भुयारी गटार कामामुळे नागरिकांची अडचण

घरापर्यंत पोहोचण्यासाठी नागरिकांना करावा लागतोय द्रविडी प्राणायम

सातारा – शाहूपुरी ग्रामपंचायत व सातारा शहराच्या हद्दीवरील अर्कशाळा नगर येथे नागरिकांच्या दारातच भुयारी गटार योजनेचे काम सुरू झाल्याने दळणवळणाची अडचण झाली आहे. कोटेश्वर व अर्क शाळेजवळील दोन्ही पुलांची दुरुस्ती सहा महिन्यापासून संपलेली नाही त्यामुळे साताऱ्यात येण्यासाठी नागरिकांना गडकर आळीचा द्रविडी प्राणायम करावा लागत आहे. त्यामुळे सातारकरांसाठी सुविधा की त्यांची गैरसोय असा प्रश्न आता विचारला जाऊ लागला आहे.

सातारा शहर व शाहुपुरी ग्रामपंचायत यांना जोडणाऱ्या कोटेश्वर पुलाचे कवित्व गेल्या पाच वर्षापासून आर्थिक देण्याघेण्याच्या आरोपातून अडकून पडले होते. आता दोन्ही पुलांच्या सव्वा कोटीचा नारळ सातारा विकास आघाडीने फोडून राजकीय डंका पिटला. कोटेश्वरच्या पुलाचा नळ कनेक्‍शन स्थलांतरित करण्याच्या नादात पूर्णत्वाचा विषय सहा महिने विनाकारण लांबले. अजूनही पुलाचे स्लॅबचे काम झाले तरी डांबरीकरण झालेले नाही.

अर्कशाळेजवळचा दगडी पूल खणण्यात आल्याने बसाप्पा पेठ सुयोग कॉलनी किंवा गडकर आळीतून वळसा घालून नागरिकांना शाहूपुरीला यावे लागत आहे. हद्दीचा वाद असणाऱ्या अर्क शाळा नगर, त्रिमूर्ती कॉलनी, सुयोग कॉलनी येथे भुयारी गटार योजनेचे काम अचानकच सुरू झाल्याने नागरिकांची पार्किंगची अडचण झाली आहे. गटार योजनेसाठी दरवाजासमोरच चरं खणण्यात आले असून त्याचा मातीचा भराव तेथेच पडून राहिल्याने नागरिकांची येण्याजाण्याची अडचण झाली आहे. अगदी वाहनेसुध्दा घरापर्यंत नेण्याची अडचणं झाली असून कॉलनीतील मोकळ्या मैदानात गाडी लावण्याची वेळ आली आहे.

करंजे तर्फ सातारा या भागात तब्बल सव्वा कोटीची कामे पालिकेने सुरू केली. एकशे दहा कोटीच्या भुयारी गटार योजनेचा नारळपण तिथेच फोडण्यात आला. ज्या घाईने हे करण्यात आले त्यामागचे खरे कारण? हे सिस्टिम मधल्या टक्केवारीचेच असल्याचा आरोप होत आहे. कोटेश्वरच्या निविदेत कामापूर्वीच प्रत्यक्ष लक्ष्मी दर्शन झाल्याने निविदा रद्द करण्याची वेळ येऊन प्रकरण चौकशीच्या पिंजऱ्यात उभे राहिले होते. कोटेश्वर पूल तर 31 ऑक्‍टोबरलाच पूर्ण करायचा होता. मात्र टेंडरची घाई झाली मग पूल तातडीने पूर्ण करण्याची घाई का नाही असा सातारकरांचा रोकडा सवाल आहे.

कोटेश्वर पुलाच्या बांधकामामुळे या भागातील सलून व्यावसायिक, दूध विक्रेते, स्टेशनरीवाले यांचे अर्थकारण पूर्णपणे कोलमडले आहे. येथील दूध विक्रीचा धंदा पूर्ण अडचणीत आल्याने विक्रेत्या सह नागरिकांची पण पुरती कोंडी झाली आहे. तोंड दाबून बुकक्‍यांचा मार असल्याने सहनही होईना अन्‌ सांगताही येईना अशी नागरिकांची अवस्था झाली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)