भूमिगत वीजवाहन्यांना अखेर मुहूर्त

पुणे – गेल्या काही वर्षांपासून बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित असलेल्या महावितरणच्या भूमिगत वीजवाहिन्यांना अखेर मुहूर्त मिळाला आहे. पुणे परिमंडलातील पुण्यासह उपनगर आणि पिंपरी-चिंचवडमधील वीजवहिन्या भूमिगत टाकण्याचे काम तातडीने सुरू करण्यात यावे, असे आदेश मुख्य कार्यालयाने दिले आहेत. त्यानंतर ग्रामीण भागातील तालुक्‍यांच्या गावांमध्ये टप्प्याटप्प्याने ही कामे सुरू करण्यात येणार आहेत. त्याशिवाय खोदाई शुल्काच्या संदर्भात महापालिका प्रशासनाशी चर्चा करून त्याचा अहवाल मुख्य कार्यालयाला सादर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. त्यानुसार या कामाला 1 जानेवारीपासून प्रारंभ करण्याचा संकल्प प्रशासनाने सोडला आहे. त्याच्या निविदा पुढील आठवड्यात काढण्यात येणार आहेत.

पुणे परिमंडलातून महावितरण प्रशासनाला इतर परिमंडलापेक्षा सर्वाधिक महसूल मिळत असतो, ही बाब लक्षात घेऊन प्रशासनाच्या वतीने या परिमंडलाला अधिक दर्जेदार सुविधा देण्यासाठी प्रयत्न करण्यात आले असून त्यासाठी आतापर्यंत कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. मात्र, हे वास्तव असताना या परिमंडलाच्या अखत्यारित आतापर्यंत विजेचे सर्वाधिक अपघात घडले आहेत. त्यातील बहुतांशी अपघात हे वीजवाहिन्या पडून झाले आहेत, ही बाब लक्षात घेऊन महावितरणचे तत्कालीन मुख्य अभियंता सिद्धार्थ नागटिळक यांनी ओव्हरहेड वीजवाहिन्या भूमिगत करण्याचा प्रस्ताव मुख्य कार्यालयाला सादर केला होता.

या अहवालाची दखल घेऊन मुख्य कार्यालयाच्या वतीने पुण्यात तज्ज्ञांचे पथक पाठविण्यात आले होते. या पथकाने याची पाहणी केल्यानंतर या प्रस्तावास अनुकुलता दर्शवली होती. त्यासाठी निधी मंजूर केल्यानंतर या कामाला प्रारंभही करण्यात आला होता. त्यानुसार अवघ्या 6 ते 7 महिन्यांच्या कालावधीत शहरातील जवळपास 20 ते 25 टक्‍के भागात भूमिगत वीजवाहिन्या टाकण्यात प्रशासनाला यश आले होते. मात्र, महापालिका प्रशासनाने अचानकपणे खोदाई शुल्कात वाढ केल्याने ही कामे थांबविण्याचा निर्णय महावितरणने घेतला होता. त्यामुळे शहरातील विशेषत: झोपडपट्ट्या आणि मध्यवस्तीतील कामे अर्धवट अवस्थेत ठेवण्यात आली होती, परिणामी वीजवाहिन्यांच्या अपघातांमध्ये वाढ झाली होती; त्यानंतर दोन्ही प्रशासनाच्या झालेल्या चर्चेमध्ये त्यावर उभयमान्य तोडगा काढण्यात आला होता.

हा तोडगा निघून वर्ष उलटल्यानंतरही महावितरण प्रशासनाच्या वतीने ही कामे सुरू करण्यात आली नव्हती. त्यासंदर्भात दैनिक “प्रभात’ ने 23 नोव्हेंबरच्या अंकामध्ये सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेऊन महावितरणच्या मुख्य कार्यालयाने त्यासाठी हालचाली सुरू केल्या होत्या. त्यानुसार ही कामे येत्या जानेवारीपासून सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. याबाबत महावितरणचे मुख्य जनसंपर्क अधिकारी पी. एस. पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, विजेचे अपघात टाळण्यासाठी ही कामे वेगाने पूर्ण करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)