मंडलाधिकारी सापडेना ….,अण्णासाहेब भेटेना …!

चाफळ विभागातील चित्र ; नागरिकांचे दाखल्यांसाठी हेलपाटे

उमेश सुतार

कराड – पाटण तालुक्‍यातील दुर्गम व डोंगराळ असा असलेला चाफळ विभाग हा या ना त्या कारणाने नेहमीच चर्चेत असतो. याला महसूल विभाग तरी कसा अपवाद ठरेल. सध्या या विभागातील दोन अतिसंवेदनशील सजांचा कार्यभार एकाच तलाठ्यांकडे देण्यात आला असल्याने येथील लोकांना लागणारी महसुली कागदपत्रे मिळवताना चांगलीच दमछाक करावी लागत आहे. त्यातच मंडलाधिकारी शोधूनही सापडत नाहीत, तर तलाठी आण्णासाहेब भेटत नाहीत. त्यामुळे चाफळ विभागातील सजांमधील लोकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

चाफळ विभागाची भौगोलिक परिस्थिती पाहता बरीचशी गावे ही डोंगरकपारीत तर काही गावे डोंगर पठारावर वसलेली आहेत. या विभागात एकूण 22 गावे व 23 वाड्या-वस्त्यांचा समावेश आहे. चार सजांत यापूर्वी चार स्वतंत्र गावकामगार तलाठी काम पाहत होते. परंतु सध्या एक पद रिक्त झाल्याने एका तलाठ्याकडे दोन सजांचा कार्यभार सोपवण्यात आला आहे. त्यामुळे त्यांची चांगलीच दमछाक होत आहे. यात आणखीन भर म्हणून की काय येथील मंडलअधिकाऱ्यांचे पदही रिक्त असल्याने त्यांचा कार्यभार मरळीच्या मंडल अधिकाऱ्यांकडे देण्यात आला आहे. त्यामुळे या भागातील लोकांना बऱ्याच वेळा पदरमोड करुन मंडलाधिकारी यांच्या सह्या घेण्यासाठी मरळीला हेलपाटे मारावे लागत आहेत.

एकंदरीत या मंडलात एकूण पाच सजांचा समावेश आहे. यातील उरुल, डेरवण, चाफळ व नाणेगाव बुद्रुक सजांना गावकामगार तलाठी कार्यरत आहेत. तर उर्वरित पाडळोशी सजांचा कार्यभार चाफळ सजाच्या तलाठ्यांकडे सोपविण्यात आला आहे. यातच भरीस भर पडून मंडल अधिकारीही येथे वेळेवर पोहोचत नसल्याने ग्रामस्थांना त्यांची वाट पाहत बसावे लागत आहे. याकडे लोकप्रतिनिधींसह संबंधित अधिकाऱ्यांनी गांभिर्याने लक्ष देवून या विभागासाठी कर्तव्यदक्ष मंडलाधिकारी द्यावा तसेच याठिकाणची रिक्त असणारी पदे तातडीने भरावीत, अशीही मागणी विभागातील जनतेमधून जोर धरीत आहे.

 

रावसाहेबांना चाफळ भागाचा विसर
चाफळ विभागातील पाडळोशी सजाचे गावकामगार तलाठी गेल्या अनेक महिन्यांपासून रिक्त आहेत. एकाच तलाठ्यांना इतर सजांचा कार्यभार पहावा लागत आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना वेळेत कागदपत्रे मिळण्यात अडचणी निर्माण होत आहेत. परिणामी शेतीची कामे सोडून शेतकऱ्यांना हेलपाटे मारावे लागत आहेत. ही परिस्थिती बऱ्याच दिवसापासून सुरु असतानाही तहसिलदार रावसाहेबांचे याकडे दुर्लक्ष केले असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे रावसाहेबांना या भागाचा विसर पडला आहे की काय ? असा प्रश्‍न विभागातील जनतेतून विचारला जात आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)