भेसळयुक्‍त भंडाऱ्याबाबत पालकमंत्र्यांना साकडे

जेजुरी-तीर्थक्षेत्र जेजुरीच्या खंडेरायाचे सोने समजला जाणारा भंडारा गेल्या काही वर्षांपासून भेसळचा आणि केमिकलयुक्‍त यलो पावडर या नावाने विकला जात आहे. नागरिकांच्या व भाविकांच्या आरोग्याला अपायकारक होत असल्याच्या तक्रारी अन्न व औषध भेसळ प्रशासनाला करूनही त्याकडे संबंधित विभागाने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे आता भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी थेट अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा पालकमंत्री गिरीश बापट यांच्याकडे निवेदन देऊन भेसळयुक्‍त भंडारा विक्रेत्यांवर व उत्पादन करणाऱ्या व्यक्‍तींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. अशाच आशयाचे पत्र प्रांतअधिकारी संजय आसवले, पुरंदरचे तहसीलदार सचिन गिरी यांनाही देण्यात आले आहे. भाजपचे जिल्हा सरचिटणीस आर. एन. जगताप, जेजुरी शहर महिला आघाडीच्या अलका शिंदे यांच्या या निवेदनावर सह्या आहेत.
जेजुरीच्या खंडेरायाच्या कुलधर्म -कुलाचार व धार्मिक विधींमध्ये भंडाऱ्याला (हळद) अनन्यसाधारण महत्व आहे.धार्मिक विधी करताना राज्यभरातून आलेले भाविक मुक्‍तहस्ताने भंडाऱ्याची उधळण करतात. सोनपिवळ्या भंडारा उधळणीमुळेच पुरातन काळापासून येथे देवा तुझी सोन्याची जेजुरी असे संबोधले जाते. तर श्रद्धेने भंडाऱ्याला खंडेरायाचे सोने समजले जाते. त्यामुळे येथे कागदात भंडारा न विकता कापडी पिशवीत दिला जातो.
बहुतांश भाविक देवाचा प्रसाद म्हणून भंडारा भक्षणही करतात. तसेच खंडोबाचे प्रतिक म्हणून रोज कपाळी लावणारे ग्रामस्थ व भाविक शेकडोंच्या संख्येने आहेत. मात्र, गेल्या काही वर्षांपासून काही बाहेरील व्यापाऱ्यांकडून येथे मोठ्या प्रमाणावर भेसळयुक्‍त व केमिकल मिश्रित भंडारा विकला जात आहे. यलो पावडर असे गोंडस नाव देऊन विक्री होणाऱ्या भंडाऱ्यातील आरोग्याला घातक असलेल्या केमिकल वापरामुळे अनेक ग्रामस्थ -भाविकांना त्वचेचे व डोळ्यांचे विकार झालेले आहेत. तर काही जणांना श्वसनाचे विकार जाणवत आहेत. सतत कपाळी भंडारा लावल्यामुळे कपाळ व चेहेरा काळे पडण्याच्या प्रकारांमध्ये वाढ झाली आहे. त्याहून विशेष बाब म्हणजे जत्रा -यात्रा उत्सव काळात मोठ्या प्रमाणावर भंडारा उधळणीमुळे पुरातन असलेल्या दगडी बांधणीच्या गडकोट पायरी मार्गाची झीज होऊ लागली आहे.
मूळ स्वयंभू लिंगावरही भेसळयुक्‍त भंडाऱ्याचा परिणाम होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. जत्रा -यात्रा उत्सव काळात भेसळीचा भंडारा मोठ्या प्रमाणावर उधळला जात असल्याने पालखी सोहळ्यातील खांदेकरी -मानकरी यांना प्रचंड त्रास होतो. अनेक वर्षांपासून मानकरी -ग्रामस्थांकडून याबाबत विक्रेत्यांना आवाहन व तक्रारी करूनही अन्न व औषध भेसळ प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.
विशेष म्हणजे मोठ्या व्यापाऱ्यांकडून किरकोळ विक्रेत्यांना यलो पावडर च्या पिशवीचे बिल दिले जात नसल्याची धक्कादायक बाब पुढे येत आहे. बाहेरील काही व्यापारी येथे एका टेम्पोतून भेसळीच्या भंडाऱ्याच्या पिशव्या आणून किरकोळ विक्रेत्यांना वितरीत करतात.
भेसळीच्या भंडारा विक्रीमध्ये दिवसेंदिवस होणारी वाढ आणि भाविक व ग्रामस्थांच्या भावना व आरोग्याशी विक्रेत्यांनी चालविलेला खेळ पाहता. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी ठोस व कडक कारवाईची मागणी थेट अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांच्यासह प्रांताधिकारी व तहसीलदार यांच्याकडे केली असल्याचे आर.एन. जगताप, अलका शिंदे यांनी सांगितले.

  • नफेखोरीसाठी भेसळीचा मार्ग
    उच्च प्रतीच्या हळदीचा दर दहा किलोच्या पिशवीला 1200 ते 1400 रुपये, चांगल्या हळद -भंडाऱ्याच्या 10 किलोच्या पिशवीचा दर 900 ते 1 हजार रुपये आहे. तर यलो पावडर -अथवा भेसळीच्या भंडारा 10 किलो पिशवीचा दर 400 ते 500 रुपये आहे. साहजिकच बाहेरील विक्रेत्यांकडून जास्त नफा मिळवण्याच्या हेतूने भेसळीचा भंडारा मोठ्या प्रमाणावर भाविकांना विकला जातो. ग्राहकांची एक प्रकारे फसवणूकच केली जाते. अशा व्यापारी किंवा विक्रेत्यांना जाब विचारण्याचा प्रयत्न झाल्यास हा भंडारा खाण्याचा नसून उधळण्यासाठीचा आहे. असे साळसूदपणे सांगितले जाते.
  • पेढ्यांच्या दर्जाबाबतही प्रश्‍नचिन्ह
    जेजुरीचा भंडारा -खोबरे पुरातन काळापासून प्रसिद्ध आहे. मात्र सध्याच्या काळात काही वर्षांपासून महाद्वार व पायरीमार्गावर मिळणारा पातेल्यातील खवा -पेढा आता प्रसिद्ध झाला आहे. अनेक भाविक मोठ्या श्रद्धेने देवाचा प्रसाद म्हणून येथील पेढा घेऊन जातात. परंतु पातेल्यामध्ये विक्रीसाठी ठेवलेला हा पेढा व त्याचा दर्जा तपासून पाहण्याची गरज असल्याचे काही भाविकांसह नागरिकांनी बोलून दाखवले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)