भूमिअभिलेख उपअधीक्षकाला खोऱ्याच्या दांड्याने मारहाण

श्रीगोंदे येथील कार्यालयातील प्रकार : चिखली येथील एकाला पोलिसांनी केली अटक
श्रीगोंदे  – “माझ्या नातेवाईकांच्या जमिनीची मोजणी का करून देत नाहीत, तुम्ही समोरच्याकडून पैसे खाल्ले आहेत,’ असे म्हणत राग अनावर झालेल्या चिखली येथील गणेश भिवसेन झेंडे याने भूमिअभिलेख कार्यालयातील उपअधीक्षक भास्कर भांदुर्गे यांना खोऱ्याच्या दांड्याने मारहाण करीत जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना गुरुवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी भूमिअभिलेखचे उपअधीक्षक भांदुर्गे यांच्या फिर्यादीवरून श्रीगोंदे पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला असून, आरोपी गणेश झेंडे याला पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत भूमिअभिलेखचे उपअधीक्षक भास्कर भांदुर्गे यांनी पोलिसांत नोंदविलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मी एक वर्षापासून येथे नियुक्‍तीस आहे. घारगाव येथील गट नं. 208 व 224 चे कोर्टवाटप प्रकरणी सुभद्राबाई अर्जुन कळमकर व आणखी एकाने भूमिअभिलेख कार्यालयात 19 जुलै 2016 रोजी मोजणी अर्ज दिला होता. सदर दरखास्तीविरुद्ध अर्जुन पर्वती कळमकर यांनी औरंगाबाद खंडपीठाकडे अपील दाखल केलेले आहे. या प्रकरणात 22 जानेवारी 2018 रोजी औरंगाबाद खंडपीठाने तात्पुरता मनाई आदेश दिला आहे. त्यामुळे सदर मोजणीचे काम स्थगित ठेवले आहे. सुभद्राबाई कळमकर यांचा नातेवाईक गणेश भिवसेन झेंडे (रा. चिखली) भूमिअभिलेख कार्यालयात चौकशीसाठी एक-दोन वेळा आला होता.
उपअधीक्षक भांदुर्गे यांनी फिर्यादीत पुढे म्हटले आहे की, गुरुवारी (दि. 14) मी माझे कक्षात कामकाज करीत होतो. या वेळी माझे सहकारी विजय राठोड, संजय डोळस, बाळू नांगरे, चंद्रशेखर शिंदे, तेजकुमार रोकडे, अविनाश गावडे, प्रवीण बोरुडे, किरण हराळ, कानिफ भापकर व सर्जेराव पोटघन हे माझ्या कार्यालयात उपस्थित होते. मी देवदैठण येथील शरद सुखदेव खेडकर यांच्याशी कामाबाबत चर्चा करीत होतो. या वेळी दुपारी एकच्या सुमारास सुभद्राभाई कळमकर यांचा नातेवाईक गणेश झेंडे खोऱ्याचा दांडा घेऊन शिवीगाळ करीत माझ्या कक्षात घुसला. सुभद्राबाई कळमकर यांच्या मोजणीला मनाई नसताना तुम्ही समोरील अर्जुन कळमकर यांच्याकडून पैसे खाल्ले आहेत, म्हणून माझे नातेवाईकांची मोजणी करून देत नाहीत, असे म्हणून मला हातातील खोऱ्याच्या दांड्याने मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. माझ्या कार्यालयात घुसून सरकारी कामात अडथळा आणला. कार्यालयातील सहकाऱ्यांनी मला झेंडे यांच्या तावडीतून कसेबसे सोडविले.
या प्रकरणी भूमिअभिलेखचे उपअधीक्षक भास्कर सुभाष भांदुर्गे (वय 50, रा. श्रीगोंदे) यांच्या फिर्यादीवरून गणेश भिवसेन झेंडे (रा. चिखली) याच्याविरुद्ध श्रीगोंदे पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी गणेश झेंडे याला अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल दहिफळे करीत आहेत.

संघटनेचे जिल्ह्यात “लेखणी बंद’ आंदोलन…
श्रीगोंदे येथील भूमिअभिलेख उपअधीक्षक भास्कर भांदुर्गे यांना खोऱ्याच्या दांड्याने मारहाण करीत जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याच्या घटनेचा भूमिअभिलेख कर्मचाऱ्यांच्या संघटनेने तीव्र निषेध नोंदविला. या घटनेच्या निषेधार्थ श्रीगोंद्यासह जिल्ह्यात भूमिअभिलेख कार्यालयांत “लेखणी बंद’ आंदोलन करण्यात आल्याची माहिती भूमिअभिलेख कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)