भुयारी मार्ग बनलेत असुरक्षित

– विद्युत व्यवस्था, स्वच्छता, डागडुजीकडे दुर्लक्ष

पिंपरी – जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील फुगेवाडी व कासारवाडी येथील भुयारी मार्गाची दुरावस्था झाली आहे. भुयारी मार्गाची स्वच्छता, विद्युत व्यवस्था, डागडुजीकडे महापालिकेचे दुर्लक्ष झाले आहे. नागरिकांना रस्त्यावर पदपथ उरले नसताना भुयारी मार्गातही टवाळखोर, मद्यपींनी अतिक्रमण केले आहे.

फुगेवाडी चौकातील ज्ञानोबा केरु गायकवाड भुयारी मार्गातील चेंबर तुंबल्याने मोठ्या प्रमाणात पाणी साचत आहे. तसेच, अपुरी प्रकाश व्यवस्था, तरुण-तरुणींचे अश्‍लिल चाळे, दारुच्या बाटल्या यामुळे पादचारी त्रस्त झाले आहेत. यामुळे, या मार्गातून प्रवास करणाऱ्या महिला, विद्यार्थिनींमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. भुयारी मार्गाच्या बाहेर अनधिकृत वाहने उभी असल्याने पादचाऱ्यांना अडथळे निर्माण होत आहेत. याचबरोबर, भुयारी मार्गात अस्वच्छता पसरल्याने मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येत असून भुयारी मार्गाच्या प्रवेशद्वारावरील फलकाची दुरावस्था झाली आहे. भुयारी मार्गांची सद्यस्थिती पाहता पादचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी बांधलेल्या भुयारी मार्गाकडे महापालिकेने दुर्लक्ष केले आहे.

कासारवाडी चौकाजवळ असलेला भुयारी मार्ग गेल्या कित्येक दिवसांपासून बंद अवस्थेत आहे. भुयारी मार्गावर कोणतेही छत नसल्याने हा मार्ग पाण्याने भरलेला आहे. या रस्त्यावर रहदारी मोठ्या प्रमाणात असल्याने हा भुयारी मार्ग सुरु करणे आवश्‍यक आहे. तसेच, जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर मेट्रोचे काम सुरु असल्याने पादचारी रस्ता ओलांडण्यासाठी भुयारी मार्गाचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. लाखो रुपये खर्च करुन बांधलेले भुयारी मार्ग बंद अवस्थेत असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे.

चिंचवड स्टेशन चौकातील भुयारी मार्ग सुस्थितीत असल्याचे दिसून आले आहे. या ठिकाणी प्रकाश व्यवस्था उत्तम असून भुयारी मार्गात लावलेली निसर्ग चित्रे, पक्षांची चित्रे अतिशय नाविन्यपूर्ण दिसत आहेत. हा भुयारी मार्ग सकाळी पाच ते रात्री बारा वाजेपर्यत खुला असून साफसफाई करण्यासाठी दोन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच, पादचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी चोवीस तास सुरक्षा रक्षक ठेवण्यात आले आहेत. या भुयारी मार्गाच्या देखभाल करण्याची जबाबदारी महापालिकेने बिग इंडिया ग्रुपकडे दिली आहे.

फुगेवाडी चौकातील भुयारी मार्गात पावसाळ्यात पाणी साचत असल्याने डासांचे प्रमाण वाढले आहे. यामुळे, स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात येण्याची शक्‍यता आहे. मेट्रोच्या कामामुळे रस्ता ओलांडणे जिकरीचे होत असल्याने पाण्यातून वाट काढत पादचाऱ्यांना भुयारी मार्ग ओलांडावा लागत आहे. महापालिकेने तातडीने या ठिकाणी सुरक्षा रक्षक नेमून या मार्गाच्या समस्या साडविणे आवश्‍यक आहे.
– सोहम ननावरे, स्थानिक नागरिक.

फुगेवाडी येथील भुयारी मार्गातील तुंबलेले चेंबर तातडीने दुरुस्त केले जातील. तसेच, या मार्गातील इतर समस्या सोडवून पादचाऱ्यांची गैरसोय दूर केल्या जातील. बंद असलेल्या भुयारी मार्गांची माहिती घेतली जाईल.
– विजय भोजणे, उपअभियंता तथा प्रवक्ता, पिंपरी-चिंचवड महापालिका.

नागरिकांच्या अपेक्षा…
– प्रकाश व्यवस्था वाढविणे
– भुयारी मार्गात थांबणारे टवाळखोर, मद्यपींवर कारवाई
– भुयारी मार्गाची नियमित अस्वच्छता राखणे
– रात्रीच्या सुमारास भुयारी मार्ग बंद ठेवणे
– भुयारी मार्गाच्या नावाचा फलक नव्याने बसविणे
– सुरक्षा रक्षकांची नेमणूक
– भुयारी मार्गाबाहेर पार्क केल्या जाणाऱ्या वाहनांवर कारवाई
– भुयारी मार्गांचे सुशोभिकरण


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)