भोसरी मतदार संघात आता भाजप-मनसे “युती’?

– राज ठाकरे-महापौर जाधव भेटीने चर्चा

अधिक दिवे
पिंपरी – भोसरी विधानसभा मतदार संघात आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भाजपचे नवनिर्वाचित महापौर राहुल जाधव यांनी शुक्रवारी भेट घेतली. त्यांना साष्टांग नमस्कारही घातला. महापौरपदाच्या निवडणुकीपासून महापालिका आणि भोसरीतील हालचाली पाहता आता भाजप आणि मनसे “युती’ होणार, अशी शक्‍यता निर्माण झाली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

भोसरीचे विद्यमान आमदार महेश लांडगे हे भाजपचे सहयोगी सदस्य आहेत. तसेच, नवनिर्वाचित महापौर राहुल जाधव हे लांडगे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. वास्तविक, मनसेचे पूर्वाश्रमीचे नगरसेवक असलेल्या जाधव यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार असलेल्या लांडगे यांचा जाहीर प्रचार केला होता. त्यावेळी मनसेचे विद्यमान गटनेते सचिन चिखले पक्षाचे अधिकृत उमेदवार होते. मात्र, तरीही चिखले यांनी महापौरपदाच्या निवडणुकीत मात्र राहुल जाधव यांना पाठिंबा दिला. त्यावेळी आमचा पूर्वीचा “मनसैनिक’ भाजपमध्ये जावून महापौर झाल्याचा अभिमान आहे, अशा भावना चिखले यांनी व्यक्‍त केल्या.

दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे रहाटणी येथील कार्यक्रमानिमित्त आले होते. त्याठिकाणी महापौर जाधव यांनी हजेरी लावली. तसेच, ठाकरे यांना साष्टांग प्रणामही केला. कारण, विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती “फिस्कटली’, तर भाजपची उमेदवारी घेवून मनसेचा पाठिंबा मिळवता यावा. त्यासाठी महापौर राहुल जाधव राज ठाकरे यांची मनधरणी करतील, अशी रणनिती आखण्यात येत आहे. तसेच, भाजपमध्ये बंडखोरी झाली किंवा शिवसेनेने तगडा उमेदवार दिला, तर मनसेचे निर्णायक मतदान राज ठाकरे यांच्या एका आदेशावर आमदार लांडगे यांच्या पाठिशी राहणार आहे. त्यामुळे भविष्यातील राजकीय समीकरणे जुळवण्यासाठीच लांडगे यांच्या सल्ल्याने महापौर जाधव यांनी ठाकरे यांची भेट घेतली असावी, ही वस्तुस्थिती आहे.

माझ्या राजकीय कारकिर्दीची सुरूवात मनसेतून झाली. राज ठाकरे यांच्या नेतृत्त्वाचा माझ्यावर प्रभाव आहेच. पण, माझे राजकीय आदर्श आमदार महेश लांडगे आहेत. यापुढील राजकीय वाटचाल त्यांच्यासोबतच राहील. भाजपमुळे मी आज महापौर आहे. महापौर निवडणुकीत मनसेने मला पाठिंबा जाहीर केला होता. त्यामुळे ठाकरे यांचे आभार मानले. त्यामुळे या भेटीचा राजकीय अर्थ काढू नये.
– राहुल जाधव, महापौर, पिंपरी-चिंचवड.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)