मंत्र्यांनी किमान पाटग्रस्त शेतकऱ्यांची बाजू तरी ऐकावी

File photo

प्रा. डी. के. वैद्य
अकोले: आश्‍वासने देऊन ती पाळायची नसतात’ हा राजकारण्यांचा स्थायीभाव बनलेला आहे. अकोले तालुक्‍यातील पाटग्रस्त शेतकऱ्यांना बैठकीचे आश्‍वासन देऊनही त्यांची बैठक न घेण्याचा उद्धटपणा मंत्रिमहोदयांनी दाखवला आहे. त्यामुळे अकोले तालुक्‍यातील पाटग्रस्त शेतकऱ्यांचे किमान म्हणणे ऐकून तरी घ्या, अशाप्रकारची विनवणी या शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

यासंदर्भात कालचा औरंगाबादचा ‘धडाकेबाज मोर्चा’ हा त्यांच्या सुप्त भावनांचा झालेला स्फोट आहे. त्यामुळे हा स्फोट होण्यापूर्वीच अधिकाऱ्यांनी समोरच्या शेतकऱ्यांच्या समवेत बैठक लावावी आणि अकोले तालुक्‍यातील बंदिस्त कालवे होण्याच्या दृष्टीने त्यांचे म्हणणे ऐकण्यासाठी वातावरण तयार करावे, अशा प्रकारची मागणी पुढे येत आहे. राज्याच्या शेजारी गुजरातमध्ये दहा फूट व्यासाचे बंदिस्त पाईप कालवे कार्यान्वित होत आहेत. तेच सूत्र गुंजवणी, चिलेवाडी, टेंभू, कुकडी, खडकवासला या धरणांच्या बाबतही धोरण राबवले जाण्याची शक्‍यता दिसून येत आहे. असेच असेल तर असे बंदिस्त पाईप कालवे व्हावेत, असा अकोले तालुका स्वाभाविक प्रश्‍न उपस्थित करणे गैर ठरणार नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आधुनिक तंत्रज्ञान जर बंदिस्त पाईप कालव्यांसाठी वापरले गेले, तर त्याने मोठी क्रांती होईल. अकोले तालुक्‍याने भंडारदरा धरणाचे बारमाही पाणी संघर्ष करून मिळवले, तर निळवंडे धरण होताना प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी लोकप्रतिनिधी म्हणून माजी मंत्री मधुकरराव पिचड यांची खऱ्या अर्थाने दमछाक झाली. मग या प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी लाभार्थी कोपरगाव, राहाता, राहुरी, श्रीरामपूर, सिन्नर, नेवासे या तालुक्‍यांनी पुढाकार घेण्यास काय हरकत आहे? 11.39 टीएमसीच्या भंडारदरा धरणात जसा तालुक्‍याला 11.70 टक्के हिस्सा मिळाला. तसाच निळवंडेत 8. 32 टक्के हिस्सा आम्हाला मिळ द्या व कालवे होऊ द्या, असा पवित्रा तालुक्‍यातील लोकप्रतिनिधींसह सामान्य पाटग्रस्त शेतकऱ्यांनी घेतला आहे. भंडारदरा धरणाच्या सिंचनाखाली 4235 हेक्‍टर जमीन आली आहे, तर निळवंडे धरणाच्या नावाखाली 2328 हेक्‍टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे, ही बाब ध्यानात घेतली, तर भंडारदरा आणि निळवंडे यांचे संयुक्त जलव्यवस्थापन केले, तर अकोले तालुक्‍याला 630 मीटर तलांका वरून उच्चस्तरीय कालव्यांना फेब्रुवारी महिना अखेरपर्यंत पाणी देता येईल. जर घडले नाही अकोले तालुक्‍याला या दोन्हीही धरणांचा फायदा होणार नाही, अशी शेतकऱ्यांची मानसिकता आहे.

प्रवाही कालव्यांना तालुक्‍यातील जनतेने त्यातल्या त्यात पाटग्रस्त शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. जर निळवंडे 0 ते 18 ते 0 ते 28 किलोमीटर या अनुक्रमे उजव्या व डाव्या कालव्यांमधून वरून खाली प्रवाही पद्धत राबवली गेली, तर दुर्दैवाने असंख्य शेतकरी त्यातल्या त्यात अल्पभूधारक भूमिहीन होणार आहेत. उच्चस्तरीय डाव्या कालव्याच्या खाली 871 व उजव्याखाली 1457 असे एकूण 2328 हेक्‍टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. म्हणजेच उच्चस्तरीय खाली येणारे हे क्षेत्र फेब्रुवारीपर्यंत पाणी मिळाले नाही तर ते कोरडेच राहणार आहे. म्हणून संयुक्त लाभक्षेत्राची फेररचना भंडारदरा निळवंडे धरणाच्या लाभक्षेत्रात करण्याची गरज निर्माण झाली आहे.बुडीत क्षेत्रात कोंहडी,पिंपळगाव नाकविंदा, दिगंबर या शासकीय खर्चाच्या उपसा सिंचन योजना सध्या बंद आहेत. पण या उपसा सिंचन योजनांचे पाणी आरक्षित राहणार आहे का ? किंवा निळवंडे ते कळस या दरम्यान भंडारदरा धरणामुळे उपसा सिंचन योजना खाली जे 2889 हेक्‍टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. त्यासाठी 462 दशलक्ष घनफूट पाणी हे कोणत्या हिशेबात धरले जाणार आहे? अशा प्रकारचा सवाल येथे उपस्थित केला जात आहे.

आजोबांनी भूसंपादनाचे पैसे घेतले. आजोबा एक तर दिवंगत झाले आहेत. जे हयात आहेत, कारभार त्यांच्या हातात नाही. आजोबांचा मुलगाही बाजूला झाला आहे. आणि तंत्रज्ञानाचा मंत्र जपत नातू या लढ्यात उतरले आहेत. जे अधिकारी आज खुर्चीवर बसले आहेत, ती सुद्धा शेतकऱ्यांचीच मुले आहेत. किमान त्यांनी धरणाची जागा बदलली. 91 मीटर निळवंडे क्रमांक एकची उंची वाढली. त्याप्रमाणे कालवे जागा बदल गरजेचे नाही का? असा लोकप्रतिनिधी व इथल्या शेतकऱ्यांचा सवाल आहे. शिर्डीचे 500 कोटी वापरले जाणार व त्याबदल्यात शिर्डी, कोपरगावला निळवंडेचे पाणी देण्याला हरकत नाही. पण गोदावरी खोऱ्यातील पाण्याचा हक्क या लोकांनी सोडला आहे का? असे जर नसेल तर पहिल्यांदा अपूर्ण कामे पूर्ण करा. उच्चस्तरीय कालवे पूर्ण करा. म्हाळादेवी जलसेतू मार्गी लावा. पिंपरकणेचा पूल पूर्ण करा. निळवंडेचा पॉवर हाऊसने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मोबदला द्या. त्यासाठी जलसंपदामंत्री गिरीश महाजन व राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्यासमवेत बैठक लावा, अशीच एक माफक अपेक्षा पाटग्रस्त शेतकऱ्यांची आहे. (क्रमशः)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)