मंत्र्यांनाही आता लांबूनच करावे लागणार नमो नम:

मोदींजवळ जाण्यासाठी घ्यावी लागणार एसपीजीची परवानगी


गृह मंत्रालयाने सुरक्षेला ऑल टाईम हाय धोका असल्याचे दिले कारण

नवी दिल्ली – कुठल्याही कार्यक्रमावेळी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जवळ जाणे महामुश्‍किल बनणार आहे. मंत्री आणि अधिकाऱ्यांनाही मोदींजवळ जाण्यासाठी स्पेशल प्रोटेक्‍शन ग्रुपची (एसपीजी) परवानगी घ्यावी लागणार आहे.

केंद्रीय गृह मंत्रालयाने आज मोदींच्या सुरक्षेसंबंधी राज्यांसाठी नवी मार्गदर्शक तत्वे जारी केली. त्यात वरील निर्देशांचा समावेश आहे. मोदींच्या सुरक्षेला ऑल टाईम हाय धोका आहे. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मोदी हे मोस्ट व्हॅल्युएबल टार्गेट आहेत, असे गृह मंत्रालयाने म्हटले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

केंद्रातील सत्तारूढ भाजपचे प्रमुख प्रचारक असणाऱ्या मोदींना एसपीजीने रोड शोऐवजी जाहीर सभांवर भर देण्याचा सल्ला दिल्याचे समजते. रोड शो सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक ठरू शकतात. त्यांच्या तुलनेत जाहीर सभांवेळी सुरक्षा चोख ठेवणे अधिक सोपे आहे. मोदींच्या सुरक्षाव्यवस्थेचा भाग असणाऱ्या क्‍लोज प्रोटेक्‍शन टीमलाही (सीपीटी) सुरक्षाविषयक मार्गदर्शक तत्वांची माहिती देण्यात आली आहे. एवढेच नव्हे तर, गरज भासल्यास मंत्री किंवा अधिकाऱ्याची झडती घेण्याच्या सूचनाही सीपीटीला देण्यात आल्या आहेत.

नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून अलिकडेच पाच जणांना अटक करण्यात आली. त्यातील एक जणाकडून जप्त करण्यात आलेल्या पत्रात मोदींची हत्या करण्यासाठी राजीव गांधी टाईप आणखी एक घटना घडवण्याच्या कटाचा उल्लेख असल्याचा दावा सुरक्षा यंत्रणांकडून करण्यात आला आहे. याशिवाय, काही दिवसांपूर्वी मोदींच्या पश्‍चिम बंगालच्या दौऱ्यावेळी एका व्यक्तीने सहा स्तरीय सुरक्षा कडे भेदून त्यांना चरणस्पर्श केला. त्यामुळे सुरक्षा यंत्रणांची चांगलीच धावपळ उडाली.

या घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी एक उच्चस्तरीय बैठक घेऊन मोदींच्या सुरक्षाव्यवस्थेचा आढावा घेतला. त्या बैठकीत राजनाथ यांनी मोदींच्या सुरक्षा आणखी भक्कम करण्यासाठी सर्वतोपरी उपाय योजण्याचा आदेश दिला. मोदींच्या सुरक्षेच्या दृष्टीने छत्तिसगढ, झारखंड, मध्यप्रदेश, ओडिशा आणि पश्‍चिम बंगाल या नक्षलग्रस्त राज्यांचा उल्लेख गृह मंत्रालयाने संवेदनशील म्हणून केला आहे. त्या राज्यांच्या पोलीस प्रमुखांना मोदींच्या दौऱ्यांवेळी अतिरिक्त सावधगिरी बाळगण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)