भोरचा विकास करण्याची धमक कॉंग्रेसमध्येच

भोर- भोर शहराचा अत्यंत खडतर परीस्थितीत विकास करण्याचे काम करताना भोर शहर वासियांचे मोलाचे सहकार्य लाभले असून गेल्या 10 वर्षात विकासकामांचा डोंगर उभा केला आहे. भोर शहराचा सर्वांगीण विकास करण्याचे खरे सामर्थ्य कॉंग्रेस पक्षातच असून भोर शहरातील माता भगिनींची शक्ती कॉंग्रेसच्या पाठीशी असल्याचे सांगुन भोर नगरपालिकेच्या निवडणुकीत पुन्हा कॉंग्रेसचाच झेंडा फडकणार आहे, असा असा ठाम विश्वास आमदार संग्राम थोपटे यांनी व्यक्त केला.
भोर शहराच्या विकासासाठी मागील पंचवार्षिकमध्ये अवघ्या अडीच वर्षांच्या कालावधीत सुमारे 62 कोटी रुपये खर्चाची कामे केली असून भविष्यात भोर शहरातील उर्वरीत विकासकामे केली जाणार असून जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात भोर नगरपालिका नंबर एक करुन भोरची मुंबई करणार असल्याचेही आमदार थोपटे यांनी सांगितले. भोर शहरात मागिल पंचवार्षिकमध्ये आम्ही ज्यांच्यावर विश्वास ठेऊन ज्यांना मानाची खुर्ची दिली त्यांनीच कॉंग्रेस पक्षाशी गद्दारी करुन दोन अडीच वर्षे भोर शहराच्या विकासात अडथळे निर्माण केले, तेच आज नगराध्यक्ष पदाचे उमेदवार होऊन दिवा स्वप्न पहात आहेत. मात्र, भोरची जनता हे सारे ओळखून असून त्यांना त्यांची जागा दाखवून दिल्या शिवाय राहणार नाही. राज्याचे एक मंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालक मंत्री भोरला येवून गरळ ओकून गेले. मात्र, त्यांना भोर नगरपालिकेच्या 17 प्रभागात 17 उमेदवारही देता आले नाहीत, असा चिमटा भाजपाला काढून ज्यांचा पाय भारत भूमीलाही लागत नाही ते भोर नगरपालिकेच्या सत्तेची स्वप्ने पाहतात याचे आश्‍चर्य वाटते. भोरचे मतदार कॉंग्रेस पक्षाच्या हाती एकहाती सत्ता देतील, यात शंका नसल्याचे आमदारांनी सांगितले.
आमदार थोपटे म्हणाले की, मागील पंचवार्षिकमध्ये आम्ही जाहीर केलेल्या जाहीरनाम्यातील 90 ते 95 टक्के कामे पूर्ण केली असून यात रस्ते, पाणी, वीज, प्रशासकीय इमारत, ओला सुका कचरा निर्मुलन, त्यासाठीचा कॉंम्पॅंक्‍टर, अग्नीशमन बंब, संपुर्ण भोर शहरातील रस्त्यांचे कॉंक्रीटीकरण, भोरशहरातील पाणी पुरवठ्याची वितरीका दुरुस्ती, भोर नगर पालिकेच्या प्राथमिक शाळांसाठी ई-लर्निंग सुविधा, 7 कोटी रुपये खर्चाचे भोर एसटी आगाराचे नवीन काम, नाना नानी पार्क, बालोद्यान, नवी आळी येथील व्यायाम शाळेस साहीत्य यांचा समावेश आहे.
या निवडणुका चौरंगी होणार असून राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजपा यांच्यात नगराध्यक्ष पदासाठी चुरस लागली असली तरी आमचा उमेदवारच अध्यक्षपदी विराजमान होईल, याचा आम्हाला विश्वास असून या निवडणुकीत आमचे उमेदवार 17 प्रभागात 17 ही जागा जिंकुन विरोधकांना भोर शहरातील सुज्ञ मतदार घरचा रस्ता दाखवतील, अस विश्‍वास आमदार संग्राम थोपटे यांनी व्यक्त केला.

  • 62 आकडा आमच्यासाठी शुभ…
    भोर नगरपालिकेच्या माध्यमातून भोर शहरात गेल्या पाच वर्षांत कोट्यवधी रुपये खर्चाची कामे झाली. त्यामुळे या निवडणुकीत कॉंग्रेसच्या तिकीटासाठी 62 इच्छुकांनी उमेदवारीसाठी मागणी केली होती. हे इच्छुक पात्र असतानाही त्यांना उमेदवारी देता आली नाही. या शिवाय भोर शहरातील मुस्लीम बांधवांना उमेदवारी देता आली नाही, याची मनात खंत आहे. मात्र योग्य वेळी त्यांना सन्मानाची संधी दिली जाईल. भोर पालिकेच्या निवडणुकीत 62 जणांनी उमेदवारी मागीतली, अशीच राजगड कारखान्याच्या निवडणुकी वेळी 62 जणांनी उमेदवारी मागीतली होती, तेंव्हा आम्ही सर्वच्या सर्व 17 जागा जिंकल्या होत्या त्यामुळे 62 हा आकडा आमच्यासाठी शुभ मानला जातो, असे आमदार संग्राम थोपटे यांनी सांगितले.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)