भूमिपूत्र अन्‌ कामगारांनाही न्याय देणार!

– सदाशिव खाडे : प्राधिकरणाचा पदभार स्वीकारला

पिंपरी – प्राधिकरणाच्या स्थापनेसाठी अनेक भूमिपुत्रांनी जमिनी दिल्या आहेत. त्यांचा साडेबारा टक्के परताव्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार असून, भूमिपुत्र आणि कामगार यांच्यात समन्वय साधून न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहे, अशी ग्वाही पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे नवनिर्वाचित अध्यक्ष सदाशिव खाडे यांनी दिली.

पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या अध्यक्षपदाची सूत्रे सदाशिव खाडे यांनी शुक्रवारी (दि. 7) स्वीकारली. प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतिशकुमार खडके यांनी पुष्पगुच्छ देऊन खाडे यांचे स्वागत केले.

यावेळी खासदार अमर साबळे, राज्य लेखा समितीचे अध्यक्ष ऍड. सचिन पटवर्धन, उपमहापौर सचिन चिंचवडे, सभागृह नेते एकनाथ पवार, नगरसेवक बाबू नायर, माऊली थोरात, केशव घोळवे, नामदेव ढाके, मोरेश्वर शेडगे, अभिषेक बारणे, कैलास बारणे, संदीप कस्पटे, खाडे यांच्या पत्नी संगिता खाडे, माजी उपमहापौर शैलजा मोरे, सीमा सावळे, महिला शहराध्यक्ष शैला मोळक, तसेच विनायक गायकवाड, राजू दुर्गे यांच्यासह भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते उपस्थित होते.

प्राधिकरणाची स्थापना करताना पिंपरी-चिंचवड या औद्योगिक नगरीतील कामगारांना माफक किमतीत घरे मिळावी, असा उद्देश ठेवण्यात आला होता. यासाठी स्थानिक नागरिकांनी त्यांच्या जमिनी दिल्या असून जमिनीच्या मोबदल्यात स्थानिकांना साडेबारा टक्के परतावा देण्यात येणार आहे. 14 वर्ष लोकनियुक्त अध्यक्ष नसल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना घरे आणि साडेबारा टक्के परतावा हे दोन्ही मुद्दे काही प्रमाणात दुर्लक्षित झाले आहेत. त्यामुळे आगामी काळात याच दोन मुद्‌द्‌यावर लक्ष केंद्रीत करणार असल्याचे, खाडे यांनी सांगितले.

दोन्ही आमदारांची अनुपस्थिती
स्थानिक खासदार, आमदार, राज्य लेखा समितीचे अध्यक्ष ऍड. सचिन पटवर्धन यांनी केलेल्या यशस्वी पाठपुराव्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्राम विकास मंत्री पंकजा मुंडे, पालक मंत्री गिरीश बापट, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी या बाबतीत लक्ष घालून लोकनियुक्त अध्यक्षांची नियुक्ती केली आहे, अशी कृतज्ञता सदाशिव खाडे यांनी व्यक्‍त केली. मात्र, या कार्यक्रमाला शहराध्यक्ष तथा आमदार लक्ष्मण जगताप आणि आमदार महेश लांडगे यांच्यासह त्यांच्या बहुतांश समर्थक नगरसेवकांनी पाठ फिरवली. त्यामुळे आमदार द्वयी या नियुक्‍तीबाबत नाराज आहेत का? अशी चर्चा शुक्रवारी राजकीय वर्तुळात रंगली होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)