भोरच्या राजप्रसादात शाहि थाटात राम जन्मोत्सव

भोर- सुमारे 300 वर्षांची परंपरा असलेल्या भोरचे संस्थानिकांच्या राजप्रासादाच्या दरबार सभागृहात पंतसचिवांचे कुलदैवत असलेल्या श्रीरामाचा जन्मोत्सव (श्रीरामनवमी) पारंपरिक पद्धतीने आज (रविवारी) दुपारी 12 वाजता मोठ्या उत्साहात श्रीरामाच्या जयघोषात साजरा करण्यात आला. यावेळी सत्‌ सीता रामचंद्र की जय… ,प्रभू रामचंद्र की जय…, बोल बजरंग बली की जय.. च्या जयघोषाने सारा आसमंत दुमदुमून गेला होता.
या रामजन्मोत्सवाला भोरचे राजे चिमणाजी ऊर्फ आबाराजे पंतसचिव, त्यांच्या पत्नी ऊर्मिलादेवी, पुत्र राजेश, योगेश व नातू पार्थ, स्वातीदेवी, गायत्रीदेवी, ईशादेवी, निमिसादेवी, नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष उमेश देशमुख, माजी उपनगराध्यक्ष व पंतसचिवांचे सल्लागार के. टी. शेटे, माजी नगरसेवक तुकाराम रोमण, विजय लोहकरे, ज्येष्ठ नागरिक संघाचे कृष्णाजी शिनगारे, प्राचार्य प्रसन्नकुमार देशमुख, प्रा.संतोष ढवळे, प्रमोद फडणीस, मोहन टोकेकर, जोशी काका आदि मान्यवरांसह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राजप्रासादातून राजघराण्यातील प्रमुख व्यक्‍ती, नागरिक ढोल-ताशा पथकाच्या गायन वाद्याच्या साथीने सजवलेल्या पालखीतून छत्र, चामरे, अब्दागिरी घेतलेले मानकरी यांच्यासह राजसुवर्णकार यांच्याकडे राममूर्ती आणण्यासाठी गेले. मूर्ती उत्साही मिरवणुकीने पालखीतून राजप्रसादात आणताना नागरिकांनी पुष्पवृष्टी केली. नंतर ही मूर्ती सजवलेल्या पाळण्यात ठेवण्यात आली. मधुकर पैठणकर यांनी “राम जन्मला गं सखे राम जन्मला’ गित गायन केले, तर राम जन्मोत्सवाचा पाळणा सौ. दुसंगे यांनी म्हंटला. यानंतर ठीक दुपारी 12 वाजता श्रीमंत आबा राजे पंतसचिव व राज कुटुंबियांनी सजवलेल्या पाळण्याची दोरी ओढताच रामाच्या पाळण्यावर पुष्पवृष्टी करीत श्रीरामाचा जयजयकार करीत घोषणा दिल्या. यावेळी हजारो भाविकांना सुंठवडा व महाप्रसाद वाटप करण्यात आला. तर मधुकर पैठणकर यांनी व पुणे येथील ईस्कॉनच्या सेवकांनी राम जन्माची गिते सादर करुन भोर वासियांना ऐतिहासिक अनुभुती घडवली.
दरम्यान, आज पहाटेपासूनच भोर शहरात मोठ्या उत्साहाचे वातावरण होते. ठिकठिकाणी स्वागत कमानी उभारण्यात आल्या होत्या.रांगोळी काढली होती. राजवाडा परिसरात विविध प्रकारची प्लास्टिकची खेळणी, मातीची भांडी, खाद्यपदार्थांचे, थंड पेयाचे कलिंगडाचे व विविध फळांच्या उसाच्या रसाचे स्टॉल लावण्यात आले होते. लहान मुलांना व वृद्धांना खेळण्यासाठी रेल्वेगाडी, झोपाळा, मिकी माऊस, जंपिंग जॅक याची सोय होती. त्यामुळे दिवसभर चिमुकल्यांसह आबालवृद्धांनी एकच गर्दी केली होती. भाविकांना पिण्याच्या पाण्यासाठी पाणपोईची सुविधा करण्यात आली होती. सकाळपासून शहरासह ग्रामीण भागातील भाविकांनी दर्शनासाठी राजवाड्यात रांगा लावल्या होत्या. भोर पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

  • देवतांना अक्षदा देऊन केले निमंत्रीत
    रामजन्मोत्सवाचे आदल्या दिवशी म्हणजेच शनिवारी (दि.24) युवराज योगेश, राजेश, पंतसचिव आबाराजे, उर्मिलादेवी आदिंनी राजवाडा परिसरातील विविध देवीदेवतांना अक्षद देऊन पारंपारिक पद्धतीने रामजन्म सोहळ्यासाठी निमंत्रित केले होते.तर पंतसचिवांचे मुळ घराणे असलेल्या श्रीमंत भाऊसाहेब गांडेकर यांच्या निवासस्थानी जाऊन देवघरातील देवतांना अक्षदा देऊन निमंत्रीत करण्यात आले होते. हे निमंत्रण देण्यासाठी गेलेले राजकुटुंबीयांनी त्यांचा पारपारीक पोषाख, पालखी वाद्यांच्या गजरात मिरवणुकेने गेलेले होते.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)