मंचरमध्ये राष्ट्रवादीने वाटले लाडू तर सेना-भाजपने पेढे

  • पाणी पुरवठा योजना मंजुरीच्या श्रेयवादावरून राष्ट्रवादी आणि सेना -भाजपमध्ये राजकारण तापले

मंचर – विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी मंचरची नळपाणी पुरवठा योजना मंजूर केल्याबद्दल मंचर येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या महिलांनी लाडू वाटून आनंद व्यक्‍त केला. तर खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी नळयोजना मंजुरीसाठी विशेष प्रयत्न केल्याबद्दल मंचर येथील शिवाजी चौकात शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांनी पेढे वाटून शुक्रवारी दुपारी आनंद व्यक्‍त केला. श्रेयवादावरून आता चांगलेच राजकारण तापले आहे.
मंचर नळपाणीपुरवठा योजना मंजूर झाल्याने त्याचे श्रेय घेण्यावरून शिवसेना-भाजप आणि राष्ट्रवादी कॉग्रेस अशी रस्सीखेच सुरू आहे. त्यावरून गेली दोन दिवस सोशल मीडिया आणि फ्लेक्‍सबाजी करून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. मंचर नळपाणीपुरवठा योजना मंजुरीचे श्रेय खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनाच आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी नळयोजनेचे श्रेय घेण्याची चाललेली धडपड खोटी आहे. समोरासमोर येऊन चर्चा करण्याची आमची तयारी आहे, असे आव्हान सरपंच दत्ता गांजाळे यांनी राष्ट्रवादी पक्षाला दिले. त्या पार्श्‍वभुमीवर सरपंच दत्ता गांजाळे यांनी मंचर येथील जीवन हॉटेलमध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.
यावेळी शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख ऍड. अविनाश रहाणे, मंचर पाणीपुरवठा योजनेचे अध्यक्ष वसंत बाणखेले, उपसरपंच महेश थोरात, भैरवनाथ पतसंस्थेचे संचालक सागर काजळे, योगेश बाणखेले, भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष प्रमोद बाणखेले, जिल्हा उपाध्यक्ष संदीप थोरात यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य आणि भाजप शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. मंचर पाणीपुरवठा योजनेचे अध्यक्ष वसंत बाणखेले यांनी नळ योजना होण्यासाठी कोणामुळे उशिर झाला याचे आत्मपरिक्षण करावे. चांगल्या कामाला खोडा घालण्यापेक्षा केलेल्या कामाचे कौतुक करावे.
मंचर येथील शिवाजी चौकात शिवसेना-भाजप पक्षाने नळयोजना मंजुरीबद्दल फटाके फोडुन, पेढे वाटून आनंद व्यक्‍त केला. यावेळी संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष कैलास राजगुरव, रंगनाथ थोरात, कल्पेश बाणखेले, सुशांत थोरात, गणेश बाणखेले यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. मंचर शहराची नळयोजना मंजुरीच्या श्रेयावरून राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेना -भाजप यांच्यामध्ये रस्सीखेच सुरु आहे.
जिल्हा परिषद सदस्या अरूणा थोरात म्हणाल्या की, सत्ताधाऱ्याकडे कुठलाही ठोस विकासाचा कार्यक्रम नाही. केवळ जनतेची दिशाभुल करण्याची कामे करत आहे. मंचरकरांच्या विकासासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष कार्यरत आहे. नळयोजना मंजूर झाल्याने आता मुबलक पाणी नजिकच्या काळात मिळणार आहे. श्रेयापेक्षा पाणी योजना महत्त्वाची मानून वळसे पाटील काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी मंचर ग्रामंपचायतीच्या सदस्या कविता थोरात, शोभा रणदिवे, वेणुताई खरमाळे, उर्मिला प्रवीण मोरडे, मायाताई देठे, ज्योती निघोट, अरूणा टेके, शितल दैने, वैशाली बेंडे, अनिता भालेराव, संगिता वाव्हळ यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. नळयोजना मंजूर झाल्याबद्दल एकमेकींना लाडू भरवून आनंद व्यक्‍त केला.

  • फुकटचे श्रेय घेऊ नये -सेना-भाजपा
    शिवसेनेचे तालुका प्रमुख सुनील बाणखेले म्हणाले की, शिवसेना-भाजप पक्षामुळे नळयोजना मंजूर झाली आहे. विकासकामे करण्याची धमक शिवसेना-भाजप पक्षामध्ये असून मंचरच्या सर्वांगिण विकासाची घोडदौड यापुढे सुरूच राहिल. भाजपचे तालुका प्रसिद्धी प्रमुख नवनाथ थोरात म्हणाले की, भाजप -शिवसेनेमुळे नळयोजना मंजूर झाली असून त्याचे फुकटचे श्रेय कोणी घेऊ नये. शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख ऍड. अविनाश रहाणे म्हणाले की, मंचरचे सरपंच दत्ता गांजाळे आणि त्यांच्या सहकार्यांनी नळयोजना मंजुरीसाठी विशेष प्रयत्न केले. खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी व्यक्‍तीशः लक्ष घालून नळयोजना मंजूर केली. परंतु श्रेयावरून सुरु असलेला खटाटोप योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले.
  • नल्गना न करता विकासकामे – थोरात
    विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनाच नळयोजना मंजुरीचे श्रेय असल्याचा दावा जिल्हा परिषद सदस्या अरूणा दत्तात्रय थोरात यांनी केला. मंचर शहराची नळयोजना मार्गी लावण्याचे श्रेय इतर पक्ष घेत आहे. परंतु मंचरकरांची विकास कामे कोण करतो याची आठवण करून देण्याची गरज नसल्याचे सांगून जिल्हा परिषद सदस्या अरूणा थोरात म्हणाल्या की, मंचर शहराच्या विकासासाठी दिलीप वळसे पाटील यांनी कोट्यवधी रूपयांचा निधी देऊन विकासकामे पूर्ण केली आहे. केवळ वल्गना न करता विकासकामे पूर्ण करून दिलेला शब्द वळसे पाटील यांनी पाळला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)