मंडप, विसर्जन रथांचा “विसर’

अद्यापही रस्त्यांवर पडून : महापालिकेचे कारवाईकडे दुर्लक्ष

पुणे – अनंत चतुर्थी होऊन 10 दिवस उलटून गेले तरी काही ठिकाणी रस्त्यांवर विसर्जन रथ आणि मंडपाचे साहित्य पडून असल्याची स्थिती आहे. महापालिकेनेही याकडे दुर्लक्ष केले असून, अद्याप कारवाईला सुरुवात केली नाही. मिरवणूक मार्गावरील मंडप महापालिकेने विसर्जनाच्या आदल्या दिवशीच काढून घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार ते काढूनही घेण्यात आले. मात्र अनेक छोट्या रस्त्यांवरील मंडप, उतरवलेल्या मंडपाचे साहित्य, डेकोरेशनमधील मूर्ती अद्याप हलवलेल्या दिसून येत नाहीत.

-Ads-

पेठांमध्ये काही ठिकाणी मोठमोठे, आकर्षक प्रतिकृती बनवण्यात आल्या होत्या. त्या प्रतिकृती लावण्याला जेवढा कालावधी लागला त्यापेक्षा जास्त कालावधी तो काढण्यासाठी घेतला जात आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे.
यापेक्षा जास्त त्रास या प्रतिकृती उतरवताना त्याच्यामधून रस्त्यावर पडणाऱ्या लोखंडी खिळ्यांचा होत असून, गाड्या पंक्‍चर होणे, चप्पलच्या आतून खिळे पायात टोचणे असे प्रकार होत आहेत.

याशिवाय अनेक विसर्जन रथही अद्याप हटवले नसून, ते रस्त्याच्या कडेला लावण्यात आले आहेत. त्यामुळेही वाहतूक कोंडीत भर पडत आहे. त्याविषयी चौकशी केली असता ते नवरात्रीसाठी ठेवल्याचे उत्तर महापालिका प्रशासनाकडून मिळाले.

परंतु अनंत चतुर्थी ते नवरात्रीपर्यंत हे रथ रस्त्याच्या कडेलाच पार्क केलेले असतात. वास्तविक त्याचे पार्किंग वाहनांना अडथळा येणार नाही, अशा ठिकाणी ठेवण्याची जबाबदारी संबंधित मंडळांची आहे. मात्र या मंडळांवर कोणतीच कारवाई महापालिकेकडून होत नसल्याचेही दिसून आले आहे.

विभागातील कर्मचाऱ्यांना कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. त्यासंबंधातील कोणतीही लिस्ट विभागाकडे नाही. परंतु जागेवर पाहणी केल्यानंतर असे मंडप किंवा स्ट्रक्‍चर आढळल्यास कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

– माधव जगताप, प्रमुख, अतिक्रमण नियंत्रण विभाग

ढोलपथकांच्या मंडपांची तीच स्थिती
ढोलपथकांनी बांधलेल्या तात्पुरत्या मंडपांचीही तीच स्थिती आहे. पथकांनी प्रॅक्‍टीससाठी नदीपात्रात मंडप उभारले होते. त्यातीलही काही मोजके पथक वगळता अनेक मंडप याठिकाणी असेच ठेवण्यात आले आहेत. महापालिकेने यावरही कारवाई करण्याची तसदी घेतली नाही.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)