भ्रष्टाचाराचे भूत मानगुटीवर

वंदना बर्वे

लालूप्रसाद यादव यांचं संकटाशी जुनं नातं आहे. पण सध्याचं संकट भीषण आहे. कारण भ्रष्टाचाराचं भूत फकत लालूजींच्या नव्हे तर; अख्ख्या कुटुंबाच्या मानगुटीवर बसलं आहे. पत्नी, मुलगा, मुलगी, जावई सगळे सीबीआय आणि ईडी यासारख्या संस्थांच्या रडारवर आहेत. अशातच मुख्यमंत्री नितीशकुमार यांचं तळ्यात आणि मळ्यात सुरू आहे. राज्यात राजद-जेडीयूची आघाडी सरकार आहे. यामुळे आपल्या मुलांचं काय होईल? या भीतीचा सामना लालूजी कसे करतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेचा ग्राफ अगदी टॉपवर असताना लालूप्रसाद यादव यांनी बिहारच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा धुव्वा उडविला होता. यासाठी त्यांनी नितीशकुमार यांना सोबत घेतले आणि ही युक्ती यशस्वी सुध्दा ठरली. लालूप्रसाद यादव अद्याप संपलेले नाही अशी चर्चा त्यानंतर सुरू झाली होती. परंतु, लालूप्रसाद यादव सध्या भीषण संकटाचा सामना करीत आहेत. कारण, सध्याचं संकट हे फकत लालूप्रसाद यादव यांच्यावर आले नसून पत्नी राबडीदेवी, मुलगा तेजस्वी, मुलगी मीसा भारती आणि जावई यांच्यावर कोसळले आहे. या संकटातून बाहेर काढण्यासाठी ते दोन पावलं मागे जायला सुध्दा तयार आहेत. परंतु, मार्ग सापडत नाही. चारा घोटाळ्याने लालूजींच्या राजकीय महत्वकांक्षेला केवळ ब्रेक लावला नाही तर न्यायालयाने दोषी ठरविल्यामुळे निवडणूक लढण्यास अपात्र ठरले आहेत. तरीसुध्दा, लालूप्रसाद यादव नावाचा दरारा किंचितही कमी नाही झाला, हे विशेष. एवढेच नव्हे तर, 2015 मधील विधानसभेच्या निवडणुकीत राजदने जोरदार मुसंडी मारली. नितीशकुमार यांच्याशी आघाडीचा डाव खेळून राज्यात सरकार स्थापन केली. आता लालूजी विरोधी पक्षांची मूठ बांधण्याची तयारी करीत आहेत. यासाठी 27 ऑगस्ट रोजी पाटण्यात रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे.

रेल्वेमंत्री असताना लालूप्रसाद यादव यांनी पदाचा गैरवापर करीत एका खासगी कंपनीला फायदा पोहचविल्याच्या आरोपाखाली सीबीआयने एकाचवेळी 12 ठिकाणांवर छापा घातला. सीबीआयचे अतिरिक्त संचालक राकेश अस्थाना यांच्यानुसार, यादव यांनी सुजाता हॉटेल्सला रेल्वेचे पुरी आणि रांची येथील हॉटेल लीजवर दिले. असे करताना नियमांची पायमल्ली केली गेली. या बदल्यात या कंपनीने दोन एकर जागा प्रेमचंद गुप्ता यांच्या कंपनीला दिली आणि ही जमीन नंतर यादव कुटुंबाला मिळाली.या काळात कुटुंबियांच्या नावावर बनविलेल्या कंपन्यांमार्फत बेहिशेबी मालमत्ता गोळा केली गेली असा मुख्य आरोप आहे. सीबीआयने केवळ लालूजींनाच फाईलवर घेतले नाही तर पत्नी राबडी देवी, मुलगा तेजस्वी यादव यांच्या विरोधात 420 आणि 120-बी कलमाखाली फसवेगिरी आणि गुन्हेगारी कट रचल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. मुलगी मीसा भारती आणि जावई सुध्दा रडारवर आहे.
ज्या कंपनीच्या माध्यमातून मालमत्ता जमविण्यात आली; राबडीदेवी, तेजस्वी यादव आणि तेजप्रताप यादव त्या कंपनीचे संचालक आहेत. सीबीआयने ज्या कलमाखाली गुन्हा नोंदविला आहे त्या गंभीर स्वरूपाच्या आहेत. यामुळे अटक झाली तर सहजासहजी जामीन मिळणार नाही हेही तेवढेच खरे आहे. ही कारवाई एका प्रकरणात झाली अहो. आणखी काही प्रकरण उजेडात येण्याची शक्‍यता आहे. यादव कुटुंबाच्या 22 ठिकाणांवर आधीच छापा मारण्यात आला आहे. डझनभर मालमत्ता अटॅच करण्यात आली आहे. मुलगी मीसा भारती आणि त्यांचे पती शैलेश यांची सीबीआयने कसून चौकशी केली आहे.

