भोसरीत आज अतिक्रमणांवर “दणका’

पिंपरी – भोसरीतील कै. अंकुशराव लांडगे सभागृह परिसर आणि राजमाता जिजाऊ उड्डाणपुलाखाली असलेल्या अतिक्रमणावर महापालिका शुक्रवारी (दि. 26) मोठ्या पोलीस बंदोबस्तात कारवाई करणार आहे. दरम्यान पोलिसांनी गुरुवारी येथील छोट्या-मोठ्या विक्रेत्यांना नोटीसा बजाविल्या आहे. या अनधिकृत पथारी टपरीवर मोठा राजकीय वरदहस्त असल्याने खरंच कारवाई होणार का याकडे अख्ख्या शहराचे लक्ष लागले आहे.

राजकीय वरदहस्तातून भोसरी परिसरात मोठ्या प्रमाणावर विक्रेत्यांचे अतिक्रमण झाले आहे. भोसरीतील कै. अंकुशराव लांडगे सभागृहाचा परिसर आणि राजमाता जिजाऊ उड्डाणपुलाखालील परिसर अक्षरशः गिळंकृत करण्यात आला आहे. त्यामुळे शंभर कोटी खर्चून हा पूल उभारल्यानंतरही वाहतुकीची समस्या कायम आहे. भोसरीतील आजी-माजी आमदारांची मेहेरनगर असल्याने महापालिका कारवाईला धजावत नाही. दरम्यान, भोसरीतील अतिक्रमणे काढावी अशी मागणी शिरूरचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली होती. त्यात महापालिकाच अनधिकृत टपऱ्या आणि हातगाड्यांना संरक्षण देत असल्याचा आरोप केला होता. अखेर महापालिकेने खासदार आढळराव पाटील यांच्या मागणीनुसार कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कारवाईची संवेदनशीलता लक्षात घेता महापालिकेने पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांच्याकडून मोठा पोलीस बंदोबस्त मागविला आहे. शुक्रवारी सकाळपासून ही कारवाई सुरू होणार आहे. या भागात 100 हून अधिक छोटी-मोठी दुकाने आहेत. टपऱ्या, हातगाड्या असून, गेल्या काही दिवसात येथे अनधिकृत भाजी मंडई सुरू करण्यात आली आहे. यासाठी ओटे देखील बांधून देण्यात आले आहेत. मंडई व्यतिरिक्त शॉपिंग बाजारच्या नावाखाली भोसरीतील गायरानाच्या मोकळ्या जागेत कपड्यांची दुकाने पत्राच्या शेडची बांधकामे करून थाटण्यात आली आहेत. हे अनधिकृत व्यापारी अगदी मुख्य रस्त्यावर व्यवसाय धंदा करीत असल्याने मोठ्या प्रमाणावर ट्रॅफिकची समस्या निर्माण होत आहे. याबाबत वारंवार तक्रार करूनही कारवाई होत नव्हती. मात्र, आता आयुक्तांनी कारवाईचे धाडस केल्याने कारवाईला महत्त्व प्राप्त झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)