मंचरला पासपोर्ट कार्यालय सुरू करण्याची मागणी

सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी घेतली खासदार आढळराव पाटील यांची भेट

मंचर- येथे पासपोर्ट कार्यालय सुरु करण्याची मागणी मंचर येथील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाने खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याकडे केली आहे. तसेच त्यांना या संदर्भातील निवेदन ही दिले आहे.
भारत सरकारच्या नवीन उपक्रमानुसार देशातील सर्व लोकसभा मतदार संघामध्ये नवीन पासपोर्ट कार्यालय मंजूर करण्याची प्रक्रिया परराष्ट्र विभागाने सुरु केली आहे. त्या अनुषंगाने शिरुर लोकसभा मतदार संघातील पासपोर्ट कार्यालयासाठी पुणे-नाशिक हायवेवरील मंचर शहर हे मध्यवर्ती ठिकाण असून त्याला आंबेगाव, जुन्नर, राजगुरुनगर, शिरुर हे शेजारील तालुके खेड, आंबेगाव, जुन्नर या विभागातील पश्‍चिम पट्ट्यातील आदिवासी बांधव मोठ्या प्रमाणात जोडले गेले आहेत. मंचर हे गाव संपर्क साधण्यासाठी जवळचे ठरु शकते.
मंचर ही जिल्ह्यातील मोठी व्यापारी बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. शहराचा सर्वांगीण विकास होत असताना विविध सरकारी कार्यालय असून त्या कार्यालयाशी खेड, आंबेगाव, शिरुर, जुन्नर तालुक्‍यातील नागरिकांचा नेहमी संपर्क असल्यामुळे शिरुर लोकसभा मतदार संघातील पासपोर्ट कार्यालय मंचर शहराला मिळावे, अशी मागणी शहरातील नागरिकांनी केली आहे. त्यामुळे शहराच्या विकासाला गती मिळेल. लांडेवाडी येथे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना भेटलेल्या शिष्टमंडळात शिवसेनेचे सरपंच दत्ता गांजाळे, वसंत बाणखेले, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रविण मोरडे, कॉंग्रेसचे जे. के. थोरात, कामगार नेते ऍड. बाळासाहेब बाणखेले, भाजपचे सुशांत थोरात, माजी सरपंच लक्ष्मण गांजाळे, युवासेना प्रमुख कल्पेश बाणखेले आदी उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)