भूजल सर्वेक्षण विभागात सोलापूर अग्रेसर

मागील पाच वर्षाच्या तुलनेत 1.55 मीटरने भूजल पातळीत वाढ
165 निरीक्षण विहिरींचे सर्वेक्षण करून नोंदविला निष्कर्ष

अर्जुन नलवडे

सोलापूर – भूजल सर्वेक्षणच्या पुणे विभागात येणाऱ्या कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे आणि सोलापूर या जिल्ह्यामध्ये मागील पाच वर्षाच्या तुलनेत सोलापूर जिल्ह्याची भूजल पातळीत सर्वांधिक वाढ झाली आहे. सोलापूर जिल्ह्यातील भूजल पातळीत जानेवारी 2018 च्या आकडेवारीनुसार सुमारे 1.55 मीटरने वाढ झाली आहे. यासाठी भूजल सर्वेक्षण विभागाच्या वतीने सुमारे 165 निरीक्षण विहिरींच्या नोंदी घेण्यात आल्या. इतर जिल्ह्यातील भूजल पातळी क्रमाने कमी असल्याचे आढळत आहे. त्यामुळे “पाणी मुरवा आणि पाणी वाचवा’, असा संदेश देऊन याची जनजागृती करण्याची गरज भासत आहे.

याबाबत माहिती देताना पुणे विभाग, उपसंचालक भूवैज्ञानिक कार्यालयातील कनिष्ठ भूवैज्ञानिक एस. एस. अन्सारी यांनी सांगितले की, प्रत्येक जिल्ह्यात सरासरी पाऊस झाला तरी त्या भागातील जमिनीत पाणी मुरण्याचे प्रमाण भिन्न आहे. यासाठी तेथील भौगोलिक परिस्थिती कारणीभूत आहे. यात तेथील मृदा, खडक तसेच पाणी जमिनीत मुरविण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजना आदी घटकांचा समावेश होत असतो.

सोलापूर जिल्ह्यात अकरा तालुक्‍यांत सुमारे 165 निरीक्षण विहिरी नोंदविल्या आहेत. त्यानुसार जानेवारी, मार्च, मे आणि ऑक्‍टोंबर या चार महिन्यात या निरीक्षण विहिरींची भूजल पातळीची निरीक्षणाद्वारे नोंद घेतली जाते. यासाठी पावसाळ्यापूर्वी आणि पावसाळ्यानंतर अशा टप्प्यातही याची नोंद घेऊन निरिक्षणाद्वारे निष्कर्ष काढला जातो. त्यानुसार सोलापूर जिल्ह्यातील भूजल पातळी मागील पाच वर्षाच्या तुलनेत जानेवारी 2018 च्या आकडेवारीनुसार 1.55 मीटरने वाढली आहे. त्यामध्ये माढा तालुक्‍यात सर्वाधिक म्हणजे 4.31 मीटर अशी नोंद झाली आहे. तर, माळशिरस तालुक्‍यात 0.40 मीटर अशी नोंद झाली आहे.

याचप्रमाणे, पुणे जिल्ह्यातील 13 तालुक्‍यांमधील 192 विहिरांचे निरीक्षण केले आहे. त्यामध्ये मागील पाच वर्षाच्या तुलनेत जानेवारी 2018 च्या आकडेवारीनुसार 0.78 मीटरने वाढ झाली आहे. त्यामध्ये जुन्नर तालुक्‍यांत 1.62 मीटर अशी भूजल पातळी वाढली आहे. तर, आंबेगाव तालुक्‍यांत 0.05 मीटर सर्वात कमी वाढ झालेली दिसून येते. पुणे जिल्ह्याच्या पाठोपाठ सातारा जिल्ह्याचा क्रमांक लागतो. सातारा जिल्ह्यात एकूण 106 विहिरींचे सर्वेक्षण केले आहे. त्यात 0.61 मीटरने वाढ झाली आहे. या जिल्ह्यात कोरेगाव तालुक्‍यात 1.42 मीटरने वाढ झाली आहे तर, जावळी तालुक्‍यात फक्त 0.02 मीटरने वाढ झालेली दिसून येते.

याचबरोबर पुणे विभागात चौथा क्रमांक लागतो तो म्हणजे कोल्हापूर जिल्ह्याचा. कोल्हापूर जिल्ह्यात 99 विहिरींचे सर्वेक्षण करण्यात आले. जिल्ह्यात करवीर तालुका आघाडीवर आहे. या तालुक्‍यात 0.78 मीटरने वाढ झाली आहे तर, गडहिंग्लज तालुक्‍यात भूजल पातळी -0.42 मीटरने कमी झालेली आहे. त्यानंतर विभागनिहाय भूजल पातळी सर्वेक्षणामध्ये सांगली जिल्ह्याचा क्रमांक लागतो. सांगली जिल्ह्यात एकूण 86 विहिरींचे निरीक्षण करण्यात आले. त्यामध्ये पलूस तालुक्‍यात 1.82 मीटरने भूजल पातळीत वाढ झालेली दिसून येते. तर, कवठे महांकाळ तालुक्‍यात -0.04 मीटरने कमी झालेली दिसून येते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)