लालूप्रसाद यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरूध्द दंड थोपटले म्हणून ही कारवाई होत आहे अशी चर्चा आहे. राजकीय द्वेषापोटी ही कारवाई होत आहे असे मानले तरी आरोप खोटे असू शकत नाही. सरकारी यंत्रणा सत्तापक्षाच्या सोयीनुसार एखाद्याच्या विरोधात कारवाई मागे-पुढे करीत असते. मात्र, आरोप आणि प्रकरण खोटे नसतात, हेही समजून घेतले पाहिजे. सत्तपक्षाला अनुकूल असेल तर अनेकदा कारवाई करण्यात चालढकल केली जाते. किंवा तत्परता दाखविले जाते. मात्र, या सगळ्या बाबी तेव्हाच होतात जेव्हा आरोप खरे असतात. विरोधकांची तोंडे बंद करण्यासाठी सरकार सीबीआय ईडी किंवा अन्य संस्थांचा गैरवापर करीत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जावू शकतो. परंतु, आरोप चुकीचेच आहेत हे कुणी सिध्द करून देण्यात समारे येत नाही. अख्ख्या कुटुंबावर सूड भावनेने कारवाई करण्याची सरकार हिंमत करेल एवढी वाईट स्थिती अजून या देशात आलेली नाही. पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कडाडून विरोध करतात. परंतु, सीबीआय किंवा ईडी त्यांच्या मागे लागलेली नाही. शारदा घोटाळ्याची चौकशी संपुआच्या काळापासून सुरू आहे. नारदा स्टींग ऑपरेशन आताचे आहे.

खरं म्हणजे, लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनातून तावून-सुलाखून निघालेले लालूप्रसाद यादव यांच्या कुटुंबावर अशाप्रकारचे आरोप लागणे हीच खूप मोठी बाब आहे. यादव कुटुंबातील प्रत्येक सदस्याने त्यांच्या उत्पन्नाचे स्त्रोत जाहीर करायला पाहिजे. ज्या कंपन्यात ते संचालक आहेत त्या कंपनीचा व्यवसाय काय? हे सांगायला पाहिजे. मीसा भारती आणि त्यांचे पती चार कंपन्यांचे संचालक असल्याची बाब समोर आली आहे. कदाचित हा आकडा आणखी वाढेल. या कंपन्यांचा मुख्य व्यवसाय कोणता? हेच अजून कुणाला कळलेलं नाही. यादव कुटुंबाने या कंपन्यांचा उपयोग भ्रष्टाचाराच्या माध्यमातून संपत्ती गोळा करण्यासाठी केला, असा उघड आरोप आहे.

मुळात, सीबीआयच्या या कारवाईचे दोन पैलू आहेत. पहिला म्हणजे, विरोधी पक्षांना एकजूट करण्याची लालूजींची मोहिम थंड पडावी आणि दुसरा म्हणजे, बिहारमधील आघाडी सरकारवर अस्थिरतेचे सावट निर्माण करणे. चारा घोटाळ्यातील अन्य पाच प्रकरणाची सीबीआयच्या न्यायालयात सुनावणी सुरू झाल्यामुळे लालूजींना दर आठवड्याला रांचीला जावे लागते. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सीबीआय न्यायालयाने नउ महिन्यात सुनावणी पूर्ण करायची आहे. मात्र, लालूजींना आता स्वतःपेक्षा मुलांची काळजी जास्त वाटत आहे. सीबीआयने तेजस्वी यादव, तेजप्रताप यादव आणि मीसा भारती यांच्याविरूध्द जशी भूमिका घेतली आहे ती लालूजींची झोप उडविणारी आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)