भूमिपूजनाचा थाट; वर्ष उलटूनही जागा सपाट

सावित्रीच्या लेकींची परवडच : वसतिगृह उभारणीसाठी मुहूर्त मिळेना : विद्यापीठ प्रशासन गंभी नाही?

– व्यंकटेश भोळा

-Ads-

पुणे – सावित्रींच्या लेकी अर्थात विद्यार्थिनींसाठी नवीन वसतिगृहाच्या बांधकामाचे मोठ्या थाटात भूमिपूजन झाले. एक वर्ष उलटले, पण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने मुलींच्या नवीन वसतिगृह बांधकामास सुरूवातच केली नसल्याची माहिती समोर आली आहे. सध्याच्या मुलींच्या वसतिगृहामागे नवे वसतिगृह उभारण्यात येणार आहे. मात्र, तेथील राडारोडा न काढल्याने काम ठप्प झाले आहे. देशात पारंपरिक विद्यापीठात अव्वल येण्याचा मान मिळविलेल्या पुणे विद्यापीठाचे मुलींच्या नवीन वसतिगृह बांधकाम करण्याविषयी फारसे गंभीर नसल्याचे वास्तव पुढे येत आहे.

तत्कालीन कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी 13 फेब्रुवारी 2017 मध्ये सध्या अस्तित्वात असलेल्या मुलींच्या वसतिगृहाच्या पाठीमागे नवे वसतिगृहाचे भूमिपूजन केले. मुलींच्या संख्या व मागणी पाहता त्याचे भूमिपूजनही करण्यात आले. त्यानंतर त्या जागेवरील असलेले सेवक वसाहतील लोकांना अन्य ठिकाणी हलविण्यात आले. मात्र त्यापुढे काहीच कार्यवाही झाली नाही. या वसतिगृहासाठी सुमारे 5 कोटींची तरतूद करण्यात आली होती.

“विद्यापीठाच्या आवारात विविध विभागात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थिनींना राहण्याची सोय उपलब्ध करून देण्यासाठी मुलींसाठी नवीन वसतिगृहाचे बांधकाम हाती घेतले’ असे विद्यमान कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी दि. 17 मार्च 2018 रोजी झालेल्या अभिसभेत (सिनेट) ठणकावून सांगितले. त्यामुळे नवीन वसतिगृह लवकरच मुलींना उपलब्ध होण्याची आशा निर्माण झाली होती. पण, सद्यस्थिती पाहता नवीन वसतिगृह कागदावरच असल्याचे स्पष्ट होत आहे.

वसतिगृहांची सद्यस्थिती
विद्यापीठात सध्याच्या वसतिगृहामध्ये मुलांच्या 528, तर मुलींच्या 408 खोल्या उपलब्ध आहेत. मागील वर्षी मुलांच्या वसतिगृहांत एकूण 2 हजार 39 विद्यार्थ्यांना व 1 हजार 523 विद्यार्थिनींना प्रवेश देण्यात आला. विद्यापीठामध्ये एकूण 52 विभाग असून, या विभागांच्या विद्यार्थी संख्येनिहाय लॉटरी पद्धतीने त्यांना वसतिगृहातील खोल्यांचे वाटप करण्यात आले आहे. विद्यापीठात मुलांचे 8, तर मुलींचे 9 वसतिगृह आहेत.

आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह पूर्णत्वास, पण…
पुणे विद्यापीठात प्रवेश घेतलेल्या अन्य देशातील विद्यार्थ्यांसाठी नवीन वसतिगृह बांधण्यात येत आहे. त्याचे बांधकाम योग्य पद्धतीने सुरू आहे. या वसतिगृहाचे निम्मे काम पूर्ण झाले असून मे अखेर आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांचे वसतिगृहाचे बांधकाम पूर्ण होण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरू आहे. आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठ प्रयत्नशील आहे. मात्र, सावित्रींच्या लेकींसाठी मात्र विद्यापीठ दुर्लक्ष करीत आहे.

…म्हणून रखडले काम
मुलींसाठी नवीन वसतिगृहाची ज्याठिकाणी उभारण्यात येणार आहे, त्याठिकाणी सेवक वसाहत होती. तेथे काही सेवक राहत होते. त्या सर्वांना दुसऱ्या ठिकाणी हलविण्यात आले. त्यानंतर तेथील बांधकाम पाडण्यात आली. ही सर्व जागा मोकळी करून संबंधित कंत्राटदारांना देण्याची जबाबदारी विद्यापीठाच्या स्थावर विभागाची होती. स्थावर विभागाने जागा लवकर मोकळी न केल्याने त्याठिकाणी राडारोडा तसाच पडून आहे. परिणामी, प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली नसल्याचे निदर्शनास येत आहे.

 

कुलगुरूंची हतबलता
मुलींच्या नवीन वसतिगृह बांधकामास मंजुरी मिळाली असून त्यानुसार काम हाती घेण्यात येत असल्याचे कुलगुरू डॉ. करमळकर यांनी म्हटले होते. मात्र, बांधकाम का रखडले, त्याचे कारण, त्रुटी या सर्व बाबी कुलगुरूंच्या निदर्शनास आणून देण्यात आली होती. वसतिगृहांस विलंब होत असूनही कुलगुरूंनी पुढाकार न घेतल्याने हे काम ठप्प असल्याचे दिसून येत आहे.

नवीन मुलींचे वसतिगृहे पाच मजली आहे. त्यात सुमारे 200 मुलींना राहण्याची सोय होती. तब्बल 5 कोटी रुपयांची तरतूद असतानाही विद्यापीठ प्रशासनाने चालढकल केली आहे. ही बाब चिंताजनक आहे. देशात मान मिळतो, पण साधे वसतिगृहे मंजूर असूनही बांधण्यास कुचराई करणे हे दुर्देव म्हणावे लागेल.
– संतोष ढोरे, सिनेट सदस्य.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)