भोसरी रुग्णालयाच्या खासगीकरणाचा प्रस्ताव महासभेपुढे

पिंपरी- पिंपरी-चिंचवड महापालिकेने भोसरी येथे उभारलेल्या 100 बेड क्षमतेचे रुग्णालय चालविण्यासाठी महापालिकेला वार्षिक 21 कोटी खर्च येणार आहे. महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात भेडसावणाऱ्या मनुष्यबळाच्या समस्येच्या पार्श्‍वभुमीवर भोसरीतील रुग्णालय खासगी संस्थेला 30 वर्षे कराराने चालवायला देण्याचे विचाराधीन आहे. तसा प्रस्ताव महासभेच्या मान्यतेसाठी ठेवण्यात आला आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागांतर्गत शहराच्या विविध भागांमध्ये 8 रुग्णालये आणि 27 दवाखाने कार्यरत आहेत. त्यापैकी वायसीएम हे बहुविध शाखांचे व 750 खाटांच्या क्षमतेचे सर्वात मोठे रुग्णालय आहे. महापालिका हद्दीबरोबरच नजीकच्या ग्रामीण भागातील रुग्ण देखील या रुग्णालयात उपचारांसाठी येत असतात. महापालिकेच्या वैद्यकीय विभागांतर्गत असलेली रुग्णालये आणि दवाखान्यांसाठी विविध संवर्गातील गट अ मधील 58 तर ब गटातील 93 अशी एकूण 151 पदे निर्माण करण्यात आली आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

महापालिकेच्या वतीने वेळोवेळी तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी या संवर्गातील पदे भरण्यासाठी जाहिरात देऊनही या जाहिरातींना फारसा प्रतिसाद मिळत नाही. त्याचा थेट परिणाम वैद्यकीय सुविधा पुरविण्यावर होत असतो. गेली पाच वर्षांमध्ये एकूण 53 तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी महापालिका सेवेतून सेवानिवृत्त, स्वेच्छानिवृत्त अथवा राजीनामा देऊन गेले आहेत. त्यामुळे महापालिकेची आर्थिक क्षमता असूनही तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांअभावी रुग्णसेवा पुरविणे शक्‍य नाही.
महापालिकेच्या वतीने भोसरीत 100 खाटांच्या क्षमतेचे रुग्णालय उभारण्यात आले असून वायसीएममध्ये पुरविल्या जाणाऱ्या 16 विशेष वैद्यकीय सुविधा या रुग्णालयात उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत. याशिवाय सुपर स्पेशालिटी प्रकारातील 10 सुविधा उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत. त्यामध्ये व्हॅस्क्‍युलर सर्जरी, न्युरोलॉजी, प्लॅस्टिक सर्जरी, युरो सर्जरी, कार्डीओ-थ्रोऍकीक, नेफ्रॉलॉजी, ऑन्कॉलॉजी, एन्डोक्रिनालॉजी, गॅस्ट्रो एन्ट्रॉलॉजी तसेच पेडीऍट्रीक सर्जरी या अत्याधुनिक उपचार पद्धतींचा समावेश केला जाणार आहे.

हे रुग्णालय खासगी संस्थेला चालवायला दिले तरी देखील महापालिका हद्दीतील पिवळे व केशरी रेशनिंग कार्ड व आधारकार्ड असलेल्या रुग्णांना मोफत वैद्यकीय सुविधा पुरविली जाणार आहे. याशिवाय हद्दीबाहेरच्या पांढऱ्या रेशनिंग कार्ड असलेल्या रुग्णांवर निश्‍चित केलेल्या शुल्कानुसार आकारणी केली जाणार आहे. महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत नोंदणी करुन घेण्याबरोबरच एनएलइएम अंतर्गत एकूण 368 प्रकारची औषधे पिवळ्या व केशरी रेशनिंग कार्ड धारकांना मोफत उपलब्ध करुन दिले जाणार आहेत. या सर्व उपचारांकरिता या रुग्णालयाने तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी व पॅथॉलॉजी लॅब, पॅरामेडीकल स्टाफ उपलब्ध करुन देणे बंधनकारक असणार आहे.

संस्थेला भाडे आकारणी नाही
या सर्व वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन देण्याबरोबरच जनऔषधी स्टोअर्स उपलब्ध करुन देणे या संस्थेवर बंधनकारक करण्यात आले आहे. या रुग्णालयामध्ये काही उपकरणे महापालिकेच्या वतीने पुरविली जाणार आहेत. मात्र वीज बील, पाणी याचा खर्च या संस्थेला करावा लागणार आहे. एखादा नवीन वैद्यकीय विभाग सुरु करावयाचा असल्यास त्यासाठी महापालिका आयुक्‍तांची परवानगी घेणे आवश्‍यक आहे. तसेच 30 वर्षे मुदतीकरिता दिल्या जाणाऱ्या या संस्थेकडून महापालिका कोणतेही भाडे आकारणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)