्या आंबेनळी घाटातला अपघात झाल्यानंतर बराच वेळ मृतांच्या आकड्यामुळे केवळ धक्‍क्‍याच्या स्थितीतच सर्वजण होते. अपघाताची भीषणता पाहता कोणीही जीवित बचावले असणे शक्‍य नव्हते. त्यामुळे तीसहून अधिक व्यक्तींचा बळी घेणाऱ्या या अपघाताचा धक्का मोठा होता. तो काहीसा कमी झाल्यानंतरच अपघाताच्या संभाव्य कारणांचा शोध सुरू झाला. अद्याप यासंदर्भात ठोस माहिती उपलब्ध झालेली नसली, तरी वळणावर मातीवरून टायर घसरल्यामुळे बस नियंत्रित करणे चालकाला शक्‍य झाले नसावे आणि कठडा नसल्यामुळे बस दरीत कोसळली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला. अशा कोणत्याही भीषण अपघाताची कारणे शोधण्यामागे अशी दुर्घटना पुन्हा होऊ नये, ही इच्छा असते आणि असायला हवी.

#मंथन : घाटरस्त्यांचे मृत्यूवळण (भाग 2)


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)