मंचरचे पोलीस निरीक्षक धस यांची बदली

मंचर -मंचर शहरातील अतिक्रमणे हटविण्यासाठी तसेच मंचर फ्लेक्‍समुक्‍त शहर होण्यासाठी झटणारे मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रकाश धस यांची अचानक बदली रविवारी (दि. 29) करण्यात आली. देहुरोड पोलीस ठाण्यात त्यांची नियुक्‍ती झाल्याचे पोलीस प्रशासनाने सांगितले.
मंचर पोलीस ठाण्याचा पदभार घेऊन गेली आठ महिने पोलीस निरीक्षक म्हणुन प्रकाश धस यांनी कामकाज केले. मंचर ग्रामपंचायतीचे सरपंच दत्ता गांजाळे यांच्या सहकार्याने मंचर शहरातील अतिक्रमणे हटाव, फ्लेक्‍समुक्‍त मंचर अशी धडक कामगिरी पोलीस अधिकारी प्रकाश धस यांनी केली. अवसरी फाटा, अवसरी खुर्द, निघोटवाडी, पिंपळगाव, लोणी आदी गावे फ्लेक्‍समुक्‍त करण्यासाठी कार्यवाही केली. गवळी गॅंगच्या खंडणीबहाद्दरांवर बेधडक कारवाई करून गेल्या दहा दिवसांत तीन खंडणीचे गुन्हे दाखल करून संबंधितांना अटक केली आहे. जमिनीच्या बांधावरील भांडणे, मारामाऱ्या असलेल्या कुटुंबीयांना बोलावून वाद तडजोडीने मिटवावेत, संघर्षातून प्रगती नाही, अशी अनेक उदाहरणे देऊन पोलीस निरीक्षक धस यांनी सामंजस्याने शेकडो प्रकरणे मार्गी लावली आहेत.
मटका, जुगार चालकांवर धडक कारवाई करून त्यांच्यावर तडीपारीच्या नोटिसा दिल्या आहेत. राजकीय पुढाऱ्याच्या हस्तक्षेपाला न जुमानता प्रामाणिकपणे काम करून धस यांनी पोलीस खात्याची प्रतिमा उंचावण्यासाठी प्रयत्न केले. अवैध धंदे बंद करून तेथील बेरोजगारांना व्यवसाय करा, सन्मानाने जगा असा उपदेश पोलीस निरीक्षक धस करत होते. येथील पोलीस ठाण्यासाठी कोणता अधिकारी येणार याकडे मंचरकरांचे लक्ष लागले आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)