‘मंत्र’ चा म्युझीक आणि टीजर लॉंच सोहळा उत्साहात संपन्न

ड्रीमबुक प्रॉडक्शन्सने वेदार्थ क्रिएशन्सच्या मदतीने तयार केलेला, हर्षवर्धन लिखित आणि दिग्दर्शित मराठी चित्रपट ‘मंत्र’ लवकरच सिनेरसिकांच्या भेटीला येत असून त्याचा म्युझीक आणि टीजर लॉंच सोहळा मोठ्या उत्साहात मुंबईत पार पडला. आजच्या काळातला अत्यंत संवेदनशील विषय ‘मंत्र’ या चित्रपटात फारच संतुलितपणे मांडण्यात आला आहे. एका पुरोहिताचा मुलगा पैशासाठी वडिलांचा पेशा स्वीकारतो पण जेव्हा त्याच्या आयुष्यात कर्मकांडाला न मानणारी मुलगी येते तेव्हा ‘मंत्र’ची कथा घडते. लेखक, दिग्दर्शक हर्षवर्धन यांनी ‘मंत्र’च्या माध्यमातून आजच्या तरुणाईचा अध्यात्मिक विषयावरचा गोंधळ नेमकेपणाने मांडला आहे.

या चित्रपटात अभिनेता सौरभ गोगटे आणि दीप्ती देवी प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत. अभिनेता पुष्कराज चिरपुटकर पुरोहिताच्या भूमिकेत दिसणार आहे तर ज्येष्ठ अभिनेते मनोज जोशी हे ही एका वेगळ्याच भूमिकेत रसिकांसमोर येणार आहेत. सिद्धेश्वर झाडबुके, सुनील अभ्यंकर, धीरेश जोशी, राजेश काटकर यांच्यासारख्या कसलेल्या कलाकारांसोबत शुभंकर एकबोटे आणि सुजय जाधव सारखे तरुण आणि नवे चेहरेही यात पहायला मिळतील. वृषाली काटकर, अनुराधा मराठे आणि शुभांगी दामले यांचीही कामं लक्षात राहतील अशी झाली आहेत.

‘मंत्र’ या चित्रपटला अविनाश – विश्वजित या संगीतकार जोडीने संगीत दिले आहे. चित्रपटात एक वेस्टर्न बाजाचे गाणे, पुण्याची ओळख बनलेल्या ढोल ताशाचे एक गाणे आणि एक विरह गीत असे वेगवेगळ्या जॉनरचे संगीत ऐकायला मिळणार आहे. तसेच ‘मंत्र’च्या शीर्षक गीतासाठी विनया क्षीरसागर यांनी संस्कृत मध्ये गीत लिहिले आहे. अजय गोगावले, अवधूत गुप्ते, रोहित राऊत, धवल चांदवडकर आणि विश्वजित जोशी यांनी ‘मंत्र’ साठी पार्श्वगायन केले आहे. पार्श्वसंगीतात ३ संस्कृत काव्यासह पाश्चात्य आणि भारतीय संगीताचा उत्कृष्ठ मिलाफ जमवलेला आहे.

या चित्रपटाचे संकलन व स्पेशल इफेक्ट सचिन पंडित यांनी केले आहेत, तर कलादिग्दर्शन रजनीश कलावंत यांनी केले आहे. या चित्रपटात अत्यंत सुंदर लोकेशन्स वापरण्यात आले आहेत, यामध्ये पुण्यातील प्रसिद्ध नागेश्वर मंदिर, बलभीम मंदिर, सातारा जवळच्या लिंबगाव मंदिराचा सामावेश आहे. पुण्याच्या PIFF २०१८ (PUNE INTERNATIONAL FILM FESTIVAL) ला मंत्र ची निवड झाली होती. त्यावेळी प्रेक्षकांचा आणि समीक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. इफ्फीच्या ज्युरींनीही ‘मंत्र’च्या मांडणीला विशेष दाद दिली. बहुचर्चित विषयावर वेगळ्या अर्थाने भाष्य करणारा ‘मंत्र’ येत्या १३ एप्रिल २०१८ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
16 :thumbsup:
3 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
1 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)