भूकेल्या जीवांना अन्न पुरविणारी “रॉबिनहूड आर्मी’

पिंपरी – भारतातील एकूण धान्य उत्पन्नाच्या एक तृतीयांश अन्न वाया जातं आणि तरीही लाखो लोक रोज उपाशी झोपतात. समाजात कष्टाची तयारी असूनही काही वेळेस पुरेसे पैसे मिळत नसल्याने दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असलेली लोकं आपल्या आजूबाजूला दिसत असतात. या भीषण परिस्थितीला आव्हान देण्यासाठी शहरात “रॉबिनहूड आर्मी’ ही समाजसेवी संस्था कार्य करत आहे. या संस्थेचे सदस्य आपल्या परिसरातील हॉटेल व सोसायटी धारकांना संपर्क करुन गरजू लोकांना अन्न पुरविण्याचे काम करतात.

“रॉबिनहूड आर्मी’ ही संस्था पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात पंचवीसहून अधिक ठिकाणी कार्यरत आहे. पिंपरीत सुरु असलेला इंद्रायणी थडी या प्रदर्शनामध्ये स्टॉल लाऊन “उरलेले अन्न फेकून न देता आम्हाला द्या, आम्ही गरंजूपर्यंत पोचू’ अशा पद्धतीने जनजागृती करत आहेत. यामुळे, कमी कालावधित अधिकाधिक लोकांपर्यत पोहोचणे सहज शक्‍य होत आहे. लोकांनीही या संस्थेच्या कार्याची माहिती घेऊन कौतुक करत आहेत. या प्रदर्शनात 120 हून अधिक फूड स्टॉल्स असल्यामुळे त्यांचे देखील उरलेले अन्न या संस्थेमार्फत गरिबांपर्यत पोचवले जात आहे. दोन दिवसात शहरातील बाराशेहून अधिक गरजूंना मिळालेले अन्न वाटण्यात आले.

समाजात अनेक कारणांनी दारिद्रय वाट्याला आल्यानंतर अन्नासाठी वणवण भटकावे लागते. काही वेळेस कित्येक लोक उपाशी झोपत असल्याचे आपण पाहत असतो. समाजात बहुतांश लोकांना जगण्याचे साधन नसल्याने त्यांच्या रोजच्या जेवणाचा प्रश्नही आ वासून उभा आहे. या लोकांना रॉबिनहूड संस्था उभी करत आहे. संस्थेचे सदस्य शहरातील विविध हॉटेल्समधील उरलेले अन्नपदार्थ जमा करतात आणि गरीब भुकेल्या लोकांना वाटतात. शहरातील रेस्टॉरन्ट, मोठमोठ्या सोसायट्यांमध्ये जनजागृती झाल्याने त्या स्वत:हून संस्थेशी संपर्क साधून अन्नदान करतात. काही रेस्टॉरन्ट चालकांनी या लोकांसाठी खास जेवण बनवायलाही सुरूवात केली आहे. संस्थेचे स्वयंसेवक इतर ठिकाणी नोकरी करुन उर्वरीत वेळेत सामाजिक कार्य करतात. ही संस्था कोणताही मोबदला न घेता गरीब मुलांना आणि गरजूंना जेवण पोहोचवण्याचे काम करते. यामुळे शहरातील गरीब लोकांना “रॉबिनहूड संस्था’ आधार वाटत आहे.

गेल्या साडेतीन वर्षापासून आमची संस्था शहरातील गरीब लोकांना अन्न पुरविण्याचे काम करत आहे. सध्या संस्थेचे एक हजारहून अधिक स्वयंसेवक आहेत. या संस्थेमध्ये सर्व स्तरातील लोक काम करतात. तसेच, समाजात कष्ट करण्याची तयारी असूनही गरजेपुरते पैसे मिळत नसलेल्या लोकांना अन्न पुरविले जाते.
– प्राजक्ता रुद्रवार, समन्वयक, रॉबिनहूड संस्था.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)