भोमाळेतील रस्ता सात महिन्यांनंतर पुर्वत

जुलै महिन्यात मुसळधार पावसामुळे कोसळली होती दरड

राजगुरुनगर- भोमाळे (ता. खेड) येथे खालचे भोमाळे व वरचे भोमाळे या दोन गावांना जोडणाऱ्या रस्त्यावर मुसळधार पावसामुळे जुलै 2018 मध्ये दरड कोसळल्याने दोन गावांचा संपर्क तुटला होता. ग्रामस्थांनी हा रस्ता पूर्ववत करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर जिल्हापरिषदेने निधी उपलब्ध करून हा रस्ता नुकताच पूर्ववत केला आहे.
भोरगिरी भीमाशंकर परिसरात दि. 14 ते 15 जुलै रोजी मुसळधार पाऊस झाला होता. या अतिवृष्टीत वरचे भोमाळे गावाजवळ रस्त्याच्या वरचा भाग तुटून खाली आला आहे. सुदैवाने कोणतीही जीवित हानी घडली नव्हती. तरीही या गावातील 1994 मध्ये कोसळलेल्या दरडीची आठवण झाल्याने भीतीचे वातावरण पसरले होते. वरच्या भोमाळे गावाकडे जाणाऱ्या रस्ता बंद झाला होता. त्यामुळे या गावातील दळणवळणाचा मोठा प्रश्‍न सतावत होता. पुणे जिल्हा परिषदेकडे याबाबत भोमाळे गावाचे सरपंच सुधीर भोमाळे, उपसरपंच नयना शिंदे व सर्व सदस्य ग्रामस्थांनी खेड पंचायत समितीच्या माध्यमातून रस्त्यावरील कोसळलेले दगड माती बाजूला करून रस्ता खुला करून देण्याची मागणी केली होती. यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याने जिल्हा परिषदेने रस्त्यावर कोसळलेली दरड बाजूला करण्यासाठी रस्ता दुरुस्ती निधीतून पुणे जिल्हा परिषदेने तीन लाख रुपयांचा निधी उपलब्ध केल्याने त्याचे काम मागील महिन्यात सुरू होते. ते पूर्ण झाले असून हा रस्ता वापरण्यासाठी खुला करण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता सुरेश कानडे, बी. एस. शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली भोमाळे ग्रामपंचायतीने हे काम मार्गी लावले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)