भ्रष्टाचारातून पैसा, पैशातून सत्ता हेच भाजपचे धोरण

म्हसवड : विराट सभेत बोलताना जनसंघर्ष यात्रेच्या सभेत बोलताना आ.जयकुमार गोरे.

अशोक चव्हाण यांची टिका : म्हसवडमध्ये जनसंघर्ष यात्रेचे स्वागत

खटाव, दि. 4 (प्रतिनिधी) – भ्रष्टाचारातून पैसा आणि पैशातून सत्ता मिळवण्याचे भाजपाचे धोरण आहे. सर्वच आघाड्यांवर निष्क्रिय ठरलेले आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या मुळावर उठलेले हे सरकार राज्याला व देशाला लागलेला कॅन्सर आहे. हा कॅन्सर मुळापासून उखडून टाका. लोकशाहीची मूल्ये जपणाऱ्या कॉंग्रेस पक्षाला साथ देऊन देश व राज्य भाजपमुक्त करण्याचे आवाहन महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केले.
कॉंग्रेसची राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रा चौथ्या दिवशी सातारा जिल्ह्यातील माण तालुक्‍यात पोहोचली. म्हसवड येथे भव्य दुचाकी रॅलीने या यात्रेचे स्वागत स्वागत करण्यात आले. त्यानंतर येथील बाजारपटांगणावरील आयोजित विराट सभेत खा. अशोक चव्हाण यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर सडकून टीका केली. यावेळी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण, विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, डी. पी. सावंत, आ. डॉ. विश्वजित कदम, आ. जयकुमार गोरे, अमीर शेख, एम. के. भोसले, अरुण गोरे, साधना गुंडगे, सोनिया गोरे, सिद्धार्थ गुंडगे, विजय धट, सुरेश म्हेत्रे, डॉ. वसंत मासाळ, नितीन दोशी, आणि पदाधिकारी उपस्थित होते.
खा. चव्हाण पुढे म्हणाले, स्वातंत्र भारताच्या इतिहासात शेतीसाठी लागणाऱ्या ट्रॅक्‍टरवरच्या सुट्या भागांवर आणि शेती औजारांवर जीएसटी लावणाऱ्या सरकारने आता विहिरीतल्या पाण्यावर टॅक्‍स लावला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मराठा, धनगर, मुस्लिम समाजाच्या तोंडाला पाने पुसली. राज्यात पुन्हा कॉंग्रेसचे सरकार 100 टक्के येणार असून जयकुमार तुम्ही आतापासून कामाला लागा. येथील जनता तुमच्या पाठिशी आणि आम्ही तुमच्या बरोबर आहोत. तुमचे भवितव्य उज्वल आहे.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, सध्या शेतीमालाला भाव नाही. कर्जमाफी मिळाली नाही. पीक कर्ज मिळत नाही. नुकसानीची मदत मिळत नाही. जनतेला मदत कऱण्याऐवजी सरकार इंधनावर कर लावून सर्वसामान्यांची लूट करत आहे. नोटाबंदी आणि जीएसटीमुळे अनेक व्यवसाय अडचणीत आले आहेत. हजारो लोकांचा रोजगार गेला आहे. भाजप-शिवसेना सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे सर्वच घटक अडचणीत आले आहेत. राज्यावर पाच लाख कोटींचा कर्जाचा डोंगर केला आहे. सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी पुन्हा कॉंग्रेसचेच सरकार आणले पाहिजे. त्यासाठीच हा जनसंघर्ष सुरू आहे. जयकुमार येथील स्वाभिमानी जनतेसाठी संघर्ष करत असून तयाच्या चिकाटीमुळेच माणच्या शिवारात उरमोडीचे पाणी आले आहे.
यावेळी राधाकृष्ण विखे पाटील, आ. विश्वजित कदम यांचेही भाषण झाले. सुत्रसंचालन अकाश पाटील यांनी केले तर आभार एम के भोसले यांनी मानले.

आघाडी धर्म पाळण्याची जबाबदारी दोन्ही पक्षांची
कार्यक्रमात आ. जयकुमार गोरे म्हणाले, आमचा संघर्ष भाजपा बरोबर नाही तर आपल्याच मित्रपक्षा सोबत आहे. राज्यात आघाडी करताना कॉंग्रेस पक्ष जिवंत ठेवून आघाडी करावी. आघाडी धर्म पाळायची आमची एकट्याची जबाबदारी नाही. ती मित्र पक्षाचीही आहे. जिहे-कटापूर योजनेसाठी राज्यातील भाजपा सरकारने चार वर्षात फक्त 70 हजार रुपयांचा निधी दिला. राज्यात आमचे आघाडीचे सरकार पाच वर्षात 350 कोटींचा निधी देण्यात आला होता. सध्याच्या युती शासनाने दुष्काळी भागावर व पश्‍चिम महाराष्ट्रावर अन्याय केला आहे. आघाडीचे सरकार असते तर माण आणि खटाव तालुक्‍यातील 80% भाग पाणीदार झाला असता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)