मंगल जंगम यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करा

शैला खंडागळे यांची मागणी
पुणे – जिल्हा परिषदेच्या 2017 च्या निवडणुकीत देहु-लोहगाव गटातून निवडून आलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवार मंगल जंगम यांचे सदस्य पद रद्द करण्यात आले आहे. त्यांनी अनुसूचित जातीची खोटी कागदपत्रे दाखल करून शासनाची फसवणूक केली आहे. त्याप्रकरणी त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शैला खंडागळे यांनी केली आहे. तसेच रिक्त झालेल्या पदावर दुसऱ्या क्रमांकाची मते मिळालेल्या उमेदवाराला विजयी घोषीत करावे, अशीही मागणी खंडागळे यांनी केली आहे.

याबाबत अधिक माहिती देताना खंडागळे म्हणाल्या, 21 फेब्रुवारी 2017 रोजी जिल्हा परिषदेची निवडणूक झाली. त्यावेळी देहु-लोहगाव हा गट अनुसूचित जातीसाठी राखीव होता. उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असताना, जंगम यांच्या जातीबाबत माझ्यासह संजय ओव्हाळ, रावसाहेब राखपसरे, संतोष राखपसरे, सुभाष ओव्हाळ आणि अशोक जाधव यांनी आक्षेप घेतला होता. मात्र, निवडणूक अधिकाऱ्यांनी अधिकार नसल्याचे सांगितले. त्यावेळी या गटातून राष्ट्रवादीच्या मंगल जंगम या शिवसेनेच्या शैला खंडागळे यांच्यापेक्षा 189 मते अधिक मिळवून विजयी झाल्या. त्यामुळे खंडागळे हे दुसऱ्या क्रमांकावर राहिले.

दरम्यान, जात पडताळणी समितीने 4 ऑगस्ट 2018 रोजी जंगम यांचे जातीचे प्रमाणपत्र अवैद्य ठरवून रद्द केले. त्या आधारे जिल्हाधिकाऱ्यांनी या निर्णयाची अंमलबजावणी करून जंगम यांचे सदस्यपद रद्द केले. त्यामुळे त्या जागेवर दुसऱ्या क्रमांकावर मते मिळविलेल्या उमेदवाराला विजयी घोषीत करावे, अशी मागणी खंडागळे यांनी केली आहे. दरम्यान, जिल्हा परिषदेकडून 21 मे 2018 रोजी आयुक्तांना फेर निवडणूक घेण्यासाठी प्रस्ताव पाठविला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)