मंत्रालयातीलच विष पिऊन धर्मा पाटलांची आत्महत्या

एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट : उंदीर घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी


मंत्रालयात सात दिवसांत 3 लाख 19 हजार उंदीर कसे मारले

मुंबई – धुळे येथील वयोवृद्ध शेतकरी धर्मा पाटील यांनी विष पिऊन आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच मंत्रालयात उंदीर मारण्यासाठी आणलेले विष ते प्यायल्याचा गौप्यस्फोट माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी आज विधानसभेत केला. मंत्रालयात उंदरांचा सुळसुळाट झाला असून मुंबई महापालिकेला मुंबईतील 6 लाख उंदीर मारण्यासाठी दोन वर्षे लागतात, तर एका संस्थेने दररोज 9 टन वजन याप्रमाणे मंत्रालयातील तब्बल 3 लाख 19 हजार 400 उंदीर सात दिवसांत मारल्याचे सांगत खडसे यांनी खळबळ उडवून दिली. हा मोठा गैरव्यवहार असून त्याची चौकशी करण्याची त्यांनी मागणी केली.

विधानसभेत आज सामान्य प्रशासन, गृह विभाग, शालेय शिक्षण, सार्वजनिक बांधकाम आणि उच्च व तंत्र शिक्षण या विभागांच्या अर्थसंकल्पातील अनुदानाच्या मागण्यांवर चर्चा होती. या चर्चेदरम्यान सरकारवर शरसंधान करण्याची एकही संधी न सोडणारे भाजपाचे ज्येष्ठ नेते व माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी नेमक्‍या मुख्यमंत्र्यांकडे असलेल्या सामान्य प्रशासन व गृह विभागातील चुकांवर बोट ठेवत जोरदार हल्लाबोल चढवला.

एका संस्थेला 2016 साली मंत्रालयातील उंदीर मारण्याचे काम देण्यात आले होते. या कंपनीने केवळ सात दिवसांत 3 लाख 19 हजार 400 उंदीर मारण्याचा प्रताप केल्याचे खडसे यांनी सांगताच सभागृह अवाक झाले. एवढे करण्यापेक्षा मंत्रालयात 10 मांजरी सोडल्या असत्या तर उंदीर संपले असते, असा टोलाही त्यांनी लगावला.
विशेष म्हणजे, या संस्थेने प्रत्येक दिवसाला 45 हजार 628 उंदीर मारल्याचे म्हटले आहे. दररोज मारलेल्या या उंदरांचे वजन सुमारे 9,125.71 किलो म्हणजे 9 टन होते. दररोज एक ट्रक उंदीर घेऊन गेले. पण त्यांचे दफन किंवा विल्हेवाट कुठे लावली याचा कोणताही अहवाल सरकारकडे उपलब्ध नाही, असे खडसे म्हणाले.

मंत्रालयात उंदीर मारण्यासाठी या संस्थेने आणलेले विष बाळगण्यासाठी सामान्य प्रशासन किंवा गृह विभागाची परवानगी घेतली नव्हती, असे सांगतानाच याच दरम्यान मंत्रालयात आलेले शेतकरी धर्मा पाटील यांच्या हाती हे विष लागले आणि त्यांनी आत्महत्या केली, असे सांगत खडसे यांनी खळबळ उडवून दिली.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)