भोजापूर धरणातून आवर्तन सोडण्यात यावे

शेतकऱ्यांची पालकमंत्र्याकडे मागणी ः संगमनेर तालुक्‍यात केली दुष्काळाची पाहणी
संगमनेर – पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी संगमनेर तालुक्‍यातील निमोण, पिंपळे येथे दुष्काळी स्थितीचा पाहणी केला. यावेळी शेतकऱ्यांनी त्यांच्यासमोर व्यथा मांडल्या. तसेच भोजापूर धरणातून आवर्तन सोडण्यात यावे, अशी आग्रही मागणी त्यांच्याकडे केली. दुष्काळी समस्या सोडविण्यासाठी उपाययोजना करू, अशी ग्वाही पालकमंत्री शिंदे यांनी यावेळी दिली.
शनिवारी ना. शिंदे यांनी संगमनेर तालुक्‍यात दुष्काळ पाहणी दौरा केला. निमोण भागातील पाहणी करताना त्यांच्यासमवेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजित माने, प्रांताधिकारी भागवत डोईफोडे, तहसीलदार साहेबराव सोनवणे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पंडित लोणारे, विभागीय कृषी अधिकारी बाळासाहेब मुसमाडे, संगमनेरचे तालुका कृषी अधिकारी कारभारी नवले, संगमनेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुरेश शिंदे, भाजपचे ज्ञानेश्वर घुले, राजेंद्र देशमुख, काशिनाथ पावसे, सुधाकर गुंजाळ, राम जाजू, भीमराज चत्तर, सरपंच संदीप देशमुख, भाऊ पाटील कोटकर, अण्णासाहेब ढोणे, विनायक गुंजाळ, सुनील चकोर, अण्णासाहेब चकोर, बबन सांगळे, भाऊसाहेब घुगे, चांगदेव घुगे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री शिंदे म्हणाले, दुष्काळी स्थितीत सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. यंदा पावसाअभावी दुष्काळी व दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाली आहे. दुष्काळी समस्या सोडविण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. भोजापूर धरणातून आवर्तन सोडण्यासाठी आपण लक्ष घालू, असेही त्यांनी सांगितले.
शिंदे यांच्या दौऱ्याबाबत शेतकऱ्यांना फारशी कल्पना नव्हती. सकाळी आठच्या सुमारास ना. शिंदे यांचे निमोण येथील टोपडे आघाडा येथे आगमन झाले. निमोण व पिंपळे येथे कोठेही गावात न थांबता ते ठिकठिकाणी थेट शेतात गेले. निमोण येथे अनिल घुगे यांनी शिंदे यांना आपल्या व्यथा सांगितल्या. शिंदे यांनी तेथील डाळिंब पिकाची पाहणी केली. कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे आहे, असे आश्वासन दिले. त्यानंतर पिंपळे येथे पुंजा गायकवाड यांच्या शेतातील कांदा पिकाची पाहणी केली. पाण्याअभावी येथील पीक हातचे गेल्याने शिंदे यांनी गायकवाड यांना धीर दिला. दुष्काळी पाहणी दौऱ्यानंतर ना. शिंदे यांनी नान्नजदुमाला येथील संत ज्ञानेश्वर माऊली मंदिरात दर्शन घेतले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)