भोर तालुक्‍यातील भातकाढणी अंतिम टप्प्यात

पिकांवर करपा व तुडतुडी रोगाचा प्रादुर्भाव : उत्पादन कमी होण्याची शक्‍यता

जोगवडी- इंद्रायणी भाताचे कोठार समजल्या जाणाऱ्या भोर तालुक्‍यातील भात काढणीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. काही भागात पाण्याविना भात पिके जळाली आहेत तर काही भागात करपा व तुडतुडी रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने यंदा पिकाचे उत्पादन कमी झाले आहे. यामुळे शेतकरी वर्गात नाराजी पसरली आहे.
1 जुलै रोजी मान्सून पावसाने जोरदार हजेरी लावल्याने बळीराजाचे संकट टळले होते. यामुळे खरीप पिकांना संजीवनी मिळाली होती. जुलै महिन्यामध्ये सोयाबीन, घेवडा, भुईमूग व चवळी तरारली होती; परंतु मेघराजाने सलग सव्वा दोन महिने विश्रांती न घेतल्याने शेत खुरपणीसाठी वाव मिळाला नाही. यामुळे शेतामध्ये पिकापेक्षा गवतच जास्त माजल्यामुळे पिके संकटात आली होती. मात्र, योग्य वातावरण व प्रजन्यमानामुळे पिके जोरात आल्यामुळे शेतकरी वर्ग खुश होता. त्यानंतर परतीच्या पावसाने पाठ फिरवल्यामुळे पाण्याविना भातपिके जळाली तर संगमनेर, नऱ्हे, हर्णस, जोगवडी या भागात तुडतुडर व करपा रोगांचा प्रादुर्भाव पिकांवर झाल्याने उत्पादन घटले तर डोंगराळ भागात यावर्षी झरे लवकरच आटल्याने भात पिकांना पाणी मिळाले नाही. याचा परिणाम भाताच्या उत्पादनावर झाला आहे.
शेतकरीवर्ग नाराज
बी-बियाणे, खते, मजूरी यासाठी शेतकऱ्यांनी कर्ज घेतले असून सरासरीच्या मानाने भातपिकाचे उत्पादन कमी झाल्याने कर्ज कसे फेडणार या चिंतेत शेतकरी आहेत. भोर तालुक्‍यातील शेतकरी उदरनिर्वाहणाचे साधन म्हणून शेतीकडे पाहतात. शेतीमध्ये भात हे मुख्य पीक आहे. अगोदरच सलग सव्वादोन महिने पावसाने विश्रांती न घेतल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. तालुक्‍यात उद्योग-धंद्याचे प्रमाण कमी आहे. यामुळे अनेक तरुण बेरोजगार आहेत. त्यामुळे उपजीविकेचे साधन म्हणून शेतीकडे पाहिले जाते; परंतु यावर्षी पिके जळाल्याने शेतकरीवर्ग नाराज झाला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)