भेटवस्तूंमागचा सहजभाव

भेटवस्तू, गिफ्ट्‌स देण्यामागे सहजभाव फार कमी वेळा असतो. काहीतरी आडाखे आणि गणितेच जास्त असतात. डोके देण्याघेण्यातच अडकून पडते. आपल्या कोणत्याही ग्रुपमध्ये एखादा असा देण्याघेण्यात रमलेला असला, तर इतरांवर देखील देण्याघेण्याच्या चक्रात पडायचे बंधन नकळत येऊन पडते. परदेशी लोकांसमोर तर हे फार प्रकर्षाने जाणवते. त्यावेळी ते तुम्हांला किती किंमत देतात, ते बघावे लागते नाईलाजाने! अनेकदा वन डॉलर शॉपमधून परदेशी लोक गिफ्ट्‌स आणतात.

तुम्ही मारे त्यांना तुमच्या करन्सीच्या हिशेबात खूप महागडे गिफ्ट देतात. तू एक दे, मग मी एक देईन, असला प्रकार कितीही मनात आणायचा नाही असे ठरवले, तरी येतोच. कधी थोरामोठ्यांच्या दडपणाखाली, कधी स्टेटस म्हणून! एखाद्याच्या दानतचा सवाल नाही राहात मग तो. कुणाकडे असतील लाखो रुपये, पण नाहीये असल्या गिफ्ट्‌स द्यायची इच्छा. कुणाला परवडत नसेल, तरी आपली पत राखायला ते महागाच्या गिफ्ट्‌स देतात. लोक काय म्हणतील ह्याचा विचार करतात. गिफ्ट्‌समागे असे बरेच राजकारण असते. चालीरीतींचे निकष असतात.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

त्यातल्यात्यात वापरल्या जातील, पडून राहणार नाहीत, समोरच्याला काहीतरी वेगळे मिळेल, राज्याबाहेरच्या लोकांना आपल्या राज्याची गंमत कळेल आणि परदेशी लोकांना देवांच्या मूर्तींपलीकडे काहीतरी भारतीय असे अनुभवायला मिळेल, असा विचार आपण गिफ्ट देताना करू शकतो.

त्याही पलीकडे जाऊन असे सांगावेसे वाटते की अशी वस्तूंची देवाणघेवाण न करता मिळणारा सहवास जास्त समृद्ध करणारा असतो. पोट भरलेल्याला जेवणातला एकच पदार्थ देऊन उपयोग नाही आणि पूर्ण जेवण देऊनही उपयोग नाही! ज्याला गरज आहे, तिथेही फुकट घ्यायची सवय लावून उपयोग नाही. गिफ्ट प्रकरण असे फार गुंतागुंतीचे असते. त्यापेक्षा, सहजच आपण स्वतःच आवडीच्या व्यक्तीला काही बनवून देणे जास्त गोड असू शकते. फार महागडे काही देण्यापेक्षा छोट्या- छोट्या गोष्टींमध्येही एखादी छान आठवण राहून जाते. फुलझाडं, फळझाडं तर भेटवस्तू म्हणून बराच काळ साथ करू शकतात. म्हणूनच गिफ्ट्‌समागचा सहजभाव जपणे महत्त्वाचे. नाहीतर, ते एक ओझेच होऊन जाते, परतफेड करायचे!

– प्राची पाठक 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)