भुसार विभागात किरकोळ विक्रीला अभय ?

बाजार घटकांमध्ये चर्चा


 नवीन नियमावलीत किरकोळ विक्री करणाऱ्यांवर कारवाईचा उल्लेचख नाही

पुणे – मार्केट यार्डातील भुसार विभागात व्यापारी, बाजार घटकांसाठी नवीन नियमावली तयार करण्यात आली आहे. मात्र, या नियमावलीमध्ये किरकोळ विक्री करणाऱ्यांवर काय कारवाई करणार अथवा बाजार समिती काय भूमिका घेणार, याचा साधा उल्लेखही करण्यात आलेला नाही. त्यामुळे भुसार विभागात किरकोळ विक्री करणाऱ्यांना बाजार समितीने अभय दिले आहे का, अशी चर्चा बाजार घटकांमध्ये होत आहे.
सुमारे तीन वर्षांपूर्वी राज्यातील बाजार समित्यांमध्ये किरकोळ विक्री बंद करण्याचा आदेश तत्कालीन पणन संचालक सुभाष माने यांनी काढला होता. त्यानंतर याबाबत कायदे तज्ज्ञांचा सल्ला घेऊन बाजार समिती प्रशासनाने भुसार विभागात दिलेले 83 किरकोळ विक्रेत्यांचे परवाने रद्द केले होते. त्यांच्या परवान्याचे रूपांतरण घाऊक परवान्यात करण्यात आले होते. त्यावेळी दि पुना मर्चंट्‌स चेंबरने यामध्ये लक्ष घातले होते. हा प्रश्‍न तत्कालीन पणन मंत्र्याकडे गेला होता. पणन मंत्र्याने किरकोळ परवाने रद्द करण्याचा आदेश कायम ठेवला. त्यानंतर हा प्रश्‍न उच्च न्यायालयात गेला होता. त्यावेळी बाजार समिती आवारात किरकोळ विक्री करता येणार नाही, असा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे. त्यानुसार भुसार विभागातील किरकोळ विक्रेत्यांचे परवाने रद्द झाले. त्यानंतर भुसार विभागात किरकोळ विक्री होत असल्याचे अनेकदा उघड झाले आहे. बाजार समिती प्रशासनानेही अशा प्रकारे विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली आहे. तरीही इथे चोरून किरकोळ विक्री सुरूच आहे. बाजार समिती प्रशासनच अशा विक्रीला पाठीशी घालत असल्याचे चर्चा बाजार घटकांमध्ये आहे. मात्र, प्रत्येक वेळी बाजार समितीने हा विषय खोडून काढला आहे. त्यानंतर पुन्हा एखदा हा विषय चर्चेत आला आहे. नुकताच बी.जे.देशमुख यांनी बाजार समितीच्या सचिव पदाचा कार्यभार स्विकारला आहे. वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी त्यांनी पुढाकार घेऊन फळे, भाजीपाला विभागात नवीन नियमावली तयार केली. या नियमावलीमुळे त्या दोन्ही विभागातील वाहतुक कोंडी लक्षणीयरित्या कमी झाली आहे. त्यानंतर आता फूल, भुसार विभागात नवीन नियमावली तयार करण्यात आली आहे. नवीन नियमावलीची पत्रके बाजार समितीकडून काढण्यात आली आहेत.
त्यामध्ये भुसार विभागात किरकोळ विक्री करणाऱ्यांवर काय कारवाई करणार, याचा उल्लेखच नाही. त्यामुळे बाजार समिती भुसार विभागात किरकोळ विक्रीला अभय देत आहे का, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार भुसार विभागातील किरकोळ विक्रीचे परवाने सुमारे तीन वर्षांपूर्वीच बाजार समितीने रद्द केले आहे. त्यानंतर किरकोळ विक्री करणाऱ्यांवर प्रशासनाने वेळोवेळी कारवाई केली आहे. किरकोळ विक्री करणाऱ्यांना बाजार समिती पाठीशी घालणार नाही. कोणी किरकोळ विक्री करत असल्याचे निदर्शनास आल्यावर त्यांच्यावर त्वरित कारवाई केली जाईल.
-दिलीप खैरे, सभापती, पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)