मंत्रालयातील सहसचिवपदी तुकाराम मुंढे यांची वर्णी 

मुंबई – नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदावरुन बदली झालेल्या तुकाराम मुंढे यांची अखेर मंत्रालयात नियुक्ती करण्यात आली आहे. मागील दोन दिवसांपासून तुकाराम मुढे यांची बदली होणार अशी चर्चा होती. अखेर आज त्यांची मंत्रालयात नियोजन विभागाच्या सहसचिव पदावर वर्णी लावण्यात आली आहे. मुंढे यांची 12 वर्षांच्या कार्यकाळात तब्बल 11 वेळा बदली करण्यात आली आहे.

तुकाराम मुंढे यांची मंत्रालयातील नियोजन विभागाच्या सहसचिवपदी बदली करण्यात आली आहे. नवीन पदाचा कार्यभार त्वरीत स्वीकारण्याचे निर्देश त्यांना देण्यात आले आहेत. तसेच नाशिकचा कार्यभार जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. मुंढे यांनी सूत्रे स्वीकारल्यानंतर नाशिक पालिका प्रशासनात चांगले बदल घडले होते. कामकाजात सुसूत्रता आल्याचा अनुभव नागरिकांना येत होता. मात्र, अवघ्या नऊ महिन्यांमध्येच त्यांची बदली करण्यात आली. तुकाराम मुंढे यांच्या बदलीची बातमी नाशिकमध्ये पसरताच नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. सत्ताधारी भाजपाच्या विरोधात नाशिक महापालिकेसमोर मुंढेंच्या समर्थकांनी घोषणाबाजी करत निषेध केला. सर्वसामान्य नाशिककरांनी एकवटत मुंढेंच्या बदलीविरोधात नारे दिले.

दरम्यान, अपर मुख्य सचिव (सेवा) सीताराम कुंटे यांची स्वाक्षरी असलेले पत्र तुकाराम मुंढे यांना देण्यात आले आहे. मुंबईतील नियोजन विभागाचे सहसचिवपद रिक्त असल्याने तिथे मुंढे यांची वर्णी लावण्यात आली. यापूर्वी 2010 आणि 2012 मध्ये त्यांची बदली मुंबईत झाली होती. उस्मानाबादचे जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे नाशिक महानगरपालिकेचा पदभार स्वीकारणार आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)