भूंकप घडविणाऱ्या भाजपमध्येही “भूंकप’

भाजपचे गांधीसह चार जणांचे अर्ज बाद शिवसेना व राष्ट्रवादीचाही प्रत्येकी एक अर्ज बाद

नगर: महापालिका निवडणुकीत उमेदवारी अर्जांच्या छाननीत घेण्यात आलेल्या हरकतींवर बड्या राजकीय पक्षांच्या उमेदवारांचे अर्ज बाद झाले आहेत. खासदार दिलीप गांधी यांना सर्वात मोठा राजकीय धक्का बसला आहे. त्याचे सुपूत्र सुवेंद्र गांधी व स्नुषा दिप्ती गांधी यांच्यासह भारतीय जनता पक्षाच्या चार जणांचे उमेदवारी अर्ज बाद झाले आहेत. शिवेसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेसचा प्रत्येकी एक आणि एका अपक्षाचाही अर्ज बाद झाला आहे. विशेष म्हणजे, हरकतींवर निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी शाहूराव मोरे व उपजिल्हाधिकारी वामन कदम यांनी शुक्रवारी (दि.23) पहाटे अडीच वाजता निकाल दिला आहे. या निकालाचे हेच वैशिष्ट आणि प्रशासनाने राजकारणाला दिलेला हा धक्काच म्हणावा लागेल.

भाजपचे उमेदवार सुवेंद्र गांधी, दिप्ती गांधी, प्रदीप परदेशी, सुरेश खरपुडे या चौघांसह शिवसेनेचे उमेदवार व विरोधी पक्षनेते बाळासाहेब बोराटे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार डॉ. योगेश चिपाडे, अपक्ष उमेदवार सय्यद सादीक आरिफ यांचे अर्ज बाद झाले आहेत. महापौर सुरेखा कदम, संभाजी कदम यांच्या अर्जावरील हरकती फेटाळून ते अर्ज वैध ठरविण्यात आले आहेत. उमेदवारी अर्ज छाननी दरम्यान अनेक हरकती दाखल झाल्या होत्या. त्यातील प्रभाग 8, 9, 10, 11 व 12 या प्रभातील प्रमुख दिग्गजांच्या अर्जावरील हरकतींचा निर्णय राखून ठेवण्यात आला होता. प्रभाग 8 (क) व 8 (ड) या दोन जागांवर अर्ज दाखल केलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार डॉ. योगेश चिपाडे यांच्या अर्जाला विशाल खोटे यांनी आक्षेप घेतला आहे. तर प्रभाग 11 (ड) मधील भाजपचे उमेदवार सुवेंद्र गांधी यांच्या विरोधात अतिक्रमणाचा मुद्दा उपस्थित करत शिवसेनेचे उमेदवार गिरीश जाधव व राष्ट्रवादीचे उमेदवार नज्जू पैलवान यांनी गांधी यांच्या उमेदवारी अर्जावर हरकत घेतली आहे.

विरोधी पक्ष नेते बाळासाहेब बोराटे यांच्या घरावरील अनधिकृत मोबाईल टॉवर व त्याच्या कराच्या थकबाकीबाबत राष्ट्रवादीचे उमेदवार संजय घुले यांनी हरकत नोंदविली होती. सुरेश खरपुडे यांच्या अर्जावर बाळासाहेब बोराटे, संजय घुले यांनी हरकती नोंदविल्या होत्या. त्यांच्याकडे मालमत्ता कराची थकबाकी असल्याचे तसेच मंगल कार्यालयांचे बांधकाम अनधिकृतपणे केल्याचा दावा यात करण्यात आला होता. महापौर सुरेखा कदम यांच्या अर्जावर पंकज गांधी व रिजवाना चुडीवाला यांनी हरकत घेतली होती. हॉटेल पांचाली ही त्यांची कौटुंबिक मालमत्ता असून त्यावर अनधिकृत टॉवर व त्याची थकबाकी असल्याचा दावा करण्यात आला होता.

संभाजी कदम यांच्या अर्जावरही संध्या घोलप यांनी हरकत नोंदविली आहे. दीप्ती गांधी यांच्या अर्जावर विजय पटवेकर यांनी हरकत नोंदवून घराच्या अतिक्रमणाचा दावा करण्यात आला होता. या सर्व हरकतींवर गुरुवारी सायंकाळी सुनावणी झाली. मात्र रात्री उशिरापर्यंत निकाल राखून ठेवण्यात आला होता. रात्री 11 वाजता निकाल देणार असल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले होते. रात्री 11 वाजण्याच्या सुमारास निवडणूक निर्णय अधिकारी वामन कदम यांनी प्रभाग 9 मधील भाजप उमेदवार प्रदीप परदेशी व प्रभाग 10 मधील अपक्ष उमेदवार सय्यद सादिक आरिफ यांचे उमेदवारी अर्ज अवैध ठरविल्याचा निर्णय दिला. परदेशी यांच्या विरोधात कैलास शिंदे यांनी अनधिकृत बांधकाम व अतिक्रमणाची तक्रार केली होती. सय्यद सादिक यांच्याकडे सुमारे 78 हजारांची मालमत्ता कराची थकबाकी होती व या कारणांमुळे अर्ज बाद करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

प्रभाग 8 मधील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार डॉ. चिपाडे, प्रभाग 11 मधील भाजप उमेदवार सुवेंद्र गांधी, प्रभाग 12 मधील शिवसेनेचे उमेदवार बाळासाहेब बोराटे, भाजपाच्या दीप्ती गांधी व सुरेश खरपुडे यांचे अर्ज बाद झाल्याचा निर्णय निवडणूक अधिकारी शाहूराज मोरे यांनी दिला. मोठी उत्सुकता लागलेल्या या तीन प्रभागातील मातब्बर उमेदवारांचा निर्णय ऐकण्यासाठी जुनी महापालिका आवारात मोठी गर्दी होती. पहाटे अडीच वाजता वैध उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. दरम्यान, शिवसेना व राष्ट्रवादीचा प्रत्येकी एक अर्ज बाद झाला असला तरी भाजपच्या चार उमेदवारांचे अर्ज बाद झाले आहेत. यात सुवेंद्र व दीप्ती गांधी यांचा अर्ज बाद झाल्यामुळे भाजप व विशेषत: खासदार दिलीप गांधी यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
3 :thumbsup:
1 :heart:
0 :joy:
1 :heart_eyes:
0 :blush:
2 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)