#मंथन : घाटरस्त्यांचे मृत्यूवळण (भाग 2)

अशोक शहाणे (सातारा)

पोलादपूर ते महाबळेश्‍वरदरम्यान असलेल्या आंबेनळी घाटरस्त्यावरून बस दरीत कोसळून तीसपेक्षा अधिक जणांना प्राण गमवावे लागले. मृतांचा आकडा मोठा असल्यामुळे अपघाताच्या वृत्ताने सर्वांत आधी धक्का बसला. नंतरच अपघाताच्या संभाव्य कारणांची चर्चा सुरू झाली. सह्याद्रीच्या अवघड घाटांमधून पावसाळ्यात वाहन चालविणे अत्यंत जिकिरीचे असते. त्यामुळे मानवी चुका टाळण्यासाठी सावधगिरी हवीच. त्याचप्रमाणे घाटरस्ते सुरक्षित करण्याची जबाबदारी प्रशासनानेही वेळीच ओळखावी. 

#मंथन : घाटरस्त्यांचे मृत्यूवळण (भाग 1) 

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दुर्घटना धक्का देतात, दुःख देतात, अनेक कुटुंबांमधील कर्त्या व्यक्ती अपघातात मृत्युमुखी पडल्यामुळे अपघाताचा एक क्षण त्या कुटुंबांच्या जीवनात अंधार करून जातो. हा क्षण मानवी चुकीने ओढवलेला असो किंवा अपुऱ्या व्यवस्थेमुळे ओढवलेला असो. तो एकच क्षण संपूर्ण आयुष्यावर परिणाम करणारा ठरतो. म्हणूनच अपघातांची कारणे शोधून ती टाळण्याचा प्रयत्न करायला हवा. जीवनाचा वेग वाढत चालला असल्याचे वारंवार सांगितले जाते. या वेगाचे समर्थनही केले जाते. परंतु वाहतुकीच्या वेगाशी त्याची गल्लत केली जाते, हे योग्य नाही. वाढता वेग आणि वाढती वाहतूक यांचा भार पेलण्यासाठी आपल्याकडे मोठमोठे महामार्ग बांधण्याचे काम अगदी युद्धपातळीवर सुरू असते. परंतु अस्तित्वात असलेल्या रस्त्यांकडे मात्र फारसे लक्ष दिले जात नाही. मध्यंतरीच्या पावसात मुंबई, ठाणे, कल्याण परिसरात केवळ खड्ड्यांमुळे झालेल्या मृत्यूंचा विषय खूपच गाजला. नवे रस्ते बांधण्यामागे बऱ्याच वेळा व्यावसायिक दृष्टिकोन असतो. या नव्या महामार्गांवरील वाहतूक सशुल्क असते आणि रस्तेबांधणी करणाऱ्या कंत्राटदारांपासून सर्वांना केवळ त्यातच रस असतो.

सत्तास्थानी बसलेले राजकारणी या नव्या रस्त्यांकडे बोट दाखवून आपण केलेला “विकास’ छाती ठोकून सांगत राहतात. मात्र, निःशुल्क वाहतूक असलेल्या रस्त्यांच्या अवस्थेकडे कोणाचेही लक्ष नसते. सामान्यतः राजमार्ग आणि अंतर्गत रस्त्यांची ठिकठिकाणी चाळण झालेली पाहायला मिळते. आंबेनळी घाटातील रस्ता तुलनेने चांगला असला, तरी वारंवार कोसळणारी दरड आणि डोंगरउतारावरून वाहून येणारी माती यामुळे हा घाटरस्ता पावसाळ्यात धोकादायक बनतो. वर्षानुवर्षे हा रस्ता वापरात आहे. कोकणातून घाटमाथ्यावर येण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या रस्त्यांमधील हा घाट महत्त्वाचा असूनसुद्धा इतकी वर्षे या घाटाला कठडे बांधले गेले जाऊ नयेत, याचे वैषम्य वाटते. एखादी दुर्घटना घडल्यानंतरच जागे होण्याची आमची वृत्ती अशीच राहणार असेल, तर मग प्रश्‍नच मिटला. परंतु कठडा असता, तर आंबेनळी घाटातील ही भीषण दुर्घटना टळली असती, ही वस्तुस्थिती आहे. किमान अपघाताची तीव्रता कमी करण्याचे काम तरी घाटांचे कठडे करतातच.

पावसाळ्यातील प्रवास या गोष्टीकडेही गांभीर्याने पाहायला हवे, असे ही दुर्घटना सांगते. आजकाल सुबत्ता असलेल्या घरांमध्ये पावसाळी सहलींना जाण्याचे फॅड वाढत चालले आहे. पूर्वी कधीच दिसत नव्हती, इतकी गर्दी आपल्याला
पावसाळी पर्यटनस्थळांवर दिसून येते. अशा ठिकाणी वाहतुकीची कोंडी होईपर्यंत गर्दी वाढते. परंतु या ठिकाणांकडे जाणारे सगळे रस्ते पावसाळ्यात सुरक्षित असतात का? तेथील परिस्थितीचा अंदाज चालकांना खरोखर असतो का? हे प्रश्‍न आंबेनळी घाटातील अपघाताच्या निमित्ताने चर्चिले जायला हवेत.

पश्‍चिम घाट ही महाराष्ट्राला लाभलेली देणगी आहे. गुजरातमधील भरोचपासून केरळमधील मुन्नारपर्यंत पसरलेली ही पर्वतरांग जगातील पर्यावरणीय हॉट स्पॉट म्हणून प्रसिद्ध आहे. परंतु या पश्‍चिम घाटाची रचना नीट समजून घ्यायला हवी. काळ्या कातळाचे उभे कडे एकीकडे दिसत असतात, तर दुसरीकडे ठिसूळ लॅटराइट खडकापासून बनलेली लाल मातीही दिसत असते. ही माती उतारावरून वाहून रस्त्यावर येते. ती काळ्या मातीच्या तुलनेत चिकट असते आणि त्यावरून वाहन घसरण्याच्या शक्‍यता अधिक असतात. त्याचप्रमाणे पश्‍चिम घाटाच्या भागात कोसळणाऱ्या पावसात वाहन चालवताना पुरेसे गांभीर्य आणि क्षणोक्षणी दक्षताच महत्त्वाची.

नजर हटवणारा एक क्षणही अपघातासाठी पुरेसा ठरतो. या भागातील पाऊस साधा नसतो. अनेक चालकांनी तर एवढा पाऊस कधी पाहिलेलाही नसतो. त्यात धुके दाटून आलेले असेल, तर चालकाच्या अडचणींमध्ये भर पडते. त्यामुळे, पावसाळ्यातील सहली जरा जपूनच कराव्यात, एवढा धडा या अपघातातून सर्वसामान्यांनी घ्यावा आणि पावसाळ्यात घाटरस्त्यांकडे सातत्याने लक्ष ठेवले पाहिजे, एवढा धडा प्रशासनाने घ्यावा हेच बरे!


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)