- आमदार संग्राम थोपटे यांची माहिती
भोर – भोर, वेल्हा आणि मुळशी या अतिदुर्गम डोंगरी तालुक्यातील रस्त्यांच्या कामांसाठी पावसाळी अधिवेशनात पुरवणी अर्थसंकल्पात 29 कोटी 43 लाख रुपये खर्चाचा निधी मंजूर करण्यात आल्याचे आमदार संग्राम थोपटे यांनी सांगितले.
भोर विधानसभा मतदारसंघातील रस्ते व पुलांचे काम सार्वजनिक बांधकाम (द.) विभाग, पुणे या कार्यान्वयीन यंत्रणे मार्फत करण्यात येणार असल्याचे आमदार थोपटे यांनी सांगितले. या आगोदर मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतुनही भोर, वेल्हा आणि मुळशी तालुक्यातील रस्त्यांच्या कामासाठी 25 कोटी 41 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याने या तीन तालुक्यांत 54 कोटी 84 लाखांचा निधी मंजूर असल्याने रस्ते चकाचक होणार आहेत. मजुर कामांची तालुका निहाय माहिती – भोर-महाड रस्ता, सारोळा- वीर रस्ता, भोलावडे-शिंद-महुडे रस्ता, कासुर्डी-हातवे-तांभाड- चिरमोडी-वेल्हा ते पानशेत रस्ता या कामांकरिता भोर तालुक्यासाठी 11 कोटी 25 लाखांचा निधी मंजुर झाला आहे. तर वेल्हा तालुक्यातील महाड -मढेघाट, वेल्हा- नसरापूर-चेलाडी रस्ता, कादवे-वडघर- आंबेगांव-घिवशी- शिरकोली- घोडशेत-पोळे-मानगांव-टेकपोळे रस्ता, चिरमोडी-साखर-मार्गासनी-वांगणी-निगडे-कुसगांव-कुसखिंड रस्ता व कानंदी नदीवरील पुल, चिरमोडी-कानंदी-साखर गावाजवळ पुलाच्या कामासाठी 10 कोटी 18 लाख रुपयांचा निधी मंजुर आहे. तर, मुळशी तालुक्यातील पानशेत-ओहळ ते ताम्हिणी रस्ता, दासवे-लव्हार्डे-मुठा- वरसगांव रस्ता यासाठी 8 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.